मोलेत ट्रकला दुचाकीची धडक

मोलेत ट्रकला दुचाकीची धडक

कुळे येथील युवकाचा जागीच मृत्यू : ट्रकचालकाचा बेजबाबदारपणा
धारबांदोडा : सुकतळी-मोले येथे रस्त्यावर उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकला दुचाकीची मागून धडक बसल्याने कुळे येथील तन्वेश उल्हास रिवणकर हा युवक जागीच ठार झाला. सोमवार दि. 24 रोजी रात्री 11 वा. गोवा-बेळगाव महामार्गावर हा अपघात झाला. कुळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केए 22 डी 0481 या क्रमांकाचा ट्रक सुकतळी येथील उतरणीवर गेल्या तीन दिवसांपासून नादुरुस्त अवस्थेत उभा होता. तन्वेश हा कुळे येथील आपल्या घराकडून कामावर जायला दुचाकीने निघाला होता. वाटेत सुकतळी येथे समोर रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकचा अंदाज न आल्याने त्याच्या दुचाकीची ट्रकला मागून जोरदार धडक बसली व त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
विशेष म्हणजे अपघातापूर्वी काही वाहने तेथून जात असताना नादुरुस्त ट्रकच्या पार्किंग लाईट चालू नव्हत्या, शिवाय ट्रक चालकाने महामार्गावर नादुरुस्त झालेला ट्रक उभा असताना योग्य खबरदारी घेतली नाही. अशा अवस्थेत रस्त्यावर उभा असलेला ट्रक पाहून अनेकांनी अपघाताची शक्यता वर्तविली होती. त्यामुळे या अपघाताला पूर्णपणे ट्रकचालक जबाबदार असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. सध्या पावसाळा सुरू असल्याने वाहनचालकांना रस्त्यावरील स्पष्ट दिसत नाही. अशावेळी एखादे वाहन नादुरुस्त होऊन पडल्यास चालकाने अपघात होऊ नये यासाठी खबरदारी घेणे गरजेचे होते. ट्रकचालकाच्या बेजबाबदार वर्तनामुळे एका युवकाचा हकनाक बळी गेला असून त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. तन्वेश हा आई-वडीलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याला एक विवाहित बहीण असून आई-वडील निवृत्त शिक्षक आहेत. कुळे पोलीस स्थानकाचे हवालदार गौरेश सांगोडकर यांनी घटनेचा पंचनामा केला.