पंतप्रधान हे गुजरातचे जॉनी लिव्हर…रोज एक नवा जोक करत आहेत- संजय राऊत

पंतप्रधान हे गुजरातचे जॉनी लिव्हर…रोज एक नवा जोक करत आहेत- संजय राऊत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना जॉनी लिव्हर यांच्याशी करताना पंतप्रधान रोज एक नविन जोक करत असल्याचं विधान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या या विधानावर आता राजकिय वातावरण तापू लागले असून भाजपच्या प्रवक्तांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे.
लोकसभेच्या निवडणुकांचा धुरळा उडत असताना आता आरोप प्रत्यारोपांचाही धुरळा लोकशाहीच्या आकाशात उडत आहे. भाजपचे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही अनेक जाहीर सभा होत आहेत. मेरठ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले.
पंतप्रधानांच्या या टिकेनंतर संजय राऊत यांनी माध्यमांसमोर यावर भाष्य केलं. ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मेरठ मध्ये भाषण केलं यामध्ये त्यांनी भ्रष्टाचाऱ्यांवर आम्ही कठोर कारवाई करणार असल्याचं म्हणून त्यांनी हा एक जोक केला आहे. ते रोज एक जोक करत आहेत. त्यांचे जोक ऐकून असं वाटत की जॉनी लिव्हर नंतर देशात विनोदी कलाकार कोण असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. हा गुजरातचा लिव्हर आहेत जो आमचा मनोरंजन करतोय.”असंही त्यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, “एक गंमत बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा आम्ही भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही असे म्हटले, तेव्हा त्यांच्या आजूबाजूला १० भ्रष्टाचारी लोक बसलेले होते. दुसऱ्या बाजूला त्यांच्या पक्षात दररोज सरासरी ५ भ्रष्टाचारी नेते प्रवेश करत असून ते साधेसुधे भ्रष्टाचारी नाहीत. कुख्यात भ्रष्टाचारी आहेत. एखादा कुख्यात गुंड असतो तसेच हे कुख्यात भ्रष्टाचारी आहेत. तुम्ही त्यांचं काय करणार? हे कुख्यात भ्रष्टाचारी तुमच्या शेजारी बसतील, तुमच्याबरोबर देशभर फिरतील, तुमच्या सरकारमध्ये सहभागी होतील. तुम्ही त्यांच्या गुन्ह्यांच्या पोलीस ठाण्यातील फाईल्स बंद कराल आणि आम्हाला अक्कल शिकवाल ? खरंतर, भाजपा सर्वात मोठी भ्रष्टाचारी आहे.”असा आरोपही त्यांनी केला.