दक्षिण गोव्यात गिरीश की व्हिरियेतो?

दक्षिण गोव्यात गिरीश की व्हिरियेतो?

काँग्रेसमधील दोन गटात रणकंदन : दोन्ही जागांवर काँग्रेसची गोची,विलंबामुळे कार्यकर्त्यांत मरगळ,उत्तर गोव्यात जाणवत नाही उत्साह
पणजी : लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने आपले दोन्ही उमेदवार जाहीर करून आज दहा दिवस उलटून गेले तरी देखील काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यास या विरोधी पक्षाला पूर्णत: अपयश आले आहे. याला कारण दक्षिण गोव्यात मायनिंग लॉबी पक्षांमध्ये कार्यरत असल्याने पक्षश्रेष्ठींवर दबावतंत्राचा वापर होत असल्यामुळेच नावे जाहीर करण्यात आलेली नाही. काल सोमवारी काँग्रेसने सातवी उमेदवारी यादी जाहीर केली, पण त्यातही गोव्यातील उमेदवारांचा उल्लेख आला नाही.त्यामुळे पुन्हा नाराजी वाढली आहे. गोव्यातील काँग्रेस पक्षाची अवस्था अत्यंत बिकट असताना दक्षिण गोव्यात मात्र पक्षाला चांगली संधी प्राप्त होणार होती. मात्र काँग्रेसमधील काही नेते हे खाण लॉबीच्या आहारी गेलेले आहेत. त्यामुळे विविध पद्धतीचे तंत्रज्ञान दबावासाठी वापरले जात आहे. दक्षिणेतून गिरीश चोडणकर यांच्या जागी कॅप्टन व्हिरियेतो फर्नांडिस यांची उमेदवार म्हणून निवड करण्यात यावी यासाठी काही ठराविक व विशिष्ट लोकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. भारतीय जनता पार्टी प्रचारात बरीच पुढे पोचलेली आहे आणि काँग्रेस पक्षाने अद्याप प्रचाराला प्रारंभ केलेला नाही. पक्षाच्या कार्यकर्त्यांचेही अवसान गळाले असून आणखी किती दिवस वाट पाहायची? असा प्रश्न कार्यकर्त्यांसमोर उभा झाला आहे.
काँग्रेसमध्ये पडलेय दोन गट
काँग्रेस पक्षात, संघटनेमध्ये अद्याप दोन तट पडलेले आहेत. यातील एक गट हा पक्षाचे एकनिष्ठ असलेले माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांना दक्षिणेत उमेदवारी द्यावी, यासाठी अथक प्रयत्न करीत आहेत. दुसरा गट हा ख्रिश्चन उमेदवार हवा म्हणून त्यातल्या त्यात विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन नको असेल तर व्हिरियेतो फर्नांडिस हे पाहिजे, असा आग्रह धरून आहेत.
चोडणकरांकडे क्षमता अधिक
गिरीश चोडणकर हे दक्षिण गोव्यात भाजपला भारी पडण्याची शक्यता आहे. त्यांच्याबरोबर भंडारी समाज तसेच अनुसूचित जमाती आणि ख्रिस्ती व मुस्लिम मतदार देखील आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे निवडून येण्याची क्षमता जास्त आहे. याच परिस्थतीची पक्षांतर्गत काही जणांना बाधा होत असून गिरीश चोडणकर यांना उमेदवारी दिल्यास आम्ही राजीनामा देऊ, अशा आशयाचे पोस्ट सध्या सोशल मीडियातून काही काँग्रेस समर्थकांनी जारी केले आहेत. काँग्रेस पक्षाकडे केवळ तीन आमदार शिल्लक आहेत, तरीदेखील पक्षांतर्गत असलेला वाद कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. गिरीश चोडणकर यांना कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी मिळू नये यासाठी एक गट जोरदार प्रयत्न करीत आहे.
आतापर्यंत झाले तीन सर्वेक्षण अहवाल
दरम्यान प्रदेश काँग्रेसने जी नावे सादर केली होती, त्या अनुषंगाने पक्षाने राष्ट्रीय पातळीवरून गोव्यात सर्वेक्षण केले असता दक्षिणेत काँग्रेसला जिंकण्याची सुवर्णसंधी दाखविण्यात आली. त्यातल्या त्यात गिरीश चोडणकर हे आघाडीवर त्या पाठोपाठ विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन हे द्वितीय स्थानी तर तृतीय स्थानी कॅप्टन व्हिरीयेतो फर्नांडिस अशी क्रमवारी आली. त्यामुळे पक्षश्रेठीनी गिरीश चोडणकर यांच्या नावाचा विचार सुरू केला. त्यास पक्षाच्या प्रदेश पातळीवरील तीन नेत्यांनी विरोध केला आणि आता राजीनामा देऊ अशा पद्धतीच्या धमक्या पक्षश्रेष्ठींना देण्यात आल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी संदर्भातील निर्णय राखून ठेवला. सोमवारी दोन्ही उमेदवारांची नावे जाहीर होणार होती परंतु ही नावे पुन्हा एकदा स्थगित ठेवली. आज मंगळवारी सायंकाळपर्यंत नावे जाहीर होतील, असा अंदाज पक्षाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे. दक्षिणेची उमेदवारी काँग्रेसला जास्त महत्त्वाची आहे. जर दक्षिणेत गिरीश चोडणकर यांना उमेदवारी नाकारली तर उत्तर गोव्यात पक्षाचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांना उत्तर गोळ्यातून उमेदवारी दिली जाईल. उत्तर गोव्यामध्ये रमाकांत खलप यांना उमेदवारी दिली जाणार आहे. पक्षाने गोव्यातील दोन्ही मतदारसंघाची उमेदवारी भंडारी समाजाला द्यायची, असा निर्णय घेतलेला नाही. मात्र एक जागा भंडारी समाजासाठी पक्षाने राखून ठेवली आहे. त्याचा उलगडा आज सायंकाळीपर्यंत होऊ शकतो मात्र पक्षांतर्गत राजकारण आणि गिरीश चोडणकर यांचे पाय ओढण्याचे प्रकार वाढत आहेत.