राजू शेट्टी यांचे खायचे दात वेगळे….त्याचा स्वाभिमान फक्त दाखवण्यापुरताच- धैर्यशील माने

राजू शेट्टी यांचे खायचे दात वेगळे….त्याचा स्वाभिमान फक्त दाखवण्यापुरताच- धैर्यशील माने

अभिजीत खांडेकर
राजू शेट्टी यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असून त्यांना स्वताचा स्वाभिमान नाही. त्यांना स्वाभिमान असेल तर त्यांनी दुसऱ्याच्या पायऱ्या झिजवल्या नसत्या अशी तिखट टिका शिवसेना शिंदे गटाचे हातकणंगले मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील माने यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या टिकेनंतर हातकणंगलेच्या निवडणुकांच्या आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरु झाला असून राजकिय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.
तसेच हातकणंगले मतदारसंघातील उमेदवार बदलाच्या चर्चेला काही अर्थ नसून अशा प्रकारचा कोणताही संभ्रम निर्माण करण्याची ही वेळ नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
हातकणंगले मतदारसंघाकडून लोकसभेसाठी खासदार धैर्यशील माने यांना तिकीट मिळालं आहे. पण त्यानंतर भाजपमध्ये नाराजीचा सुर पसरल्याच्या बातम्या समोर येत होत्या. त्यातच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी पश्चिम महाराष्ट्रातील एका उमेदवाराचे तिकिट रद्द होणार असल्याचे विधान केल्याने चर्चेला पुन्हा जोर आला. या पार्श्वभुमीवर खासदार धैर्यशील माने यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन आपली भुमिका मांडली.
हि तर एप्रिल फुलची अफवा…
संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर बोलताना धैर्यशील माने यांनी हि वेळ संभ्रम निर्माण करण्याची नसल्याचं म्हटलं आहे. तसेच अशा चर्चांना काही अर्थ नसून य़ा चर्चा उमेदवारीच्या आधीही सुरू होत्या. आपले रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्यानेच उमेदवारी मिळाली आहे. उमेदवार बदलाचे अधिकार फक्त मुख्यमंत्र्यांकडे असल्याचं त्यांनी सांगितलं
तसेच, संजय शिरसाट यांनी कोणत्याही लोकसभा उमेदवाराचं नाव त्यांनी घेतलेलं नसून उमेदवार बदलायचा असता तर आधीच बदलला असता. पण आता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोणताही बदल आता होणार नाही. अशा प्रकारचा संभ्रम निर्माण करण्याची ही वेळ नाही. काल एक एप्रिल असल्याने एप्रिल फूल म्हणुन विसरून जावं असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे….
खासदार धैर्यशील माने यांनी आज राजू शेट्टी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. आपल्या विरोधकांना अद्याप पक्ष आणि दिशा सापडत नसून त्यांची ससेहोलपट आणि वैचारिक घालमेल होत आहे. राजू शेट्टी यांची अवस्था नवरीला फक्त नवरा पाहिजे पण त्याचे आई-वडील नको अशी झाली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
तसेच, राजू शेट्टींना सहकारी पक्षांचा पाठिंबा तर पाहिजे पण त्यांचा स्पर्श देखील नको आहे. दुसऱ्या बाजूला आमचं व्हिजन क्लिअर असून कोणाला वाईट म्हणून आम्ही मतं मागत नाही. स्वाभिमान असेल तर दुसऱ्याच्या पाठिंबासाठी पायऱ्या झिजवाव्या लागत नाहीत. राजू शेट्टी यांच राजकारण स्वतः पूरतं असून फक्त नाव स्वाभिमानी ठेवून स्वाभिमान जागृत होत नाही त्यासाठी स्वाभिमानाने राहाव लागत. त्यामुळे राजू शेट्टी यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत असा घाणाघातही त्यांनी केला.
भाजपचे कार्यकर्ते माझ्याबरोबरच…
भाजप कार्यकर्त्यांच्या रोषाला बळी पडल्याने त्यांना याबाबत विचारले असता त्यांनी उमेदवारी जाहीर झाल्यावर लगेच भाजपचे हातणकणंगलेचे नेते संजय पाटील यांच्याशी संपर्क केला होता. बीजेपीच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी सुरूच आहेत. भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा काही गैरसमज झाला असेल तर मी तो दूर करेन. भाजपचे कार्यकर्ते कुठे नाराज असल्याचं जाणवलं नाही. भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांची टीम आमच्याबरोबर काम करत असल्याचीही त्यांनी खुलासा केला.