अखेर चन्नम्मा चौकातील जलवाहिनीची दुरुस्ती

अखेर चन्नम्मा चौकातील जलवाहिनीची दुरुस्ती

गळती थांबल्याने हजारो लिटर पाण्याची बचत
बेळगाव : चन्नम्मा चौक येथील गणपती मंदिराशेजारी असणाऱ्या जिल्हा रुग्णालय आवारातून घालण्यात आलेल्या जलवाहिनीला गेल्या अनेक महिन्यांपासून गळती लागली होती. यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात होते. अखेर बऱ्याच महिन्यांनंतर गळती काढून वाया जाणारे पाणी वाचविण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयाच्या आवारातून पाण्यासाठी जलवाहिनी घालण्यात आली आहे. मात्र, त्याठिकाणी सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे काम सुरू असताना जलवाहिनीला गळती लागली होती. त्यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात होते. ऐन पाणीटंचाई असताना वाया जाणारे पाणी पाहून जवळच असणाऱ्या रिक्षास्टँडवरील रिक्षाचालकांकडून याची माहिती पाणीपुरवठा मंडळाला देण्यात आली होती. व्हॉल्वमनलाही गळतीबाबत सांगण्यात आले होते. याबाबत वृत्तपत्रांमधूनही वाया जाणाऱ्या पाण्याचे वृत्तांकन करून अधिकाऱ्यांना जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, याची दखल घेण्यात आली नव्हती.
पाणीपुरवठा मंडळाकडून दखल
शहरामध्ये पाणीटंचाई असताना वाया जाणाऱ्या पाण्यासंदर्भात लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून पाणीपुरवठा मंडळाला चांगलेच सुनावण्यात आले होते. अखेर याची दखल घेत पाणीपुरवठा मंडळाला अनेक महिन्यांनंतर जाग आली. त्यामुळे सदर ठिकाणी निर्माण झालेली गळती दुरुस्त केली आहे. गळतीचे निवारण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खोदाई केली होती. चन्नम्मा चौकातील महत्त्वाच्या रहदारीच्या रस्त्यावर खोदाई केल्याने खड्डा निर्माण झाला होता. त्याठिकाणी काँक्रीट घालून खड्डा बुजविण्यात आला आहे.