सत्ता स्थापणे, मंत्री, मुख्यमंत्री होण्याची स्वप्नेच राहणार!

सत्ता स्थापणे, मंत्री, मुख्यमंत्री होण्याची स्वप्नेच राहणार!

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा विरोधकांना टोला
मडगाव : लोकसभा निवडणुकीनंतर काही जणांचा आवाज बराच चढला आहे. काहीजण 2027 मध्ये सत्ता स्थापन करून मंत्री व मुख्यमंत्री होण्यची स्वप्ने पाहत आहेत. पण, 2027 मध्ये पुन्हा एकदा राज्यात भाजपचे 27 आमदार निवडणून येऊन निर्विवादपणे भाजपचेच सरकार सत्तेवर येईल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. दक्षिण गोव्यात ‘मतदाता अभिनंदन’ कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते. यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, भाजपचे मंत्री व आमदार उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, सासष्टीतील वेळळी, कुंकळळी, बाणावली, नुवे, कुतडरी व नावेली हे सहा मतदारसंघ सोडले तर इतर मतदारसंघात भाजपला अनुकूलता आहे. लोकसभा निवडणुकीत उत्तर गोव्यात भाजपला 16 मतदारसंघात आघाडी मिळाली होती तर दक्षिण गोव्यात 11 मतदारसंघात. याची बेरीज केली तर 27 होते. त्यामुळे 2027 मध्ये भाजपचे 27 आमदार निवडणून येणार स्पष्ट आहे. यापूर्वी 2022 मध्ये आम्ही 22 आमदारांचे टार्गेट ठेवले होते. त्यात यशस्वी झालो. आता 2027चे टार्गेट आमच्या समोर असून ते साध्य करण्यासाठी पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला योगदान द्यावे लागणार आहे. असंख्य मतदारांची मानसिकता ही भाजपच्या कार्यप्रणालीशी मिळती जुळती आहे, त्यांच्याशी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संपर्क साधून त्यांना पक्षात आणले पाहिजे.
सर्वजण थोडे गाफिल राहिले
दक्षिण गोव्यात आम्ही 13 हजार मतांच्या फरकाने हरलो म्हणून काही बिघडले नाही. प्रत्येकाने भाजपचा उमेदवार निवडून यावा यासाठी प्रयत्न केले. परंतु, हे प्रयत्न अपुरे पडले. आम्ही निवडणुकीच्या पूर्वी प्रत्येक मतदारसंघांतून ढोबळ अशी आकडेवारी मिळविली होती. त्या प्रमाणे, आम्ही दक्षिण गोव्यात जिंकणार असा विश्वास वाटत होता. मात्र, आम्ही सर्वजण थोडे गाफिल राहिलो, त्याचा परिणाम निकालावर झाला.
विरोधकांच्या अपप्रचाराचा परिणाम
निवडणुकीच्या प्रचारात आम्ही चारसो पारचा नारा दिला. तेव्हा विरोधकांनी जर आम्ही चारसो पार गेलो तर देशाचे ‘संविधान’ बदलणार असल्याचा अपप्रचार केला व त्याचा परिणाम मतदारांवर झाला. त्यामुळे या देशात विकास हा मतदानाचा मुद्दा ठरू शकत नाही, हे स्पष्ट झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
विकास हा मतदानाचा मुद्दा नाही
अयोध्येत राम मंदिर बांधले, परंतु, याच मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला. त्यावरूनही विकास हा मतदानाचा मुद्दा ठरू शकत नाही हे आणखी एक उदाहरण असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. दक्षिण गोव्यात आम्हाला दोन लाख मते मिळाली आहेत. त्या प्रत्येक मतदारांचे आभार मानणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रत्येकाचे आभार मानावे तसेच लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे असे मुख्यमंत्री म्हणाले.
काहीजण स्वप्ने पाहतात ती स्वप्नेच राहणार
यावेळी बोलताना आमदार दिगंबर कामत म्हणाले की, 2027 च्या निवडणुकीत काहीजण मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने पाहत आहेत. परंतु, राज्यात पुन्हा एकदा भाजपचेच सरकार सत्तेवर येणार असून स्वप्ने पाहणाऱ्यांची स्वप्नेच राहणार आहेत. केंद्रात व राज्यात पुन्हा एकदा डबल इंजिन सरकार असेल, त्यामुळे कार्यकर्त्यांनी कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता पक्षासाठी कार्यरत रहावे, असेही ते म्हणाले.