मालपे बोगद्यात चिखल आल्याने रेल्वे वाहतूक ठप्प

मालपे बोगद्यात चिखल आल्याने रेल्वे वाहतूक ठप्प

रेल्वेरूळावर आलेले पाणी हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू
मडगाव : जोरदार पावसामुळे कोकण रेल्वेच्या मार्गावरील मालपे-पेडणे बोगद्यात काल मंगळवारी सायंकाळी मोठ्या प्रमाणात चिखलमिश्रीतपाणी आल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली. रेल्वे रूळावर आलेले चिखलमिश्रीतपाणी हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले होते. ठप्प झालेली रेल्वे वाहतूक दीड ते दोन तासांनी पुन्हा सुरू होईल असा विश्वास कोकण रेल्वेच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे. पेडण्यात काल मंगळवारीही दरड कोसळून राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद झाली होती. त्याचप्रमाणे, संध्याकाळी मालपे-पेडणे येथे रेल्वे रूळाच्या बाजूला जमिनीतून मोठ्या प्रमाणात पाणी वर येऊ लागल्याने रेल्वे रूळावर पाणी साचले. पाण्याबरोबर माती येऊ लागल्याने हा परिसर धोकादायक बनला होता.
खबरदारीचा उपाय म्हणून कोकण रेल्वेच्या प्रशासनाने सावंतवाडीकडे जाणाऱ्या तसेच गोव्याकडे येणाऱ्या सर्व रेलगाड्या रोखून धरल्या होत्या. मालपे-पेडणे येथे चिखलमिश्रीत पाणी रेल्वे रूळावर येऊ लागल्याने रेल्वेमार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला व नंतर त्वरित दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले. कोकण रेल्वे म्हामंडळाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा हे मडगावात आले होते. त्यांना मालपे-पेडणे बोगद्यात चिखलमिश्रीत पाणी रेल्वे रूळावर येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मालपे-पेडणेत धाव घेतली. यावेळी कोकण रेल्वेचे अभियंते देखील घटनास्थळी उपस्थित होते. पुढील दोन तासांत रेल्वे वाहतूक पुन्हा सुरळीत होईल अशी माहिती विश्वास कोकण रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिली.