कडक उन्हाचा पोल्ट्रीवर परिणाम

पिल्ले दगावण्याच्या प्रमाणात वाढ बेळगाव : उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. याचा परिणाम पोल्ट्री व्यावसायावरही होवू लागला आहे. पारा 38 अंशावर पुढे गेल्याने पोल्ट्रीतील कोंबडींच्या पिल्लांना धोका निर्माण होऊ लागला आहे. विशेषत: वाढत्या तापमानामुळे कोंबडीची पिल्ले दगावण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पोल्ट्री चालकांना आर्थिक फटकाही बसू लागला आहे. अलिकडे पशुपालन, पोल्ट्री, शेळीपालन, मत्स्यपालन व्यवसायाकडे नागरिकांचा […]

कडक उन्हाचा पोल्ट्रीवर परिणाम

पिल्ले दगावण्याच्या प्रमाणात वाढ
बेळगाव : उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. याचा परिणाम पोल्ट्री व्यावसायावरही होवू लागला आहे. पारा 38 अंशावर पुढे गेल्याने पोल्ट्रीतील कोंबडींच्या पिल्लांना धोका निर्माण होऊ लागला आहे. विशेषत: वाढत्या तापमानामुळे कोंबडीची पिल्ले दगावण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पोल्ट्री चालकांना आर्थिक फटकाही बसू लागला आहे. अलिकडे पशुपालन, पोल्ट्री, शेळीपालन, मत्स्यपालन व्यवसायाकडे नागरिकांचा कल वाढू लागला आहे. त्यामुळे पोल्ट्रींची संख्या वाढली आहे. जिल्ह्यात 2 हजारांहून अधिक पोल्ट्री व्यावसायिक आहेत. या पोल्ट्रींमध्ये लाखो कोंबड्या आहेत. मात्र वाढत्या उष्म्याचा परिणाम या पक्ष्यांवर होवू लागला आहे. पोल्ट्रीत दाखल झाल्यानंतर कोंबडींच्या पिल्लांसाठी पैसे मोजावे लागतात. मात्र पोल्ट्रीत आल्यानंतर मरतुकीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना फटका बसू लागला आहे. कोंबडी खाद्य, विद्युत, पाणी, वैद्यकीय खर्च यावर अधिक खर्च केला जातो. मात्र वाढत्या उष्म्याचा परिणाम या व्यवसायावर होवू लागला आहे.
पक्ष्यांच्या जीवाला धोका
कडक उन्हामुळे पक्ष्यांच्या जीवाला धोका निर्माण होवू लागला आहे. यामध्ये लहान पिल्ले मरू लागली आहेत. पक्ष्याचे वजन एक किलोच्या घरात आल्यानंतर पुढील अडीच ते तीन आठवडे त्याची काळजी घ्यावी लागते. दरम्यान पोषक वातावरण गरजेचे आहे. मात्र वाढत्या उन्हामुळे दररोज एक ते दोन पिल्ले दगावत आहेत. यंदा चिकनचा दर टिकून आहे. त्यामुळे मागणीही वाढू लागली आहे. मात्र अशा परिस्थितीत पिल्ले जिवंत ठेवण्यासाठी व्यावसायिकांना धडपड करावी लागत आहे.