द्वारका: द्वारकानगरी शोधण्यासाठी समुद्राच्या तळाशी गेले पाणबुडे; पण त्यांना काय सापडलं?

गुजरातमधील देवभूमी म्हणून ओळखलं जाणारं द्वारका अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या हिंदूंच्या चार पवित्र स्थळांपैकी एक आहे. हिंदू मान्यतेनुसार या शहराची स्थापना भगवान श्रीकृष्णानी केली होती आणि त्यांच्यानंतर ते पाण्यात बुडालं. विशेष म्हणजे हे शहर …

द्वारका: द्वारकानगरी शोधण्यासाठी समुद्राच्या तळाशी गेले पाणबुडे; पण त्यांना काय सापडलं?

गुजरातमधील देवभूमी म्हणून ओळखलं जाणारं द्वारका अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या हिंदूंच्या चार पवित्र स्थळांपैकी एक आहे.

हिंदू मान्यतेनुसार या शहराची स्थापना भगवान श्रीकृष्णानी केली होती आणि त्यांच्यानंतर ते पाण्यात बुडालं. विशेष म्हणजे हे शहर एकापेक्षा जास्तवेळा पाण्यात बुडालं होतं.

 

ते नेमकं केव्हा केव्हा बुडलं हे सांगणं कठीण असलं तरी परिस्थितीजन्य पुराव्यांवरून त्याचा अंदाज लावला जाऊ शकतो.

 

भारत सरकारच्या पुरातत्व विभागाने द्वारकेच्या समुद्रात संशोधन आणि उत्खनन कार्य सुरू केलं आहे. यातून काही गोष्टी समोर आल्या आहेत.

 

पाश्चात्य देशांमध्ये अटलांटिस समुद्रात बुडल्याचं मानलं जातं. मात्र प्लेटोने ही पुराणकथा अगदी आकर्षक शैलीत मांडली.

 

भारतासह जगभरातील अनेक शहरांमध्ये महापूर, ज्वालामुखी यांसारख्या आपत्ती आल्या. यात शहरं बुडाली असं मानणाऱ्यांची कमतरता नव्हती.

 

त्यामुळे 1966 मध्ये शास्त्रज्ञ डोराटी व्हिटालियानो यांनी भूगर्भशास्त्र, भू-पुराणकथा या उपशाखेची स्थापना केली. जेणेकरून पुराण किंवा दंतकथेमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा भूवैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करता येईल.

 

‘द्वारका बांधण्यासाठी श्रीकृष्णाने समुद्रातून जमीन मिळवली’

हिंदू मान्यतेनुसार, ब्रह्मदेव हे सृष्टीचे निर्माते आहेत, विष्णू सृष्टीचे पालनकर्ते आहेत तर शिव सृष्टीचे विनाशकर्ते आहेत. भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे आठवे अवतार असल्याचं मानलं जातं.

 

त्यामुळे त्यांचा जन्मदिवस द्वारका, मथुरा, डाकोर, नाथद्वारासह देशभरात जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो.

श्रीमद्भागवगीता या हिंदूंच्या पवित्र ग्रंथात कृष्णाचा जन्म, संगोपन, कंसवध, मथुरेला परतणे, पलायन, द्वारकेची स्थापना, पराक्रम आणि यादवांचे पतन यांचा उल्लेख आहे.

 

याशिवाय ‘महाभारत’ आणि ‘विष्णुपुराण’ या धर्मग्रंथांमध्येही त्यांच्याबद्दल उल्लेख आढळतो.

 

‘श्रीमद्भागवगीता’ आणि ‘महाभारत’ या महाकाव्यानुसार, श्रीकृष्णाने कंसाचा वध केल्याने मगधचा अधिपती जरासंध संतप्त झाला. कारण जरासंधाच्या दोन मुली, अस्ति आणि प्रक्षी या कंसाच्या पत्नी होत्या.

 

त्यामुळे जरासंधाने 17 वेळा मथुरेवर आक्रमण केलं. प्रत्येक वेळी श्रीकृष्ण आणि बलरामांनी त्यांच्या शहराचं रक्षण केलं. पण 18 व्या वेळी मथुरेचं पतन दिसू लागलं तेव्हा मथुरावासियांना द्वारकेत आणून वसवलं.

 

स्थानिक मान्यतेनुसार नवीन शहर वसवण्यासाठी श्रीकृष्णाने समुद्रातून 12 योजनांची जमीन घेतली. देवांचे शिल्पकार विश्वकर्मा यांनी ही नगरी वसवली. त्यांनी कृष्णाच्या 16 हजार 108 पत्नींसाठी महाल आणि नगरवासीयांसाठी निवासस्थाने बांधली.

 

श्रीकृष्णाने रणांगण (वाळवंट) सोडल्यामुळे त्यांना ‘रणछोड’ या नावाने तर द्वारका वसवली म्हणून ‘द्वारकाधीश’ हे नाव पडलं.

 

द्वारका समुद्रात कधी बुडाली?

हिंदू मान्यतेनुसार, भगवान राम हे विष्णूचे सातवे अवतार होते आणि ‘रामायण’ हे त्यांच्या चरित्रासारखे आहे. ते ‘मर्यादा पुरुषोत्तम’ होते तर कृष्ण ‘पूर्ण पुरुषोत्तम’ होते. त्यांच्या मृत्यूनंतर द्वारकेत महापूर आला.

 

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) विभागातील माजी पुरातत्वशास्त्रज्ञ के. के. मोहोम्मद सांगतात की, महाभारताचा काळ इसवी सन पूर्व 1400 किंवा 1500 असावा असा पुरातत्वशास्त्रज्ञांचा अंदाज आहे.

 

भारतात इंग्रजांच्या काळापासून पुरातत्व संशोधन चालू आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्था शोध, उत्खनन आणि संवर्धन करण्याचं काम करते.

 

‘श्रीमद भागवत महापुराण’ मध्ये नमूद केल्याप्रमाणे पृथ्वीवर 125 वर्ष राज्य केल्यानंतर कृष्ण वैकुंठवासी झाले. त्यानंतर श्रीकृष्णाचा महाल सोडून समुद्राने सर्व जमीन परत घेतली.

 

पण हिंदूंची धार्मिक श्रद्धा आणि पुरातत्वशास्त्रज्ञांच्या वेळेचा अंदाज यामध्ये सुमारे 1,500 वर्षांचे अंतर आहे.

 

पुराण आणि आख्यानांचे अभ्यासक देवदत्त पटनायक (द किंगडम ऑफ द्वारका, डिस्कव्हरी चॅनल) सांगतात की, “कुरुक्षेत्राचे युद्ध संपल्यानंतर जेव्हा भगवान कृष्ण कौरवांची माता गांधारीला भेटायला गेले.

 

तेव्हा तिने शाप देताना म्हटलं की ज्याप्रमाणे माझा वंश संपला त्याचप्रमाणे तुझा वंश देखील तुझ्या डोळ्यासमोर संपेल. 36 वर्षांनी गांधारीचा शाप खरा ठरला आणि श्रीकृष्ण काहीच करू शकले नाहीत.”

 

हिंदू मान्यतेनुसार, कुरुक्षेत्राच्या वाळवंटात कौरव आणि पांडवांनी एकमेकांविरुद्ध युद्ध केलं. पांडवांचा महान धनुर्धर अर्जुन होता.

 

मात्र, समोर आपले जवळचे कुटुंबीय, गुरू आणि स्वकीय पाहून अर्जुनाला हे युद्ध लढण्याची हिंमत होत नव्हती.

 

अशा वेळी कुरुक्षेत्राच्या रणांगणावर कृष्ण अर्जुनाला धर्माचे रक्षण आणि क्षात्रधर्मासाठी लढण्याचा उपदेश करतात. त्यानंतर हे युद्ध 18 दिवस सुरू राहतं, ज्यामध्ये शेवटी पांडवांचा विजय होतो. ज्या दिवशी गीता लिहून पूर्ण झाली तो दिवस हिंदू पिढ्यानपिढ्या ‘गीता जयंती’ म्हणून साजरा करतात.

 

2023 मध्ये 5 हजार 160 वी गीता जयंती साजरी केली जाणार आहे. अशा प्रकारे कुरुक्षेत्राचे युद्ध आणि गांधारीचा शाप पूर्ण होण्यात सुमारे 36-37 वर्षे गेली.

 

संशोधन, उत्खनन, संवर्धन

1960 च्या दशकाच्या सुरुवातीला द्वारकेतील जगत मंदिराजवळील घर पाडताना मंदिराचा माथा सापडला. त्यानंतर पुण्याच्या डेक्कन कॉलेजने हे उत्खनन केलं. ज्यामध्ये नवव्या शतकातील विष्णू मंदिराचे अवशेष सापडले.

 

उत्खननादरम्यान इतर ठिकाणी वस्तू सापडल्या. त्यानंतर उत्खनन सुरू असताना सुमारे तीन मीटर खोल आणखीन वस्तू सापडल्या. तरीही शोध आणि उत्खनन सुरूच होतं, तेव्हाही पुन्हा वस्तू सापडल्या.

 

यावरून द्वारकेचा एकापेक्षा जास्त वेळा नाश झाल्याचा शास्त्रज्ञांचा

 

अंदाज आहे. द्वारका सहावेळा बुडाली असून सध्याची द्वारका ही सातवी द्वारका असल्याचं स्थानिक मानतात.

पुरातत्व अभ्यासक रंगनाथ राव हे मूळचे कर्नाटकचे पण समुद्रात अधिक संशोधन करण्याच्या उद्देशाने त्यांनी आपलं घर गुजरातमध्ये थाटलं. त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीचा पाया घातला.

 

1989 च्या सुमारास समुद्राच्या तळाशी त्यांनी सीग्रास आणि आयताकृती दगड शोधून काढले. याशिवाय अर्धगोलाकार असे मानवनिर्मित दगड सापडले.

 

याशिवाय, दगडी नांगर सापडले आहेत. हे नांगर जवळपास सारखेच आहेत. लाकूड भरण्यासाठी किंवा घर बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चुनखडीचा वापर केला असावा.

 

हा चुनखडीचा दगड आजूबाजूच्या परिसरात अनेक शतकांपासून विपुल प्रमाणात आढळतो. याशिवाय भांडी, दागिने, मुद्रा सापडल्या. ओमान, बहारीन आणि मेसोपोटेमिया येथेही या प्रकारची नाणी सापडली आहेत.

 

2007 च्या सर्वेक्षणापूर्वी समुद्रात 2*1 नॉटिकल मैल परिसरात हायड्रोग्राफिक सर्वेक्षण करण्यात आलं होतं. ज्याच्या आधारे पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज वर्तवण्यात येतो. त्यानुसार 200 चौरस मीटर क्षेत्रफळ ग्रिडिंगद्वारे (आलेखाप्रमाणे उभ्या आणि आडव्या रेषांद्वारे रेखाचित्र) निर्धारित केले गेले. शेवटी मार्किंगच्या आधारे 50 चौरस मीटर क्षेत्रात सर्वेक्षण करण्यात आले.

 

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. आलोक त्रिपाठी यांनी यापूर्वी बीबीसीशी बोलताना सांगितलं होतं की, ” 1979 मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने आणखी एक उत्खनन केलं होतं. यात काही जहाजांचे अवशेष सापडले होते.

 

हे जहाजांचे अवशेष इसवी सन पूर्व 2000 मधील असावेत असा अंदाज आहे. पण तरीही द्वारकेच्या आसपास उत्खनन आणि शोध सुरूच होता. या दरम्यान अनेक पुरातत्व अवशेष सापडले आहेत.”

 

त्यांनी पुढे सांगितलं की, “या उत्खननात रंगवलेल्या वस्तू सापडल्या आहेत. अनेक रंगांचा वापर करून तयार केलेली, लाल रंगाच्या पृष्ठभागावर काळ्या रंगाच्या चट्ट्यापट्ट्याची मातीची भांडी देखील सापडली आहेत.”

 

“500 हून अधिक जीवाश्म सापडले आहेत. इथल्या सापडलेल्या वस्तूंच्या कार्बन डेटिंगवरून सिद्ध होतं की इथली संस्कृती टप्प्याटप्प्याने विकसित झाली असावी.

 

इथे सापडलेली मातीची भांडी इसवी सन पूर्व 2000 मधील आहेत. समुद्रात खोलवर दगडी वस्तूही सापडल्या आहेत. मात्र त्या भागात मातीची भांडी सापडलेली नाहीत, कारण त्या भागात समुद्राचा प्रवाह खूप जोरात आहे.”

 

अलीकडच्या काळात संशोधनासाठी सोनार तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. या तंत्रज्ञानाद्वारे समुद्रतळात ध्वनी लहरी फेकल्या जातात आणि त्याच्या प्रतिध्वनीच्या आधारे घन वस्तूंच्या अस्तित्वाचा अंदाज लावला जातो.

 

याशिवाय जीपीएस (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम), मोशन सेन्सर आणि इतर सेन्सर्सच्या मदतीने विशिष्ट क्षेत्र निश्चित करून समुद्रतळाचे सर्वेक्षण केले जाते.

 

समुद्र पातळीत झालेली वाढ आणि घसरणीबद्दल बोलताना सीएसआयआर – एनआयओचे माजी मुख्य शास्त्रज्ञ डॉ. राजीव निगम सांगतात की, “सुमारे 15,000 वर्षांपूर्वी, समुद्राची पातळी आताच्या तुलनेत 100 मीटरने कमी होती. त्यानंतर, समुद्राची पातळी पुन्हा थोडी वाढली आणि 7,000 वर्षांपूर्वी ती आताच्या तुलनेत आणखीन वाढली.”

 

“मग 3500 वर्षांपूर्वी ती पातळी पुन्हा घसरली आणि त्याच सुमारास द्वारका शहराची स्थापना झाली. पण नंतर समुद्राची पातळी पुन्हा वाढू लागली आणि शहर बुडू लागलं.”

 

संशोधनाच्या ठिकाणी सातत्याने येणाऱ्या भरती-ओहोटीमुळे, पाण्याखाली शोधमोहीम राबविण्यासाठी फक्त डिसेंबर आणि जानेवारी योग्य महिने आहेत.

 

देशात पाण्याखाली संशोधन करणारे पुरातत्वशास्त्रज्ञ फारच कमी असल्याने हे संशोधन संथ गतीने सुरू आहे. पुरातत्वशास्त्रज्ञ (एएसआयमधून निवृत्त) के. के. मोहम्मद म्हणतात की सरकार संशोधनासाठी पुरेशी संसाधने उपलब्ध करून देत नाही.

 

पश्चिमेकडील सॉलोमन बेटांचा समूह, सॅंटोरिनी बेट (ग्रीस) आणि ऑस्ट्रेलियातही काही शहरं बुडाल्याच्या कथा सांगितल्या जातात.

 

ऑस्ट्रेलियातील आदिवासींचा असा विश्वास आहे की समुद्राची पातळी वाढल्यामुळे त्यांचा मोठा भूभाग पाण्याखाली गेला आहे. त्यांच्याकडे अशा 21 दंतकथा प्रचलित आहेत.

 

भारताच्या तमिळनाडूजवळील महाबलीपुरम येथेही अशाच काही कथा प्रचलित आहे. 2004 साली आलेल्या त्सुनामी दरम्यान काही भाग समुद्रातून बाहेर आल्याचं समोर आलं होतं.

 

द्वारका हे शहर गुजरातच्या पश्चिमेला अरबी समुद्राजवळ वसलंय. नेचर कम्युनिकेशन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार , सूरत, कच्छ, भावनगर आणि भरूच समुद्रामुळे प्रभावित होऊ शकतात. डावरी, हजीरा आणि कांडला या भागांवरही व्यापक परिणाम होऊ शकतो.

 

जामनगर, देवभूमी द्वारका, पोरबंदर, जुनागढ, अमरेली, नवसारी, वलसाड आणि गिरसोमनाथ हे भाग मध्यम ते हलक्या प्रमाणात प्रभावित होऊ शकतात. याशिवाय कच्छ पुन्हा एकदा बेट बनण्याची भीतीही अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

Published By- Priya Dixit 

 

 

गुजरातमधील देवभूमी म्हणून ओळखलं जाणारं द्वारका अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या हिंदूंच्या चार पवित्र स्थळांपैकी एक आहे.
हिंदू मान्यतेनुसार या शहराची स्थापना भगवान श्रीकृष्णानी केली होती आणि त्यांच्यानंतर ते पाण्यात बुडालं. विशेष म्हणजे हे शहर …

Go to Source