सोन्याची द्वारका खरंच अस्तित्वात होती? समुद्रात सापडलेल्या ‘या’ गोष्टींमुळे उलगडलं कोणतं रहस्य?

सोन्याची द्वारका खरंच अस्तित्वात होती? समुद्रात सापडलेल्या ‘या’ गोष्टींमुळे उलगडलं कोणतं रहस्य?

गुजरातच्या द्वारका जिल्ह्यात पश्चिमेकडील समुद्रकिनाऱ्यावर वसलेली द्वारकानगरी कोट्यवधी हिंदूंचे पवित्र स्थान म्हणून ओळखली जाते.

भारताच्या सांस्कृतिक इतिहासात आणि हिंदू धर्माच्या पुस्तकांमध्येही द्वारकेचा उल्लेख श्रीकृष्णाने वसवलेलं शहर असा केला गेलाय. त्यामुळे हे अनेकांचे श्रद्धास्थान आहेच, पण यासोबतच द्वारकेच्या समुद्रात पुरातत्व विभागामार्फत केल्या जाणाऱ्या संशोधनामुळेही देशविदेशातील अनेकांना द्वारका आकर्षित करते आहे.

 

द्वारकेतील जमीन आणि समुद्रात संशोधन आणि उत्खननादरम्यान सापडलेल्या अवशेषांमुळे या ठिकाणी प्राचीन काळी असणाऱ्या शहराचे पुरावे मिळत आहेत.

 

80च्या दशकाच्या उत्तरार्धात म्हणजेच 1986–87च्या सुमारास द्वारकेमध्ये पहिल्यांदा पाण्याखाली उत्खनन करण्यात आलं. अशापद्धतीने समुद्रात उत्खनन करण्याची ही देशातली पहिलीच वेळ होती.

 

येथे सापडलेले अवशेष हेच सांगतात की, इथे विविध आकारांची आणि मापाची जहाजे येथे येत असत आणि परदेशात जात असत.

 

कालांतराने हे बंदर नष्ट केलं गेलं आणि आता शास्त्रज्ञांना पुन्हा एकदा द्वारका नष्ट होईल की काय अशी भीती वाटू लागलीये.

 

हिंदू धर्मातील मान्यतेनुसार भगवान विष्णूचा आठवा अवतार मानल्या जाणाऱ्या श्रीकृष्णाने त्यांच्या कंस मामाचा वध करून लोकांना त्याच्या अत्याचारापासून मुक्त केलं आणि भगवान श्रीकृष्ण द्वारकेत राहू लागले.

 

‘श्रीमद्भगवद्गीता’ आणि ‘महाभारत’ या महाकाव्यानुसार, श्रीकृष्णाने कंसाचा वध केल्याने मगधचा राजा जरासंध संतप्त झाला. कारण जरासंधाच्या दोन मुली, अस्ति आणि प्रक्षी या कंसाच्या पत्नी होत्या.

 

मगधचा राजा जरासंधाने तब्बल 17 वेळा मथुरेवर आक्रमण केलं. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा भाऊ बलराम यांनी मिळून मथुरेचं रक्षण केलं.

 

पण 18 व्या वेळी मथुरेचं पतन दिसू लागलं तेव्हा श्रीकृष्णांनी यादवांना कालयवन नावाच्या सेनापतीच्या नेतृत्वाखाली मगधमधून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. मथुरेच्या लोकांना भगवान श्रीकृष्णांनी द्वारकेत आणून वसवलं.

 

मगध सैन्याने मथुरा जाळली. त्या आगीत यादव, कृष्ण आणि बलरामांचा नाश झाला, असं जरसंघाला वाटत होतं, पण हा त्याचा भ्रम होता.

 

‘श्रीमद्भागवत महापुराण’, ‘विष्णुपुराण’ आणि महाभारतातल्या मौसलपर्वात उल्लेख केल्याप्रमाणे श्रीकृष्णाने समुद्रातून दर्यादेवांकडे 12 योजनांची जमीन मागितली.

 

देवांचे शिल्पकार विश्वकर्मा यांनी ही नगरी वसवली. त्यांनी कृष्णाच्या 16 हजार 108 पत्नींसाठी महाल आणि नगरवासीयांसाठी निवासस्थाने बांधली.

 

द्वारकेच्या बेटावर एक किल्ला बांधण्यात आला आणि या नगरात राहणाऱ्या लोकांना ओळखता यावं म्हणून एक विशेष खूण बनवण्यात आली जी द्वारकावासीयांना नेहमी त्यांच्या मानेभोवती गुंडाळावी लागायची.

 

या द्वारकेला ‘सुवर्णनगरी’ हे नाव पडलं.

 

‘श्रीमद्भागवत महापुराण’ मध्ये नमूद केल्याप्रमाणे पृथ्वीवर 125 वर्ष राज्य केल्यानंतर कृष्ण वैकुंठवासी झाले. त्यानंतर श्रीकृष्णाचा महाल सोडून समुद्राने सर्व जमीन परत घेतली.

 

स्थानिकांचं असं म्हणणं आहे की, आजपर्यंत तब्बल सहावेळा द्वारका समुद्रात बुडाली आहे.

 

आठव्या शतकात आदी शंकराचार्यांनी उत्तरेला बद्रिकाश्रम ज्योतीर्पीठ (बद्रीनाथ, उत्तराखंड), पश्चिमेला शारदापीठ (द्वारका, गुजरात), पूर्वेला गोवर्धनपीठ (पुरी, ओडिशा) आणि दक्षिणेला शृंगेरी शारदापीठ (चिकमंगळूर, कर्नाटक) स्थापन केले.

 

यानंतर द्वारकेचं धार्मिक महत्त्व वाढलं. त्यांनी द्वारकेच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला असे मानले जाते.

 

मंदिर आणि स्थानिकांनी मध्ययुगीन काळात अनेक चढउतार पाहिले आहेत आणि त्यानंतरही परदेशातील हिंदूंच्या मनात द्वारकेचं महत्व अनन्यसाधारण आहे.

 

द्वारकेत झालेलं संशोधन, उत्खनन, संवर्धन

सध्या द्वारका, बेट द्वारका, प्रभास-पाटणजवळ असणारी द्वारका आणि पोरबंदर आणि मियाणी यांच्यामध्ये असणाऱ्या द्वारकेत उत्खनन सुरु आहे. पुराणात दिलेल्या माहितीनुसार द्वारकेला रैवतक पर्वताने वेढले होते.

 

सध्याच्या द्वारकेच्या परिसरात डोंगर नसल्यामुळे काही इतिहासकार आणि संशोधकांनी सध्याची द्वारका नगरी ही प्राचीन नगरी नसल्याचं मत मांडलं आहे.

 

मात्र आजपर्यंत द्वारका आणि बेट द्वारका येथे झालेल्या बहुतेक संशोधन-उत्खननाचे सकारात्मक परिणाम मिळाले आहेत.

 

1960-70 च्या दशकात, द्वारका येथे जमिनीवर सापडलेल्या प्राचीन अवशेषांमुळे, पुरातत्वशास्त्रज्ञांनी समुद्रात उत्खनन करण्याचा निर्णय घेतला होता.

 

त्यावेळी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) मध्ये सागरी अभ्यासासाठीची शाखा अस्तित्वात नव्हती. प्रसिद्ध पुरातत्वशास्त्रज्ञ एस.आर. राव यांनी गोवा येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीच्या मदतीने समुद्रनारायण मंदिराच्या पलीकडे संशोधन सुरु केलं.

मेहरामनच्या तळाशी तीन ते 10 मीटर खोलीवर, समुद्रातील वनस्पती आणि वाळू हटवल्यानंतर आयताकृती आणि अर्धगोलाकार आकाराचे दगड सापडले.

 

या दगडांचा आकार नैसर्गिक नव्हता. या दगडांवर छिन्नीचा वापर करून खाचा बनवल्या गेल्या होत्या. यामध्ये लाकडाचा भुसा करण्यासाठी किंवा मग हे दगड एकमेकांना जोडण्यासाठी या खाचांचा वापर केला जात असावा.

 

NIO ला या भागातून 120 नांगर मिळाले होते. जे चुनखडी, बुखारिया दगड, काळ्या दगडापासून बनवलेले होते.

 

या दगडांचे आकार वेगवेगळे असले तरी यामध्ये बनवण्यात आलेली छिद्रं मात्र एकसारखीच होती.

 

या दगडी नांगराचा आकार, परीघ आणि वजन यावर या नांगराचे वय किती आहे याचा अंदाज लावला जाऊ शकतो. जुन्या स्थानिक मच्छिमारांनी संशोधकांना सांगितलं की अशा प्रकारचे नांगर हे 19 व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत वापरले जात होते.

 

त्यामुळे हे नांगर कोणत्या काळातील आहेत हे ठरवण्यासाठी वेगवेगळा अभ्यास करण्यात आला. (Migration and Diffusion, Volume 6, Issue 21, Page No. 56-74)

 

जहाज समुद्रात स्थिर ठेवण्यासाठी, माल चढवताना किंवा उतरवताना जहाजे नांगरून ठेवावी लागतात. हे नांगर जहाजाच्या प्रकारानुसार आणि वाहून नेण्याच्या क्षमतेनुसार वेगवेगळ्या आकाराचे किंवा वजनाचे असू शकतात.

 

संशोधकांना त्रिकोणी, इंडो-अरब शैलीतील आकृती किंवा गोलाकार नांगर सापडले आहेत. त्याचे वजन सुमारे 85 किलोग्रॅम ते सुमारे 500 किलोग्रॅम पर्यंत आहे.

समुद्राच्या तळातील दगडांमध्ये अडकल्याने, दोर तुटल्यामुळे हा नांगर तिथे पडला असावा, असं संशोधकांचं मत आहे. गोलाकार तटबंदीसारख्या आकारामुळे, संशोधकांनी सुचवले आहे की या वास्तू 12व्या किंवा 13व्या शतकातील असाव्यात.

 

यापूर्वी बीबीसीशी बोलताना एएसआयचे अतिरिक्त महासंचालक आलोक त्रिपाठींनी म्हटलं होतं, समुद्रात सापडलेल्या जीवाश्मांच्या आधारे हे निश्चितपणे सांगितले जाऊ शकते की हे एक प्राचीन बंदर आहे.

 

आलोक त्रिपाठी यांनी 2007 मध्ये द्वारका समुद्र संशोधन मोहिमेचं नेतृत्वही केलेलं होतं.

 

पाण्याखालील गोष्टींचं संशोधन करणाऱ्या पुरातत्वशास्त्रज्ञांची अनुपलब्धता, मर्यादित संसाधनं आणि वर्षभरात केवळ दोन ते तीन महिन्यांचा संशोधन काळ यामुळं हे संशोधन अत्यंत संथ गतीने सुरु आहे.

 

द्वारका, समुद्र आणि ग्रामीण भाग

द्वारकेचा समुद्रकिनारा हे मुंबई ते कराची, कच्छ ते मुंबई, गुजरात ते अरबस्तान आणि आफ्रिका या व्यापार मार्गावरील महत्त्वाचं स्थानक होतं.

 

मात्र, सुलतानी काळात कंपनी सरकार, ब्रिटिश सरकार आणि नंतर गायकवाड सरकारच्या काळात येथे समुद्री चाच्यांचे वास्तव्य होते. मोहम्मद बेगडा, कंपनी सरकार आणि नंतर इंग्रजांनी या चाच्यांना संपवण्यासाठी वेगवेगळ्या मोहिमा केल्या, अशी इतिहासात नोंद आहे.

 

आजही द्वारका व आसपासच्या गावात विशेष शेती केली जात नाही. त्यामुळे या बंदरामधून कृषी उत्पादनांसोबतच प्रवासी, मीठ आणि इतर मालाची तस्करी केली जात असावी असा अंदाज बांधता येतो.

 

कल्याणराय जोशी त्यांच्या ‘द्वारका’ या पुस्तकात (पान क्र.121-126) लिहितात की, इथली जमीन शेतीपूरक नसल्याने, वाणियांची किंवा पाटीदारांची विशेष लोकवस्ती इथे नाही.

 

मात्र, येथे भाटिया आणि लोहणा (ठक्कर) यांचे अस्तित्व आहे ज्यांनी सागरी व्यापार जोपासण्यासाठी इथे काम केलं होतं.

 

या दोन्ही समाजातील लोकांच्या अनेक पिढ्या इथे राहिल्या आहेत किंवा ते मुंबई, सुरत, कराची, कटक, बालासिनोर आणि पुणे येथे हे लोक स्थलांतरित झाले आहेत.

 

द्वारकेच्या व्यापाऱ्यांचे रंगून, अरेबिया, मस्कत, आफ्रिका आणि झांझिबार यांच्याशी व्यापारी संबंध असल्याचे पुरावे आढळतात.

 

मांडवी ते मुंबईपर्यंत जाणारी जहाजं द्वारकेला हमखास थांबत असत. याच स्थानकावरून बहुतांश लोक या जहाजामध्ये चढत किंवा उतरत असत.

 

इतिहासाची पुनरावृत्ती का होते?

अनेक शतकांपूर्वी समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्याने द्वारका एकापेक्षा जास्त वेळा पाण्याखाली बुडाल्याचे वैज्ञानिक पुरावे आहेत. CSIR-NIO चे माजी मुख्य शास्त्रज्ञ डॉ. राजीव निगम म्हणतात की,

 

“सुमारे 15,000 हजार वर्षांपूर्वी समुद्राची पातळी आताच्या तुलनेत 100 मीटरने कमी होती. नंतर समुद्राची पातळी पुन्हा थोडी वाढली आणि 7,000 वर्षांपूर्वी ती आताच्यापेक्षाही जास्त होती.

 

त्यानंतर सुमारे 3500 वर्षांपूर्वी ही पातळी पुन्हा खाली आली आणि त्याच सुमारास द्वारका शहराची स्थापना झाली. परंतु नंतर समुद्राची पातळी पुन्हा वाढू लागली आणि शहर बुडू लागले.”

NIO च्या संशोधकांनी असा निष्कर्ष काढला की समुद्राची पातळी दरवर्षी चार मीटरने वाढत आहे. भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते कच्छच्या रणामध्ये जमिनीची धूप होण्याची दाट शक्यता आहे.

 

सुमारे 175 वर्षांपूर्वी, द्वारकेच्या उत्तरेला दोन किलोमीटर अंतरावर रुपेन नावाचे नवीन बंदर विकसित झाले, ज्यामुळे द्वारका बंदराचाही ऱ्हास झाला असावा असा अंदाज लावण्यात आला.

 

या बंदरामध्ये बोटी लाकडाच्या नांगराने रोवल्याची नांगरल्याच्या खुणा सापडतात. तिथे समुद्राच्या तळाशी द्वारकेसारख्याच दगडी रचनाही सापडली आहे.

 

नेचर कम्युनिकेशन जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, सूरत, कच्छ, भावनगर आणि भरूच या भागावर परिणाम होऊ शकतो मात्र डावरी, हजीरा आणि कांडला यांच्यावर मात्र मोठा परिणाम होऊ शकतो.

 

जामनगर, देवभूमी द्वारका, पोरबंदर, जुनागढ, अमरेली, नवसारी, वलसाड आणि गिरसोमनाथला या भागावर मध्यम ते हलका परिणाम पडेल.

 

याशिवाय कच्छ पुन्हा एकदा बेट बनण्याची भीतीही या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

 

Published By- Priya Dixit 

 

 

 

 

गुजरातच्या द्वारका जिल्ह्यात पश्चिमेकडील समुद्रकिनाऱ्यावर वसलेली द्वारकानगरी कोट्यवधी हिंदूंचे पवित्र स्थान म्हणून ओळखली जाते.
भारताच्या सांस्कृतिक इतिहासात आणि हिंदू धर्माच्या पुस्तकांमध्येही द्वारकेचा उल्लेख श्रीकृष्णाने वसवलेलं शहर असा केला …

Go to Source