सदर महाल : तामिळनाडूमधला तो राजवाडा जिथे होतं इथल्या मराठ्यांचं सिंहासन
social media
तंजावरचा सदर महल पॅलेस… तामिळनाडूतल्या मराठी साम्राज्याचं सिंहासन इथेच होतं. तंजावर आणि आसपासच्या भागावर जवळपास दोनशे वर्षं मराठ्यांचं साम्राज्य होतं.
शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे इथले पहिले मराठी राजे होते. 1675 ते 1855 दरम्यान 12 मराठा राजांनी तंजावरमध्ये राज्य केलं.
मराठे सत्तेत येण्याआधी सदर महल हा राजवाडा शिवगंगा किल्ला म्हणून ओळखला जायचा. 1535 मध्ये नायक राजांनी तो उभारला होता.
120 एकरांवर पसरलेल्या या राजवाड्याचे सात भाग होते. यातला बराचसा भाग हा आज तामिळनाडू सरकारच्या ताब्यात आहे. काही भागांत म्युझियम आहे. काही भागांत सरकारी कार्यालयं, तर काही भागांत दुकानं-शाळा आहेत आणि धर्मशाळासुद्धा आहेत. अर्सेनल टॉवर, बेल टॉवर, दरबार हॉल, सरस्वती महल लायब्ररी आणि सर्जा माडी हे या पॅलेस कॉम्पलेक्सचे मुख्य भाग आहेत.
मराठा आणि नायक राजांनी कलेची आणि विद्येची केलेली कदर इथे पदोपदी दिसून येते.
192 फुटांचा अर्सेनल टॉवर किंवा गोडा गोपुरम मराठ्यांनी अठराव्या शतकात बांधला. शस्त्रांचा साठा आणि परिसराची निगराणी यांसाठी त्याचा वापर व्हायचा.
या गोडा गोपुरमच्या समोरच सात मजल्यांचा बेल टॉवर आहे. स्थापत्य कलेचा एक उत्तम नमुना म्हणून या बेल टॉवरकडे पाहिलं जातं.
सदर महल पॅलेसमधील संग्रहालय प्रमुख शिवकुमार सांगतात की, हा राजवाडा नायक राजांनी बांधला. त्यानंतर तो मराठे आणि इंग्रजांच्या हातात गेला. 1951 मध्ये इथं आर्ट गॅलरी सुरू करण्यात आली. इथे 200 पेक्षा जास्त दगडाच्या मूर्ती आहेत, तर 195 पितळेच्या प्राचीन मूर्ती इथे ठेवण्यात आल्या आहेत.
इथलं राजा सर्फोजी मेमोरियल हॉल पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे. याच भागात शेवटचे मराठा राजे सर्फोजी दुसरे हे राहायचे. स्थापत्य कला आणि सुंदर चित्रांसाठी हा हॉल प्रसिद्ध आहे.
या हॉलमध्ये राजे सर्फोजी दुसरे यांचा पुतळा आहे. या पुतळ्याचा इतिहासही खूप रंजक आहे
शिवकुमार सांगतात की, “मिनी दरबार हॉलमधला राजे सर्फोजी भोसले यांचा पुतळा इंग्रजांनी त्यांना वाढदिवसाची भेट म्हणून दिला होता. संपूर्ण पुतळा हा इटालियन मार्बलचा आहे. महाराजांचे आणि इंग्रजांचे संबंध खूप चांगले होते. त्याचीच निशाणी ही भेटवस्तू आहे.
या पुतळ्यावरील कलाकुसर बारकाईची, आखीवरेखीव आहे. पुतळ्याच्या डोक्यावरची पगडी काढता येऊ शकते, तसंच कंबरेला तलवार अडकविण्यासाठीही जागा आहे.”
या राजवाड्याचं आणखी एक वैशिष्ट्यं म्हणजे शेकडो वर्षं जुनी सरस्वती महल लायब्ररी. नायक राजांनी स्थापन केलेल्या या ग्रंथालयाचं राजे सर्फोजी दुसरे यांनी आधुनिकीकरण केलं. इथे जगभरातील महत्त्वाची पुस्तकं आणली. आज इतिहासाच्या अभ्यासकांसाठी ही लायब्ररी म्हणजे एक खूप मोठा खजिना आहे.
या राजवाड्यात किमान तीन गुप्त खोल्या आणि दोन गुप्त भुयारं असल्याचं सांगितलं जातं. पण सुरक्षेच्या कारणास्तव आता ही भुयारं आणि खोल्या बंद आहेत.
शिवकुमार सांगतात की. दरबार हॉलला लागूनच पुढे काही गुप्त भुयारं आहेत. आणीबाणीच्या परिस्थितीत त्यांचा वापर केला जायचा. नदीच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठीही या भुयारांचा उपयोग व्हायचा.
नायकांच्या या राजवाड्यावर मराठ्यांचा प्रभाव कसा पडला याचा उत्तम नमुना म्हणजे सर्जा महल किंवा सर्जा माडी. काशी यात्रेदरम्यान तिथल्या घाटावर असलेल्या वाड्यांची रचना पाहून सर्फोजी राजेंना या महालाची कल्पना सुचली.
प्रतापसिंह भोसले, भोसले घराण्याचे वंशज आणि लेखक सांगतात की. सर्जा महाल सर्फोजी दुसरे यांनी बांधला आहे.1824 मध्ये हा महाल बांधल्याचं सांगितलं जातं. या इमारतीचं बांधकाम पाश्चिमात्य आभियांत्रिकी शैलीचा वापर करून करण्यात आलं आहे. सर्फोजी राजेंच्या काळात सर्जा महालमधूनच महालात येता यायचं असं आपण ऐकल्याचं प्रतापसिंह भोसले सांगतात.
आता या वाड्याचंही म्युझियममध्ये रुपांतर करण्यात आलं आहे. तंजावर पेंटिंगचे काही नमुने इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी मांडण्यात आले आहेत.
मराठ्यांनी तंजावरमध्ये अन्नछत्रं, शाळा, मंदिरं, रुग्णालयं आणि स्वतःच्या राहण्यासाठी काही इमारती बांधल्या. सध्या यातल्या बहुतांश इमारती या तामिळनाडू सरकारच्या ताब्यात आहेत. त्यातल्या अनेक इमारती या जीर्णही झाल्या आहेत.
तंजावरमधील भोसले घराण्याचे तेरावे वंशज युवराज बाबाजीराजे भोसले यांनी सांगितलं की, राज्य खालसा झालेलं 1855 मध्ये, म्हणजे जवळपास दीडशेहूनही जास्त वर्षं होऊन गेली. या सगळ्या इमारती आम्ही छत्रम प्रशासन म्हणून सरकारच्या ताब्यात दिल्या. पूर्वी या इमारतींचा वेगवेगळ्या कारणासाठी वापर व्हायचा. त्यामुळे त्यांची देखभालही नीट होत राहायची.
पण हळूहळू त्यांचा वापर कमी होत गेला, तशा या इमारती जीर्ण व्हायला लागल्या. पण या इमारती अजून काही शे वर्षं टिकून राहतील इतक्या मजबूत आहेत. त्यांना देखभालीची थोडीशी आवश्यकता आहे.
राजवाड्यातील लोकांना उन्हाळ्यात राहण्यासाठी कावेरीच्या तटावर बांधण्यात आलेले वाडे आणि स्थानिक देवतांच्या उत्सवासाठी बांधण्यात आलेल्या वास्तू अजूनही सुस्थितीत आहेत. पण त्यांनाही डागडुजीची गरज आहे.
काळ पुढे सरकतोय तसा तंजावरमधला मराठी माणूस कामानिमित्त बाहेर पडतोय. एकेकाळी इथे हजारांच्या घरात मराठी कुटुंब राहायची. आता त्यांची संख्या 300 च्या आसपास आहे.
पण इथली काही मराठा घराणी आपलं मराठमोळेपणं टिकवून आहेत. त्यांपैकी एक आहे गाडेराव साहेब घराणं. तंजावरपासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या त्रिपुन्नतीमध्ये त्यांचं एकमेव मराठी घरं आहे.
मराठीपण टिकून राहण्याचं एक मुख्य कारण महाराष्ट्रात केलेल्या सोयरिकी असल्याचं विश्वजीत गाडेराव साहेब सांगतात.
आमचे नातेसंबंध महाराष्ट्रातच आहेत. माझी पत्नी बारामतीची आहे. माझ्या मुलाचंही लग्न झालंय. त्याची पत्नी आणि आमची सून नातेपुतेजवळच्या महाडिक-देशमुखांच्या कुटुंबातील आहे. इथे आम्ही दोन्ही संस्कृती पाळत राहतो, ते सांगतात.
इथल्या सर्वच मराठी कुटुंबांनी मराठीसोबतच तमिळ संस्कृतीही आपलीशी केली आहे. पण आता तंजावरमधल्या मराठ्यांच्या पाऊलखुणा आणि मराठीपण तसंच जपून ठेवणं हे त्यांच्यासमोरचं मोठं आव्हान आहे.
Published By- Priya Dixit
शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे इथले पहिले मराठी राजे होते. 1675 ते 1855 दरम्यान …