सीआरपीएफ डीआयजी खजान सिंग बडतर्फ

सीआरपीएफ डीआयजी खजान सिंग बडतर्फ

लैंगिक शोषणाचा आरोप, केंद्र सरकारची कारवाई
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारने देशातील सर्वात मोठे निमलष्करी दल ‘सीआरपीएफ’चे डीआयजी खजान सिंग यांना बडतर्फ केले आहे. त्यांच्यावर काही महिला कर्मचाऱ्यांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्यांनी यापूर्वीच आपल्यावरील आरोप फेटाळून लावले असले तरी लैंगिक छळाच्या एका प्रकरणात सीआरपीएफने त्यांना दोषी ठरवल्यानंतर केंद्र सरकारकडून बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.
सीआरपीएफमधील डीआयजी रँकच्या माजी मुख्य क्रीडा अधिकाऱ्यावर लैंगिक छळाच्या आरोपांच्या संदर्भात दोन महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने बडतर्फ करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. केंद्रीय गृह मंत्रालयाने डीआयजी खजान सिंग यांच्याविरोधात बडतर्फीची नोटीस बजावली होती. युपीएससीची शिफारस स्वीकारल्यानंतर मंत्रालयाने हे पाऊल उचलले होते. यासंबंधी आरोपी अधिकाऱ्याचे उत्तर आल्यानंतर यासंदर्भातील अंतिम आदेश जारी करण्यात आला आहे.
खजान सिंग हे सीआरपीएफचे मुख्य क्रीडा अधिकारी राहिले आहेत. 1986 मध्ये सेऊल आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी 200 मीटर बटरफ्लाय स्विमिंगमध्ये रौप्यपदक जिंकले होते. 1951 नंतर भारताचे जलतरणातील हे पहिले पदक होते.