शहरात विविध ठिकाणी योग दिन साजरा

शहरात विविध ठिकाणी योग दिन साजरा

बेळगाव : जिल्हा प्रशासन, विविध संस्था, पतंजली योग संस्था, युवक आणि महिला मंडळे व तमाम बेळगावकरांतर्फे दि. 21 रोजी 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शहर परिसरात पहाटे 6 पासून साधारण 9 वाजेपर्यंत योगदिनाचे औचित्य साधून योगासनांचे प्रात्यक्षिक तसेच सराव करण्यात आला. शाळा व महाविद्यालयांमध्येही योग दिन साजरा करण्यात आला.
मराठा लाईट इन्फंट्री
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे योग दिन अत्यंत उत्साहात साजरा केला. ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी योगदिनाचे उद्घाटन केले. त्यानंतर उपस्थित जवानांना मार्गदर्शन करताना योग केवळ शरीर स्वास्थ्यासाठी नव्हे तर मानसिक स्वास्थ्यासाठीसुद्धा उपयोगी आहे. त्यामुळे त्याचा नियमित सराव करावा, असे सांगितले. यानंतर जवान व त्यांच्या कुटुंबीयांनी योगासने सादर केली. हटयोग, प्राणायाम, ध्यानधारणेचे तंत्र आदीचे सादरीकरण यावेळी केले. मनाच्या एकाग्रतेसाठी जवानांना योग अतिशय उपयुक्त असल्याने त्याचा सराव नेहमीच करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
आरोग्य भारती
आरोग्य भारती बेळगाव शाखेतर्फे योग दिन संत मीरा हायस्कूलच्या माधव सभागृहात साजरा केला. ओमकार स्तवन, दीपप्रज्वलन, धन्वंतरी स्तवन झाले. प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. सोनाली सरनोबत होत्या. माय योग अकादमीच्या महिला योग साधकांनी योग नृत्य सादर केले. योगपटू शिवाजीराव बेकवाडकर यांनी योगासने करवून घेतली. सूत्रसंचालन मुकुंद गोखले यांनी तर स्वागत बेळगाव विभाग संयोजक वासुदेव  यांनी केले. यावेळी सोनाली सरनोबत म्हणाल्या, आज आरोग्य जपण्यासाठी अष्टांग योग अत्यंत आवश्यक आहे, त्याचबरोबर आहार पद्धती बदलणे खूप गरजेचे आहे. दैनंदिन जीवनात पारंपरिक आहार सेवन करण्याशिवाय पर्याय नाही. अवती भवती पिकणारी फळे, धान्य व आहार वापरले पाहिजे.
जलाराम फाऊंडेशन
जलाराम फाऊंडेशनतर्फे क्वीन्स गार्डन येथे योग दिन साजरा केला. यावेळी अरुणोदय मॉर्निंग वॉकर्स ग्रुपच्या सदस्यांनी गार्डनमध्ये फणस, चिंच, आंबा, कडूनिंब, जांभूळ व इतर रोपांची लागवड केली. याप्रसंगी ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते.
सीए संस्था
चार्टर्ड अकौंटंट्स ऑफ इंडियाच्या बेळगाव शाखेतर्फे सोमवार पेठ येथील एओएल हॅपीनेस सेंटर येथे योग दिन साजरा केला. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सहकार्याने साजऱ्या झालेल्या या कार्यक्रमात अध्यक्ष राजेंद्र मुंदडासह सर्वांनी योगासनांचा सराव केला.
जायंट्स परिवार
जायंट्स परिवारतर्फे बीएएस जिम, अंजनेयनगर येथे योग दिन साजरा केला. प्रशिक्षक रश्मी पुजारी यांनी 6 ते 8.30 या वेळेत योगासनांचे विविध प्रकार करून घेऊन योग का करावा? याची माहिती दिली. जायंट्सतर्फे त्यांचा सत्कार केला. सूत्रसंचालन गंगाधर व राजू माळवदे यांनी केले.
जिल्हा प्रशासन
निरोगी जीवनासाठी योग अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रतिदिन योगसाधना केल्याने आपण निरोगी राहतो व आपले मन प्रसन्न राहते. याशिवाय बौद्धिक विकासासाठीसुद्धा योग आवश्यक आहे. आजच्या ताणतणावपूर्ण जीवनामध्ये योग एक उत्तम उपचार होऊ शकतो, असे मत खासदार शेट्टर यांनी व्यक्त केले. जि. प्रशासन, जि. पं., मनपा, जिल्हा आयुष विभाग यांच्या सहयोगाने केपीटीसीएल भवन येथे योग दिन कार्यक्रमात ते बोलत होते. बैठी जीवनशैली, बदलती खाद्यसंस्कृती, श्रमरहित जीवनपद्धती यामुळे आज अनेक रोग उद्भवत आहेत. या सर्वांना उत्तर म्हणजे योगसाधना होय. योग ही भारताची देणगी असली तरी आज सर्व देश आपले अनुकरण करत आहेत.यावेळी विधान परिषद सदस्य हनुमंत निराणी, जिल्हा आयुष अधिकारी श्रीकांत सुनधोळ, जर्मनी, फ्रान्स, कॅनडा, इंग्लंड, रशिया येथील योगपटू तसेच आरोग्य, पोलीस खात्याचे अधिकारी, विविध सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी, विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
संजीवीनी फौंडेशन
संजीवीनी फौंडेशनतर्फे योग दिन  उत्साहात झाला. सीईओ मदन बामणे यांनी स्वागत करताना शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांती व आध्यात्मकितेमध्ये वाढ होण्यासाठी योगा महत्त्वाचा आहे. आज जगभर योग दिन साजरा होत असताना संजीवीनी फौंडेशनमध्येही योग दिन साजरा केला असल्याचे सांगितले. मदन बामणे यांनी ज्येष्ठ योगगुरू डॉ. मुऊगेंद्र पट्टणशेट्टी यांचा स्मृतिचिन्ह व तुळसीचे रोपटे देऊन सन्मान केला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय समुपदेशक लक्ष्मी भेंडवाड यांनी करून दिला. डॉ. मुऊगेंद्र पट्टणशेट्टी यांनी योग साधनेबद्दल माहिती सांगून योगा केल्याने मन मस्तिष्क आणि शरीर तंदुऊस्त राहते. त्यामुळे प्रत्येकाने योगा केलाच पाहिजे असल्याचे सांगून उपस्थितांना विविध योग प्रकार शिकवले. उपस्थितांनी योग साधनेमध्ये भाग घेऊन नियमितपणे योगा करण्याबद्दल अभिवचन दिले. सूत्रसंचालन पद्मा औषेकर यांनी केले. सरिता सिद्दी यांनी आभार मानले.
एक्सलंट योगा क्लास
एक्सलंट योगा क्लासेसतर्फे हिंदवाडी येथील घुमटमाळ मारुती मंदिरमध्ये योग दिन साजरा केला. अध्यक्षस्थानी योगगुरु एस. बी. कुलकर्णी होते. यावेळी त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. नियमितपणे योगसाधना केल्यास सुदृढ आरोग्य कमवता येते, असे कुलकर्णी सांगितले. याप्रसंगी अनंत लाड, हिरालाल पटेल, किसन दड्डीकर, संदीप मोरे उपस्थित होते.
सत्यविनायक योग केंद्र
सत्यविनायक योग केंद्रातर्फे अनसुरकर गल्ली येथील छत्रेवाड्यात योग दिन साजरा केला. योगगुरु सुभाष इनामदार यांनी गणेशपूजन केले. मागील 9 वर्षांपासून याठिकाणी योगाचे मोफत धडे दिले जात आहेत. यावेळी योगाचे महत्त्व व आरोग्यासाठी फायदे याबाबत माहिती दिली. दिप्ती मालशेट व मीनाक्षी कुलकर्णी यांनी योगाबाबतची गाणी सादर केली. याप्रसंगी विद्या भेंडिगेरी, प्रतीज्ञा इनामदार, सुवर्णा कणबरकरसह योग साधक होते. सूत्रसंचालन सुनिता लजारे यांनी तर लीला लजारे यांनी आभार मानले.
हिंडलगा कारागृह
हिंडलगा कारागृहात अधिकारी व कैद्यांसाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आर्ट ऑफ लिव्हिंगचे योगशिक्षक महेश केरकर, मल्लनगौडा पाटील, प्रवीण शेरी यांच्या उपस्थितीत योगाचे धडे दिले. अध्यक्षस्थानी कारागृहाचे अधीक्षक बी. एम. कोट्रेश होते. यावेळी साहाय्यक अधीक्षक व्ही. कृष्णमूर्ती, कारागृहातील शिक्षक शशिकांत यादगुडे, जेलर बसवराज बजंत्री, एफ. टी. दंडयन्नवर, रमेश कांबळे उपस्थित होते. निरोगी जीवनासाठी योगाचे महत्त्व, विविध आसने, प्राणायामची प्रात्यक्षिकांसह माहिती दिली.
इतरांसाठी नव्हे तर स्वत:साठी योगा करा : खासदार इराण्णा कडाडी
‘योगा फॉर सेल्फ अँड सोसायटी’ हे ब्रीदवाक्य घेऊन यंदाचा योग दिन जगभरात साजरा होत आहे. योग साधनेमुळे रोग दूर राहून निरोगी व सशक्त समाज निर्माण होत आहे. त्यामुळे निरोगी आयुष्यासाठी प्रत्येकाने योगासने करा, असे विचार राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी व्यक्त केले. योगदिनाचे औचित्य साधत नागरिकांना मार्गदर्शन करताना कडाडी यांनी योगाचे महत्त्व पटवून दिले. जगभरातील लोक भारतीयांचे अनुकरण करू लागले आहेत. इतरांसाठी नाही तर किमान स्वतसाठी तरी योगासने करावीत, असे त्यांनी सांगितले.
मराठा मंदिर
मराठा मंदिर ट्रस्ट रामतत्त्व योग मंदिर व योग विद्याधाम यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा मंदिरमध्ये योग दिन साजरा केला. मराठा मंदिरचे अध्यक्ष अप्पासाहेब गुरव यांच्या हस्ते उद्घाटन केले. यावेळी सचिव बाळासाहेब काकतकर, संचालक शिवाजी हंगीरकर उपस्थित होते. याप्रसंगी शेकडो योग साधकांनी योगासने सादर केली. मागील 25 वर्षांपासून योगासनांचे वर्ग अखंडपणे सुरू आहेत. याठिकाणी प्रशिक्षण घेतलेल्या 30 जणांची नाशिक येथे होणाऱ्या भारतीय योग विद्याधामच्या शिबिरासाठी प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे. त्यांचा गौरव मराठा मंदिर ट्रस्टच्यावतीने करण्यात आला.