मनपा कर्मचारी ‘रक्कम’ उल्लेख प्रकरण शेकणार

मनपा कर्मचारी ‘रक्कम’ उल्लेख प्रकरण शेकणार

लोकायुक्त जिल्हा पोलीसप्रमुखांनी प्रकरण घेतले गांभीर्याने
बेळगाव : महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयात हजर झाल्यानंतर आपल्याकडे असलेल्या रकमेबाबतचा उल्लेख रजिस्टरमध्ये केला पाहिजे. मात्र बहुसंख्य कर्मचारी व अधिकाऱ्यांनी तशा प्रकारचा उल्लेखच केला नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे लोकायुक्त जिल्हा पोलीसप्रमुख हणमंत राय यांनी मनपातील अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. महत्त्वाचे म्हणजे कायद्यानुसारच हा उल्लेख झाला पाहिजे. तसे झाले नसल्याने त्यांना नोटीस बजाविण्यात येण्याची शक्यता आहे. नगर नियोजन विभागामध्ये याबाबत कर्मचाऱ्यांची कसून चौकशी केली आहे. नगर नियोजनाधिकाऱ्यांनी आपल्याकडे असलेल्या रकमेबाबतची माहिती त्या रजिस्टरमध्ये केली होती. मात्र तेथील इतर कर्मचाऱ्यांनी उल्लेखच केला नाही. त्यामुळे लोकायुक्त जिल्हा पोलीसप्रमुखांनी तेथील कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. यावेळी नगर नियोजन अधिकाऱ्यांनी लोकायुक्त अधिकाऱ्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र तुम्ही वरिष्ठ अधिकारी असून त्या रकमेचा उल्लेख केला आहात. मात्र इतर कर्मचाऱ्यांनी तो नियम का पाळला नाही? असा प्रश्न उपस्थित केला. कायद्यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या विभागामध्ये येताना रजिस्टरमध्ये आपल्याकडे असलेल्या रकमेचा उल्लेख करणे बंधनकारक आहे. मात्र महानगरपालिकेतील एक-दोन कर्मचारी वगळता इतर कोणीच उल्लेख केला नाही. त्यामुळे लोकायुक्त जिल्हा पोलीसप्रमुखांनी याची गांभीर्याने दखल घेतली असून हे प्रकरण महानगरपालिकेला चांगलेच शेकण्याची शक्यता आहे.
चिरीमिरीसाठीच कामे प्रलंबित ठेवल्याचा संशय
प्रलंबित कामांची माहिती योग्यप्रकारे दिली गेली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे इतर अधिकाऱ्यांनी त्या फायलीसंदर्भातील माहिती देण्यास विलंब केला आहे. हा प्रकारही उघडकीस आला असून काहीजण चिरीमिरीसाठीच कामे प्रलंबित ठेवल्याचा संशय व्यक्त होत आहे. एकूणच महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांकडून वेळेत कामे होत नाहीत. त्यामुळे लोकायुक्त पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे. या कारवाईचे जनतेतून स्वागत होत आहे.
मनपाचे अधिकारी-कर्मचारी लागले कामाला : प्रलंबित कामे निकालात काढण्यासाठी धडपड
लोकायुक्तांनी महानगरपालिकेत धडक मारली. त्या ठिकाणी सर्वच विभागात भेट देऊन अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. याचबरोबर प्रलंबित असलेल्या कामांची माहिती घेतली. कामे का पूर्ण झाली नाहीत? याचे उत्तर देण्याचा आदेश बजाविण्यात आला आहे. त्यामुळे बुधवारी महानगरपालिकेतील सर्वच विभागातील कर्मचारी जोमाने कामाला लागल्याचे दिसून आले. लोकायुक्त जिल्हाप्रमुख हणमंत राय यांनी मंगळवारी अचानकपणे महानगरपालिकेला धडक दिली. त्यावेळी सर्वच विभागात एकाचवेळी लोकायुक्त पोलीस व कर्मचारी दाखल झाल्याने महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली होती. नेमके काय घडले आहे?, हे अधिकारी कशासाठी आले आहेत? हेच समजणे अवघड झाले. त्यामुळे महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांची धावपळ उडाली होती. लोकायुक्त जिल्हा पोलीसप्रमुख हणमंत राय यांनी हजेरीबुकासह प्रलंबित कामांबाबत सर्व माहिती घेतली. कामासाठी आलेल्या व्यक्तींची विचारपूस केली. कोणत्या कामांसाठी आला आहात, कधी अर्ज केला आहात, अधिकाऱ्यांनी अद्याप काम का केले नाही? याची सर्व कारणमीमांसा केली. जन्म आणि मृत्यू दाखला विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग, प्रशासकीय विभाग या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांशी विचारपूस केली. विविध विभागामध्ये कामे प्रलंबित असल्याचे दिसून आले. कामे का प्रलंबित आहेत, याची उत्तरे द्या, असे सुनावले. कोणत्या विभागात अधिक कामे प्रलंबित आहेत, याबाबतही माहिती त्यांनी घेतली आहे. त्यामुळे आता बेजबाबदार आणि कामचुकार अधिकाऱ्यांना नोटिसा येणार हे निश्चित आहे. लोकायुक्तांच्या या धाडीमुळे साऱ्यांचेच धाबे दणाणले आहेत. लोकायुक्त पोलिसांनी विचारलेल्या कागदपत्रांची जुळवाजुळव करून त्यांना पाठविण्यासाठी कर्मचाऱ्यांची बुधवारी धडपड सुरू असल्याचे दिसून आले.