टोल चुकवणाऱ्यांवर खानापूर पोलिसांकडून तपास सुरू

टोल चुकवणाऱ्यांवर खानापूर पोलिसांकडून तपास सुरू

एनएचआय अधिकारी, गणेबैल टोल व्यवस्थापक, अशोका बिल्डकॉन, भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल
खानापूर : गणेबैल टोलनाक्यावर मंगळवारी काँग्रेसच्यावतीने रास्ता रोको करून टोलपासून सवलत मिळवून सरकारची फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हे नोंद करण्यात यावेत, तसेच शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईची तातडीने पूर्तता करण्यात यावी, या मागणीसाठी काँग्रेसच्यावतीने मंगळवारी दोन तास रास्ता रोको करून आंदोलन केले होते. यावेळी खानापूर पोलीस स्थानकाचे निरीक्षक रामचंद्र नाईक यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले होते. आश्वासनाप्रमाणे रामचंद्र नाईक यांनी मंगळवारी रात्री उशिरा टोलनाक्याच्या व्यवस्थापकाकडून झालेल्या मनमानी कारभाराबाबत गुन्हे नोंद करण्यात आले असून यात धारवाड येथील एनएचआयचे अधिकारी, व्यवस्थापकीय अधिकारी अशोका बिल्डकॉन, गणेबैल टोल व्यवस्थापक, तसेच खानापूर भाजप नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामचंद्र नाईक यांनी दिली.
बेळगाव-गोवा महामार्गावर गेल्यावर्षी जून महिन्यापासून टोल आकारणी सुरू करण्यात आली आहे. करंबळ ते मच्छेपर्यंत 16 कि. मी. रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. या रस्त्यावर गणेबैल येथे टोलनाका उभारून टोल वसुली सुरू करण्यात आली आहे. याबाबत यापूर्वीही अनेकवेळा आंदोलने झाली होती. मात्र मंगळवारी काँग्रेसच्यावतीने टोलनाक्याच्या मनमानी कारभाराविरोधात माहिती मिळवून आंदोलन करण्यात आले. यात गेल्या वर्षभरापासून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक वाहनांना या टोलपासून सवलत मिळविली होती. याची माहिती काँग्रेसच्या हाती लागताच त्यांनी मंगळवारी अचानकपणे रास्ता रोको करून टोलपासून सवलती मिळवणाऱ्यांवर कारवाई करावी व त्यांच्याकडून वर्षभराचा टोल सरकार जमा करावा, अशी मागणी केली होती. तसेच शेतकऱ्यांना शासनाने तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली होती. यावेळी दोन तास रास्ता रोको झाल्याने वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. त्यामुळे शेकडो प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. मात्र कोणतेही प्रशासकीय अधिकारी याबाबत निर्णय घेण्यास तयार नव्हते. त्यावेळी खानापूर पोलीस स्थानकाचे निरीक्षक रामचंद्र नाईक यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून सवलत मिळणाऱ्यावर वाहनमालकांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते. त्यानुसार निरीक्षक रामचंद्र नाईक यांनी फिर्यादीची दखल घेऊन गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे.
एनएचआयचा संबंध नाही
याबाबत धारवाड येथील एनएचआयच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आमच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांवर नाहक गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. आम्ही लिखित अथवा तोंडी कोणत्याही वाहनांना टोलपासून सवलत देण्याचे कुठेही सूचना किंवा आदेश दिलेला नाही. टोल आकारणी आणि एनएचआयचा काहीही संबंध येत नसून टोल आकारणीसाठी वेगळेच व्यवस्थापन आहे. त्यामुळे या टोलनाक्याशी एनएचआयचा संबंध येत असून आम्ही कोणाच्याही वाहनांची शिफारस केलेली नाही. त्यामुळे आमचे म्हणणे आम्ही पोलिसांसमोर मांडू, असे ते म्हणाले.
आम्ही कोणताही गैरप्रकार केलेला नाही : संजय कुबल
यावेळी भाजपाध्यक्ष संजय कुबल म्हणाले, टोलवसुलीचे कंत्राट हे खासगी कंत्राटदाराला देण्यात आले आहे. कंत्राटदाराने कुणाला मुभा द्यायची हा त्याचा प्रश्न असतो. त्यामुळे आम्ही कोणताही गैरप्रकार केलेला नसल्याने आम्ही पोलिसांना योग्य ते उत्तर देऊ, असे ते म्हणाले.