रविवारी सकाळी चित्ररथ मिरवणुकीची सांगता

रविवारी सकाळी चित्ररथ मिरवणुकीची सांगता

यंदा मंडळांचा सहभाग कमी : साऊंड सिस्टीममुळे विस्कळीतपणा, पोलिसांकडून मार्गात कपात
बेळगाव : वळीव पावसाच्या दमदार हजेरीनंतरही बेळगाव येथील शिवभक्तांनी चित्ररथ मिरवणूक यशस्वी करून दाखविली. पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या शिवजयंती मिरवणुकीची ख्याती सर्वदूर आहे. महाराष्ट्र, कर्नाटक व गोव्यातून ही वैभवशाली मिरवणूक पाहण्यासाठी शिवभक्त बेळगावला येतात. यंदा पावसामुळे काहीसा खंड पडला तरी शिवप्रेमींचा उत्साह मात्र अखंड होता. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चित्ररथ मिरवणूक होणार की नाही? या विषयी कार्यकर्त्यांत संभ्रमावस्था होती. अखेर शिवजयंती उत्सव मंडळ व प्रशासन यांच्यात झालेल्या चर्चेनंतर पारंपरिक पद्धतीने होणारी मिरवणूक ठरल्याप्रमाणे होणार हे निश्चित झाले. त्यानंतर कार्यकर्ते कामाला लागले. संभ्रमावस्थेमुळे अनेक मंडळांनी यंदा आपला देखावा रहित केला. शनिवारी 11 मे रोजी रात्री नरगुंदकर भावे चौक येथे पालखी पूजनाने मिरवणुकीला सुरुवात झाली. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, नगरसेवक रवी साळुंखे, मदन बामणे, रणजित चव्हाण-पाटील आदींसह अनेक जण उपस्थित होते. पालखी पूजनानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. यंदा दुपारपासूनच मिरवणूक मार्गावर चित्ररथ उभे करण्यात आले होते. त्यामुळे वेळेत मिरवणूक सुरू होणार ही आशा होती. मात्र, पावसामुळे मिरवणूक लांबली.
प्रत्यक्षात 11.30 नंतर चित्ररथ मिरवणुकीला सुरुवात झाली. अनेक मंडळांनी मर्दानी खेळ, ढोलताशांसह पारंपरिक वाद्यांना प्राधान्य दिले होते. सजीव देखाव्यांचा सहभाग होता. मर्दानी खेळ लक्ष वेधून घेत होते. याबरोबरच अनेक मंडळांनी साऊंड सिस्टीम, लेझर लाईट्सवर भर दिला होता. अनेक ठिकाणी साऊंड सिस्टीमची उंची पाहून पोलीस अधिकारी थक्क झाले आहेत. कारण वीजतारा व इतर केबलना पार करून साऊंड सिस्टीम बाहेर काढताना कार्यकर्त्यांची दमछाक झाली. पहाटे 4 नंतर स्वत: पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, उपायुक्त रोहन जगदीश, पी. व्ही. स्नेहा यांनी साऊंड सिस्टीम बंद करण्यास भाग पाडले. त्यानंतर मिरवणूकही रामदेव गल्लीमार्गे न जाता किर्लोस्कर रोडमार्गे वळविण्यात आली. अधिकाऱ्यांनी वारंवार सूचना करून मिरवणूक सुरळीत होईल, यावर भर दिला.  सकाळी 6.30 वाजेपर्यंत संपूर्ण मिरवणूक आटोपती घेण्यात आली. यंदाच्या मिरवणुकीत 45 हून अधिक चित्ररथ सहभागी झाले होते. काही किरकोळ अपवाद वगळता संपूर्ण मिरवणूक शांततेत पार पडली. पोलीस आयुक्त व दोन्ही उपायुक्त व शहरातील बहुतेक अधिकारी मिरवणुकीच्या शेवटपर्यंत तळ ठोकून होते. कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना घडू नये, यासाठी ते स्वत: लक्ष ठेवून होते. साऊंड सिस्टीम व लेझर लाईटच्या उंचीने मात्र अनेक ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांना अक्षरश: घाम सुटला होता. अघटित घडू नये, यासाठी ते काळजी घेत होते. संपूर्ण मिरवणूक शांततेत व उत्साहात पार पडली.
मोबाईल चोरीचेही प्रकार
मध्यरात्री 12 नंतर शिवभक्तांची गर्दी वाढली. गर्दी म्हटली की हाणामारी, चोरी आदी घटना असणारच. गणपत गल्ली येथे एका तरुणाची चेन पळविल्याची घटना घडली आहे. तर आणखी एका तरुणाला क्षुल्लक कारणावरून मारहाण झाली आहे. या दोन्ही घटनांची पोलिसात नोंद झाली नाही. मोबाईल चोरीचेही प्रकार घडल्याची माहिती मिळाली आहे.