भाजपने कटकारस्थाने त्वरित थांबवावीत : आप

भाजपने कटकारस्थाने त्वरित थांबवावीत : आप

पणजी : आपचे प्रमुख नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध करीत असल्यानेच त्यांना कोणत्याही कारणाशिवाय सक्तवसुली संचालनालय (ईडी) यंत्रणेचा गैरवापर करून अटक केलेली आहे. केजरीवाल यांच्या विरोधात दबावतंत्र वापरण्यात येत आहे. दिल्लीच्या प्रकरणावरूनच गोव्यातील भंडारी समाजाच्या नेत्यांवर आता ईडीचा ससेमिरा लावला आहे. या प्रकाराचा आम्ही निषेध करीत असून, भाजपने कटकारस्थाने थांबवावीत, असे आम आदमी पक्षाचे गोव्यातील नेते वाल्मिकी नाईक यांनी सांगितले. पणजीतील आपच्या कार्यालयात काल शुक्रवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत वाल्मिकी नाईक व डिचोली तालुका भंडारी समाजाचे सचिव तथा आपचे नेते राजेश कळंगुटकर यांनी भाजपकडून सतावणूक होत असल्याचा आरोप केला. वाल्मिकी नाईक म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या दहा वर्षांत एकदाही पत्रकारांना सामोरे गेले नाहीत. ते आपला खरा चेहरा समोर येईल म्हणून मीडियाला सामोरे जाण्याचे धाडस करीत नाहीत. त्याउलट आपचे नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री हे सरकारचा कारभार आणि आपली राजनिती याविषयी नेहमीच जनतेला माहिती देत आले आहेत. केंद्राच्या चुकीच्या धोरणांना विरोध करणाऱ्यांवर सरकारी यंत्रणेकडून दबाव टाकण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी हे जनतेचा आवाज दाबत असून, देशात आराजकता माजलेली आहे, असा आरोपही नाईक यांनी केला. कोणताही सबळ पुरावा नसताना अमित पालेकर, दत्तप्रसाद नाईक, अशोक नाईक व प्रा. रामराव वाघ यांना ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी समन्स पाठविण्यात आले. लोकसभा निवडणुकीपूर्वी आप नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावून भाजपने स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतला आहे. विधानसभा निवडणुकीकाळात अरविंद केजरीवाल यांनी गोव्यातील जनतेच्या भेटी-गाठी घेतल्या होत्या. केवळ हा धागा पकडूनच आता भंडारी नेत्यांना भाजपने त्रास देण्यास सुरवात केली आहे, असा आरोप राजेश कळंगुटकर यांनी केला.
केजरीवाल यांच्या समर्थनासाठी आवाहन
अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली आहे. केजरीवाल हे जनतेचे सर्वाधिक आवडते मुख्यमंत्री आहेत. त्यांची लोकप्रियता रोखण्यासाठी भाजपने त्यांना ईडी यंत्रणेचा वापर करून अडकवले आहे. देशातील लोकांना केजरीवाल यांच्या समर्थनासाठी 9700297002 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन व]िल्मकी नाईक यांनी केले.