पेनड्राईव्ह प्रकरणी शिवकुमारांकडून आमिष!

पेनड्राईव्ह प्रकरणी शिवकुमारांकडून आमिष!

वकील देवराजेगौडा यांचा गौप्यस्फोट : एसआयटीच्या तपासावरही प्रश्नचिन्ह
प्रतिनिधी/ बेंगळूर
हासनचे खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या कथित अश्लील चित्रफीत प्रकरणामुळे खळबळ माजली असतानाच भाजप नेते व वकील देवराजेगौडा यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणाचे सूत्रधार शिवकुमार हेच असून आमिष दाखविल्याच्या संभाषणाची ऑडियो क्लिप उघड केली.
वकील देवराजेगौडा यांनी सोमवारी बेंगळुरात पत्रकार परिषद घेतली. प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या माजी कारचालकाने माझ्याजवळ येऊन एक पेनड्राईव्ह आणि कागदपत्रे दिली होती. कार्तिक याने माझ्या घरी येऊन संभाषण केल्याचा व्हिडिओ सीबीआयकडे देणार आहे. चौकशीवेळी मी एसआयटीसमोर व्हिडिओ बेंगळूरपर्यंत कसे पोहोचले, याविषयी माहिती दिली आहे.
पेनड्राईव्ह प्रकरणासंबंधी डी. के. शिवकुमार यांच्या माझे समर्थक एल. आर. शिवरामेगौडा यांच्यामार्फत मोठी ऑफर दिली होती. कॅबिनेट दर्जाच्या पदाचे आमिष दाखविले होते. शिवरामेगौडा यांनी संभाषण केल्याची ऑडियो क्लिप उघड करत आहे, असे सांगून त्यांनी एसआयटीच्या तपासावर मला विश्वास नाही, असेही देवराजेगौडा यांनी सांगितले.
पेनड्राईव्ह प्रकरणासंबंध नाही : शिवकुमार
पेनड्राईव्ह उघड प्रकरणाचा आपल्याशी काहीही संबंध नाही. भाजप कार्यकर्ते देवराजेगौडा यांनी आपल्याविरोधात केलेले आरोप खोटे आणि निराधार आहेत, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिले. देवराजेगौडा यापूर्वी भाजपमधून विधानसभा निवडणुकीला उभे राहिले होते. ते त्या पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. आता प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या चित्रफीत प्रकरणात निजदबरोबर या पक्षाचा मित्रपक्ष भाजपचीही कोंडी झाली आहे. यातून बाहेर पडण्यासाठी भाजप-निजदने देवराजेगौडा यांच्यामार्फत माझ्यावर अकारण आरोप केले आहेत, असेही शिवकुमार म्हणाले.