भारतातील पहिल्या ‘हायब्रीड’ खेळपट्टीचे धर्मशालात अनावरण

भारतातील पहिल्या ‘हायब्रीड’ खेळपट्टीचे धर्मशालात अनावरण

वृत्तसंस्था/ धर्मशाला
हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेच्या धर्मशाला येथील स्टेडियमवर सोमवारी झालेल्या एका भव्य समारंभात भारतातील पहिल्या ’हायब्रीड’ खेळपट्टीचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला आयपीएलचे अध्यक्ष अऊण धुमल आणि इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू आणि ‘एसआयएस इंटरनॅशनल क्रिकेट’चे संचालक पॉल टेलर यांच्यासह क्रिकेट क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
इंग्लंडमधील लॉर्ड्से आणि ओव्हलसारख्या प्रतिष्ठित ठिकाणी मिळालेल्या यशानंतर हायब्रीड खेळपट्ट्यांचा झालेला परिचय भारतीय क्रिकेटमध्ये क्रांती घडवून आणणार आहे, असे धुमल म्हणाले. हायब्रीड खेळपट्टीमध्ये नैसर्गिक टर्फची सिंथेटिक फायबर्सशी सांगड घातली जाते. यामुळे खेळपट्टी सतत खेळण्यायोग्य राहते आणि तिचा टिकावूपणा वाढतो. त्याचप्रमाणे अशी खेळपट्टी मैदान कर्मचाऱ्यांवरील ताण कमी करते आणि खेळण्याच्या दृष्टीने दर्जेदार परिस्थिती कायम राखते.
केवळ 5 टक्के सिंथेटिक फायबरचा त्यात वापर केला जातो. मात्र या खेळपट्टीत क्रिकेटसाठी आवश्यक असलेली सर्व नैसर्गिक वैशिष्ट्यो असतात. टेलर यांनी ही संधी दिल्याबद्दल हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेचे आभार मानले. ‘आयसीसीच्या मान्यतेनंतर या खेळपट्ट्यांचा खेळावर होणारा सकारात्मक परिणाम पाहण्यास आम्ही उत्सुक आहोत. यापुढे मुंबई आणि अहमदाबाद येथे अशा खेळपट्ट्या बसविण्यात येतील’, असे त्यांनी सांगितले.
‘युनिव्हर्सल मशिन’ हा हायब्रीड खेळपट्टी स्थापित करण्याकामी एक महत्त्वपूर्ण घटक असून हे यंत्र ‘एसआयएस ग्रास’द्वारे 2017 मध्ये विकसित केले गेले आणि इंग्लंडच्या काउंटी क्रिकेट मैदानांवर अशा खेळपट्ट्या बसविण्याच्या बाबतीत त्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ‘आयसीसी’ने टी-20 आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांत हायब्रीड खेळपट्ट्या वापरण्यास नुकतीच मान्यता दिलेली असून चार दिवसांचे सामने खेळविल्या जाणाऱ्या काउंटी स्पर्धेत या वर्षापासून त्यांचा उपयोग करण्याची योजना आहे.