Fraud Case : बँकेचे नाव वाचले अन् जाळ्यात अडकले!
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : पॅनकार्ड बँक खात्याला लिंक करण्याबाबत त्यांच्या मोबाईलवर मेसेज आला. त्यांनी सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, परत मोबाईलवर फोन आला. त्यावर बँकेचे नाव होते. तेथेच ते फसले अन् सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकून तब्बल 18 लाख 65 हजार रुपये गमावून बसले. सर्वात गंभीर म्हणजे त्यांच्या नावावर काही वेळातच सायबर चोरट्यांनी 16 लाख रुपयांचे लोन घेऊन ही फसवणूक केली आहे.
नमस्कार मी..आपल्या बँकेतून बोलतोय..तुमचे पॅनकार्ड बँक खात्याशी लिंक नाही. ते जर तुम्ही लिंक केले नाही तर तुमचे बँक खाते बंद पडेल, अशी भीती दाखवून तुम्हाला जर कोणी ऐनी डेस्क नावाचे अॅप डाऊनलोड करण्यास सांगून माहिती घेत असेल, तर वेळीच सावध व्हा. कारण ते दुसरे तिसरे कोणी नसून, सायबर चोरट्यांनी तुमचे बँक खाते रिकामे करण्यासाठी लावलेला सापळा आहे. जसे तुम्ही ऐनी डेस्क नावाचे अॅप डाऊनलोड करून माहिती भरण्यास सुरुवात केली.
तसे तुमच्या मोबाईलचा ताबा सायबर चोटरट्यांकडे जातो. त्यानंतर ते तुमच्या बँक खात्याच्या गोपनीय माहितीचा वापर करून पैसे काढून घेतात. अशाचप्रकारे सायबर चोरट्यांनी मंगळवार पेठेतील 48 वर्षीय व्यक्तीला तब्बल 18 लाख 65 हजार रुपयांचा आर्थिक गंडा घातला आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी आरोपींच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 11 ते 12 ऑक्टोबर या कालावधीत घडली आहे. सायबर चोरट्यांनी फिर्यादींचा विश्वास संपादन करून, तो एका नामांकित बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. फिर्यादी हे एका नामांकित कंपनीत नोकरी करतात.
त्यानंतर त्याने फिर्यादींना त्यांचे पॅनकार्ड बँक खात्याला जोडले नसून, ते जर जोडले नाही तर तुमचे बँक खाते बंद पडेल, असे सांगितले. फिर्यादींनादेखील ते खरे वाटले. त्यानंतर सायबर चोरट्याने त्यांना ऐनी डेस्क नावाचे अॅप डाऊनलोड करायला लावले. पुढे सायबर चोरट्यांनी फिर्यादींच्या बँक खात्याचा ऍक्सेस आपल्याकडे घेऊन खात्यातून 16 लाख रुपयांचे लोन घेतले. फिर्यादीने बँकेशी संपर्क केला. परंतु बँकेकडून तत्काळ प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी पूर्वी आलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क केला. त्यावेळी सायबर चोरट्यांनी त्यांची माहिती घेऊन डेबिट कार्डच्या माहितीद्वारे 18 लाख 65 हजार रुपये काढून घेतले. खात्यातून पैसे कमी झाल्यानंतर फिर्यादींना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी सायबर पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. तपास गुन्हे निरीक्षक वाघमारे करीत आहेत.
हेही वाचा
पुण्याच्या प्रश्नांबाबत आ.धंगेकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
पती-पत्नीचे नाते बिघडले, याचा अर्थ ते वाईट पालक आहेत असा नाही : उच्च न्यायालय
अठरा वर्षांपासून डोक्यात होती गोळी!
The post Fraud Case : बँकेचे नाव वाचले अन् जाळ्यात अडकले! appeared first on Bharat Live News Media.