पुणे पुस्तक महोत्सव यशस्वी करा : मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
पुणे : जागतिक स्तरावरील पुस्तक महोत्सवाची मेजवानी पुणेकरांना मिळाली आहे. सांस्कृतिक, साहित्यिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांनी नटलेला ‘पुणे पुस्तक महोत्सव’ आजपासून सुरू होत आहे. हा महोत्सव पुणेकरांनी एकत्र येत यशस्वी करावा, असे आवाहन राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केले. राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने फर्ग्युसन मैदानावर आयोजित केलेल्या पुणे पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले.
या वेळी राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे, संचालक युवराज मलिक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, पुणे महापलिकेचे आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, उद्योजक विशाल चोरडिया, जय काकडे, सुशील जाधव, कृष्णकुमार गोयल, शहीद भगतसिंग यांचे पणतू यागवेंद्र सिंग संधू, प्रकाशक राजीव बर्वे, डीईएसचे डॉ. शरद कुंटे आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी लिखित ‘एक्झाम वॉरियर्स’ हे पुस्तक एक लाख विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ‘हिंदवी स्वराज्य स्थापना’ हे पुस्तकसुद्धा एक लाख विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. डॉ. गोर्हे म्हणाल्या, राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या पुणे पुस्तक महोत्सवामुळे पुणे शहरात सांस्कृतिकदृष्ट्या मोलाची भर पडली आहे. असेच महोत्सव राज्यातील इतर शहरांमध्येही सुरू व्हावेत. दिल्ली, जयपूर येथील विविध फेस्टिव्हल पाहिले आहेत. हे फेस्टिव्हल ठराविक लोकांपुरते मर्यादित असतात. मात्र, पुणे पुस्तक महोत्सवाला जनतेचा सोहळा करून, सामान्य जनतेला, मध्यमवर्गीय कुटुंबांतील लोकांना वाचनसंस्कृतीचा आस्वाद घेता येणार आहे. सर्वांना ज्ञानासाठी पुस्तके उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्यासाठी पुणे पुस्तक महोत्सव महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, असे डॉ गोर्हे यांनी सांगितले.
सलग तिसरा विश्वविक्रम
पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित होणार्या उपक्रमांत सलग तिसर्या दिवशी गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये विश्वविक्रमाची नोंद करण्यात आली आहे. फर्ग्युसन महाविद्यालयात विद्यार्थी, प्राध्यापक आणि प्राचार्यांनी एकत्र येत 18 हजार 760 पुस्तकांच्या माध्यमातून ‘जयतु भारत’ हे वाक्य तयार केले. गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्सचे अधिकारी स्वप्नील डांगरीकर यांनी विश्वविक्रमाची घोषणा केली. विश्वविक्रम झाल्यानंतर मैदानावर देशभक्तिपर गाण्यांवर जल्लोष साजरा करण्यात आला; तसेच मान्यवरांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
हेही वाचा
सांगली : कोल्हापूर पॅटर्न फेटाळला; ऊसदर बैठक पुन्हा निष्फळ
हुडहुडीचे राज्य : सायंकाळी पाचपासूनच शहरात गारठा
Pune News : पुस्तक महोत्सवात कार्यक्रमांची रेलचेल
The post पुणे पुस्तक महोत्सव यशस्वी करा : मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन appeared first on Bharat Live News Media.