कोल्हापूर : राजर्षी शाहूंच्या चरणी प्रश्नांचे साकडे

कोल्हापूर : ऐतिहासिक बिंदू चौक… डाव्या-उजव्यासह सर्वच राजकीय पक्षांसाठी आंदोलनाचे हक्काचे ठिकाण… अनेक राजकीय नेत्यांनी या ठिकाणी सभा गाजविल्या; पण जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी काही वर्षांपासून बंदी घातली. परिणामी, आता सिद्धार्थनगरजवळील नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे समाधिस्थळ आंदोलनाचे केंद्र बनत आहे. राजर्षी शाहूंच्या चरणी प्रश्नांचे साकडे घातले जात आहे. विविध आंदोलनांचे रणशिंग समाधिस्थळावरूनच …

कोल्हापूर : राजर्षी शाहूंच्या चरणी प्रश्नांचे साकडे

सतीश सरीकर

कोल्हापूर : ऐतिहासिक बिंदू चौक… डाव्या-उजव्यासह सर्वच राजकीय पक्षांसाठी आंदोलनाचे हक्काचे ठिकाण… अनेक राजकीय नेत्यांनी या ठिकाणी सभा गाजविल्या; पण जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी काही वर्षांपासून बंदी घातली. परिणामी, आता सिद्धार्थनगरजवळील नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे समाधिस्थळ आंदोलनाचे केंद्र बनत आहे. राजर्षी शाहूंच्या चरणी प्रश्नांचे साकडे घातले जात आहे.
विविध आंदोलनांचे रणशिंग समाधिस्थळावरूनच फुंकले जात आहे. त्यामुळे आता शाहू समाधिस्थळावरून आंदोलनाची ज्योत अन् विचारांचा जागर राज्यभर जाणार आहे.
राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या हयातीत आपली समाधी नर्सरी बागेत करावी, असे म्हटल्याची नोंद आहे. राजर्षी शाहू महाराज यांची इच्छा आणि शाहूप्रेमी जनतेच्या मागणीचा विचार करून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे समाधी स्मारक उभारण्यात आले आहे.
यामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधिस्थळावरील मेघडंबरी, संरक्षक भिंत, लँडस्केपिंग व विद्युतीकरण ही कामे महानगरपालिकेने 2 कोटी 76 लाख रुपये इतका स्वनिधी वापरून केली आहेत.
दुसर्‍या टप्यातील विकासकामांसाठी महापालिकेने 10 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करून निधीसाठी राज्य शासनाला सादर करण्यात आला होता. राज्य शासनाकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेच्या अंतर्गत 9 कोटी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
ऐतिहासिक वैभवात भर…
राजर्षी शाहू महाराज समाधिस्थळाच्या चबुतर्‍यावर मेघडंबरी बसविण्यात आली आहे. त्या मेघडंबरीला ऐतिहासिक लूक देण्यात आला आहे. एकूणच समाधिस्थळामुळे कोल्हापूरच्या ऐतिहासिक वैभवात भर पडली आहे. त्यामुळेच यापूर्वी बिंदू चौकात होणारे समाज प्रबोधन आणि समाजाला दिशा देण्याचे काम आता राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधिस्थळावरून होत आहे. मराठा आंदोलनाचे रणशिंगही येथूनच फुंकण्यात आले. शक्तिपीठ महामार्गाविरोधातील आंदोलनालाही या ठिकाणावरूनच धार मिळाली.
शाहू समाधिस्थळी प्रस्तावित कामे…
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह नूतनीकरण
* संरक्षक भिंत
* दगडी फुटपाथ, लँडस्केप
* आर्ट गॅलरी
* जुनी मंदिरे व समाधी यांचे संवर्धन
* राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे विविध क्षेत्रांतील कामांची माहिती देणार्‍या ब—ाँझ प्लेट
* पार्किंगची सुविधा
* परिसर विद्युत रोषणाई
* स्वच्छतागृह