समाजभान : आक्रोश निष्पाप कळ्यांचा…
श्रीराम ग. पचिंद्रे
आपल्या संस्कृतीत दानधर्माची महती सांगितलेली आहे; पण तो कुणाला करायचा? दरिद्री माणसांना करायचा की, माणसातील निर्दयी राक्षसांना करायचा? मध्यंतरी एक अतिशय भयंकर वास्तव पाहण्यात आलं आणि समाजमाध्यमांवर फिरणारा त्याविषयीचा मजकूर वाचण्यातही आला.
कार्यालयाच्या जवळचं एक छोटंसं उपाहारगृह. आम्ही काही मित्र तिथं चहा घ्यायला थांबलो होतो. तेवढ्यात एक पाच- साडेपाच वर्षांचा मुलगा भीक मागत तिथं आला. कुणालाही करुणा वाटावी, असं दैन्य चेहर्यावर पसरलेलं. अंगात मळून पार विटलेले आणि जीर्ण होऊन ठिकठिकाणी फाटलेले कपडे, अनवाणी पाय… हाताचे काळेमिट्ट तळवे, डोळ्यात गोठलेले अश्रू… तो भुकेनं व्याकुळ झालेला दिसत होता. त्याच्या कोवळ्या निरागस चेहर्यावरचं ते अपार दैन्य पाहून उपाहारगृहातील कोकोनटची दोन ताजी बिस्किटं घेऊन त्याला दिली. मला नमस्कार करून तो मुलगा बाहेर पडला. तेवढ्यात, आत गर्दी होत होती म्हणून चहाचा कप घेऊन मी बाहेर आलो; तर फाटक्या, मळकट साडीतील बाई भरभर चालत त्या मुलाच्या दिशेनं आली, तिला बघून भीतीनं त्यानं ती दोन्ही बिस्किटं तशीच गटारात भिरकावून दिली. ती बाई त्याच्या जवळ आली आणि त्या मुलाला बखोटीला धरून तरातरा ओढून घेऊन गेली.
आजूबाजूची माणसं मलाच नावं ठेवायला लागली, ‘अशा पोरांना खायला काही द्याचं न्हाई बघा… माजोर्डी असत्यात ती. पैशे द्या की, बगा कशी पाटकन घेत्यात ती.’
‘अहो, साहेब, ही मुलं काहीही खायला घेत नाहीत. त्यांना फक्त पैसे लागतात, तेही दहा रुपयांच्या वर. त्यांना अजिबात काही देत जाऊ नका. माज आलेला असतो त्यांना…’
इत्यादी.
तो मुलगा त्याच परिसरात फिरत भीक मागत असतो; अर्थात पैशाची. तो कुणाकडूनही, कधीही खाण्याचे पदार्थ स्वीकारत नाही. एकदा या मुलाला दहा रुपये देऊन मी बोलतं केलं. मी विचारलं, ‘बाळ, तू कुठल्या गावचा?’ तो म्हणला, ‘मला म्हाईत न्हाई. मला कळतंय तसा मी हितंच असतोय.’
मी विचारलं, ‘तू खायला दिलेलं का घेत नाहीस? घेतलंस तर टाकून का देतोस?’
तो म्हणाला, ‘मावशी मारतीया. सगळ्यांच्याकडनं नुसतं पैशेच घ्याचं, असं तिनं सांगितलंया.’
‘तुझे आई-वडील कुठं आहेत?’
माझ्या प्रश्नांनी तो अस्वस्थ व्हायला लागला होता, हे मला जाणवलं.
‘मला म्हाईत न्हाई,’ एवढंच म्हणून तो पळून गेला; मग मी अधिक लक्ष देऊन डोळसपणे अशा मुलांकडे बघायला लागलो. सार्वजनिक बागा, उपाहारगृहांच्या बाहेर, चौकात, वाहतूक निदर्शकांच्या जवळ अशी मुलं फिरताना दिसायला लागली. बरीच मुलं पेन, फुगे, खेळणी असं काहीबाही वस्तू विकताना मला दिसायला लागली. काही भिकारणींच्या कडेवर अगदी लहान- सहा महिने, वर्ष, दीड वर्ष, दोन वर्ष अशी मुलं असतात. त्यातली अनेक मुलं भुकेनं व्याकुळ होऊन रडताना दिसतात; मग लोकांना दया येते, ते काही खायला देऊ पाहतात; पण त्या बाया खायचे पदार्थ घेत नाहीत. त्यांना फक्त रोख पैसेच लागतात.
आपल्या संस्कृतीत दानधर्माची महती सांगितलेली आहे; पण तो कुणाला करायचा? दरिद्री माणसांना करायचा की, माणसातील निर्दयी राक्षसांना करायचा? मध्यंतरी एक अतिशय भयंकर वास्तव पाहण्यात आलं आणि समाजमाध्यमांवर फिरणारा त्याविषयीचा मजकूर वाचण्यातही आला. एका गजबजलेल्या चौकात टळटळीत दुपारी, उन्हाचा कहर होता. माणसं भाजून निघत होती. निदर्शकावर तांबडा दिवा लागला होता. सगळी वाहनं थांबलेली होती. अशा ठिकाणी रडणारी किंवा पेंगळून पडलेली मुलं काखोटीला मारून लोकांची सहानुभूती मिळवत भीक मागणार्या बायका असतातच. अशीच एक भिकारीण एका सतत कळवळून रडत राहिलेल्या एखादं वर्ष वय असलेल्या बाळाला कडेवर घेऊन लोकांच्या समोर हात पसरत होती. काही लोक तिला पैसे देतही होते.
एवढ्यात हिरवा दिवा लागला. सगळी वाहनं पुढे निघून गेली; पण एक सुशिक्षित, सधन महिला आपलं वाहन बाजूला उभं करून थांबून राहिली. तिनं भिकारणीला हाक मारली. स्त्रीच्या ठायी असणार्या नैसर्गिक अंतःप्रेरणेतून त्या महिलेला असं वाटलं की, हे मूल काही भुकेनं रडत नाही, काहीतरी वेगळं आणि अनैसर्गिक आहे. तिनं भिकारणीला शंभर रुपये दिले आणि ‘बाई, तुझं बाळ जरा माझ्या हातात देशील का?’ असं विचारलं. तिला भिकेत शंभर रुपये मिळाले होते, म्हणून तिनं आनंदानं ते बाळ महिलेच्या हातात दिलं. त्या महिलेनं बाळाचा सदरा वर करून पाहिला, तर त्याच्या पोटाला, मांडीला, पाठीला लोखंडी चिमटे लावून त्वचा ताणून ठेवलेली होती. त्यावरून हात फिरवल्यावर त्वचा ओढली जाऊन मुलाला प्रचंड वेदना होत होत्या. ती भिकारीण बाळाच्या अंगावरून मायेनं हात फिरवण्याचा अभिनय करून चिमट्यांना ताण देत होती, म्हणून ते मूल कळवळत होतं. हे पाहणार्या लोकांना त्या भिकारणीच्या चेहर्यामागचा राक्षसी चेहरा समजला. नंतर पोलिसांनी प्रयत्न करून त्या बाळाचे आई-वडील शोधून काढून त्यांच्या आनंदाचा ठेवा त्यांच्या हाती सोपवला; पण असं घडलं नसतं तर? ते मूल आणखी किती काळ त्या मरणयातना सहन करत जगलं असतं, कुणास ठाऊक? पोलिस आणि त्यांची यंत्रणा यांनी ठरवलं तर काय करू शकतात, याचं ते एक उदाहरण होतं.
त्या भिकारणीनं आपण मुलांचे हाल कसकशा प्रकारे करतो, हे सांगितलं. अंगाला चिमटे लावणं, गुप्तेंद्रियाच्या टोकाला आणि गुद्द्वारामध्ये मिरचीपूड भरणं, हात-पाय, पोटाला चटके देऊन ठेवणं, अशा अघोरी पद्धतींनी मुलांना सतत रडवत ठेवलं जातं. भीक मागणार्या त्या राक्षसिणीच्या मागे आणखीही अनेक क्रूर आणि निर्दयी राक्षस असतात. हे राक्षस मुलं पळवण्याचा आणि अशा बायकांच्या हाती त्यांना सोपवून भीक मागण्याचा असला निर्घृण व्यवसाय करतात. मध्यंतरी राजकारणात ‘मुलं पळवणारी टोळी’ असं एक वाक्य सर्वत्र फिरत होतं. ते उपरोधिक होतं; परंतु गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबई आणि तशाच काही महानगरांमध्ये अश्राप, कोवळ्या मुलांना पळवून आणून त्यांचे हात-पाय तोडून, त्यांना अपंग बनवून, डोळे फोडून भीक मागायला लावण्याचा सैतानी उद्योग काही राक्षसी मानसिकतेचे लोक करत आलेले आहेत, हे समाजाचे प्रखर, जळजळीत वास्तव आहे. त्या बालकांच्या आई- बापाच्या वेदना काय असतील, हे या सैतानांना काय माहीत?
एकेठिकाणी मी पाहिलं की, एक भिकारीण एका चारेक वर्षांच्या मुलाला कडेवर घेऊन भीक मागत होती. लोकांची गर्दी बघून ती बाई त्या मुलाला जमिनीवर उभं करायची. ते मूल रस्त्यावर उभं राहिल्यावर क्षणार्धात खाली कोसळून पडायचं. त्याचे पाय वाकडेतिकडे झालेेले होते; मग दयाळू लोक तिला पैसे द्यायचे. पण, ही भिकारीणसुद्धा खाण्याचे पदार्थ घेत नाही; तिला रोख पैसेच हवे असतात. तिनं मुलाला खाली उभं करून कोलमडून पडण्याचा तो अघोरी ‘खेळ’ वारंवार करून दाखवला. प्रत्येक वेळेला ते मूल असह्य वेदनांनी कळवळून रडत होतं.
मी माझ्या एका अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर मित्राला त्या मुलाचं वर्णन करून ‘हे असं का होत असेल?’ असं विचारलं. त्यानं मला सांगितलं, ‘कोणाचे पाय मोडले, तर शास्त्रशुद्ध पद्धतीनं व्यवस्थित प्लास्टर घालून औषधोपचार केले, तरच ते पाय व्यवस्थित जुळतात. समजा काही उपचार केले नाहीत, तर कालांतरानं मोडलेली हाडं जुळतातही; पण ती कशीतरी वेडीवाकडी जुळतात. हात म्हणा, पाय म्हणा- ते कधीही सरळ राहत नाहीत. वाकडेच राहतात आणि त्यातून आयुष्यभर सतत वेदना होत राहतात. त्या बाळाचे पाय त्याहून लहान असताना काठीनं बडवून आतल्या आत मोडून काढलेले असावेत. म्हणून ते सतत सुजलेले आणि वाकडे-तिकडे राहिलेले आहेत…’
स्त्रीचं वर्णन करणारी ‘स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, हृदयी अमृत नयनी पाणी’ अशी एक ओळ आहे; पण ज्यांच्या हृदयात हलाहल हे महाविषच भरलेलं असेल आणि ज्यांच्या डोळ्यांत अश्रुपिंडेच नसतील अशाही काही राक्षसिणी असतात. काही वर्षांपूर्वी अंजनाबाई गावित, तिच्या दोन मुली आणि जावई यांनी भीक मागण्यासाठी मुलं पळवायची आणि मुलं अडचणीची ठरायला लागल्यानंतर त्यांची डोकी निर्दयीपणे लोखंडी खांबांवर, रस्त्यावर आपटून त्यांना मारून टाकायचं, असा अघोरी प्रकार अनेक वर्षे चालू ठेवला होता. त्यांनी स्त्रीत्वालाच नव्हे, तर माणूस असण्यालाच कलंक लावला होता. त्या निष्पाप, निरागस बालकांच्या करुण किंकाळ्यांनीसुद्धा त्या राक्षसिणींच्या हृदयाला पाझर फुटत नव्हता; पण त्या राक्षसिणींच्यापेक्षाही या राक्षसिणी आणि त्यांच्या मागचे राक्षस अधिक भयंकर आहेत. कारण, हे सारेजण त्या मुलांच्या संपूर्ण आयुष्याचा नरक करून टाकतात. लादलेल्या अनाथपणाच्या जगण्यात, जगणे म्हणजे जिवंतपणीचे मरणच असल्याचे चटके या मुलांना आयुष्यभर सोसावे लागतात.
अशा भिकारणींचे पाताळयंत्री दलाल हे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांच्या जवळपास वावरत असतात. रात्र झाल्यावर त्यांनी जमवलेली रक्कम ते गोळा करतात. भिकारणी आणि मुलं मरणार नाहीत, एवढंच खायला देऊन अर्धपोटी ठेवतात. जमलेली रक्कम टोळीचा मुख्य सूत्रधार जिथे असेल, तिथं पोहोचवली जाते. त्यांची एक सुनियोजित अशी साखळी कार्यरत असते. अशा राक्षसी भिकारणींच्या माध्यमातून अशा टोळ्यांचा काळजीपूर्वक शोध घेऊन त्या समूळ नष्ट करायला हव्यात. समाजाला लागलेले हे कलंक पूर्णतः पुसून टाकायला हवेत; अन्यथा निष्पाप, अश्राप, कोवळ्या कळ्या अशाच खुडल्या जातील, त्यांच्या आयुष्याची विल्हेवाट लागत राहील, त्यांचा आक्रोश कुणाला ऐकायलाही जाणार नाही, एवढे समाजाचे कान बधीर झालेले असतील.