धावत्या कारमध्ये स्विमिंग पूल बनवणे पडले महागात!

धावत्या कारमध्ये स्विमिंग पूल बनवणे पडले महागात!

कोच्ची : रस्त्यावर चालत्या वाहनांमधून स्टंट करणारे अनेक महाभाग असतात. अशा ‘सोशल मीडिया इंफ्लुएंसर्स’ना धडा शिकवणारी एक घटना केरळमध्ये घडली आहे. तिथे काही तरुणांनी चालत्या वाहनात स्विमिंग पूल बनवून त्याचा व्हिडीओ बनवला होता. आता केरळच्या मोटार वाहन विभागाने या यूट्यूब इंफ्लुएंसरचा वाहन परवाना कायमचा रद्द केला आहे!
या तरुणाचे नाव संजू टेक्की असे आहे. त्याने यूट्यूबवर काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये तो आपल्या मित्रांसमवेत चालत्या गाडीत एका लहान मुलासह अस्थायी स्विमिंग पूलमध्ये डुंबत असल्याचे दिसून आले होते. केरळच्या मोटार वाहन विभागाने यापूर्वी संबंधित वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र निलंबित केले होते. आता विभागाने रस्त्यावर चालत्या वाहनामध्ये स्टंट केल्याबद्दल या यूट्यूबरचे ड्रायव्हिंग लायसेन्सही रद्द केले आहे.
संजू टेक्की आता कधीही नवे ड्रायव्हिंग लायसेन्स मिळवू शकणार नाही. हे वाहन चालवणार्‍या त्याच्या मित्राचे लायसेन्सही निलंबित करण्यात आले आहे. उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान संजू टेक्की अलाप्पुझा मोटार वाहन प्रवर्तन आरटीओद्वारे त्याच्या व्हिडीओ स्टंटबाबत मागितलेल्या स्पष्टीकरणाबाबत समाधानकारक उत्तर देऊ शकला नव्हता. रस्त्यावर अशाप्रकारचे स्टंट करणार्‍या अन्य सर्व इंफ्लुएंसर्सना सावधान करण्यासाठी संजूवर कडक कारवाई केल्याचे विभागाने म्हटले आहे.