मी पंतप्रधान मोदींचे आभार मानतो : शरद पवार असे का म्‍हणाले?

मी पंतप्रधान मोदींचे आभार मानतो : शरद पवार असे का म्‍हणाले?

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क :  महाराष्ट्राच्या जनतेने लोकसभा निवडणुकीत भाजपला नाकारले आहे. तरीही त्यांना शहाणपण आलेले नाही.  सत्तेचा सरळ-सरळ गैरवापर केला जात आहे.  येणाऱ्या तीन चार महिन्यानंतर जनता त्यांना उत्तर देईल, अशा शब्दांमध्‍ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी महायुती सरकारवर हल्‍लाबा केला. आज (दि.१५)  महाविकास आघडीच्‍या वतीने  आयोजित पत्रकार परिषदेमध्‍ये ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान मोदींचे त्‍यांनी आभारही मानले. जाणून घेवूया पवार नेमकं काय म्‍हणाले याविषयी….
लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि आगामी विधानसभा निवडणुकांबाबत चर्चा करण्यासाठी आज (15 जून) महाआघाडी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीला उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आदी नेते उपस्थित होते. यानंतर त्‍यांनी संयुक्‍त पत्रकार परिषदेत घेतली.
पंतप्रधान मोदींचे आभार मानने मी माझे कर्तव्‍य समजतो…
“जेथे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रोड शो केला किंवा जेथे जाहीर सभा घेतली तिथे आम्ही जिंकलो. त्यामुळे पंतप्रधानांचे आभार मानणे मी माझे कर्तव्य समजतो.”, असा टोलाही यावेळी शरद पवारांनी लगावला.

Mumbai | NCP-SCP chief Sharad Pawar says, “Wherever the Prime Minister’s roadshow and rally took place, we won. That is why I consider it my duty to thank the Prime Minister.” pic.twitter.com/kkZygaTuY9
— ANI (@ANI) June 15, 2024

जातीय जनगणना करण्‍यावर आमच्‍यामध्‍ये एकमत
लोकसभा निवडणुकीत महाराष्‍ट्रातील जनतेने भाजपला नाकारले आहे. आता पुढील विधानसभा निवडणुकीत जनताच
त्‍यांना पुन्‍हा उत्तर देईल. देशात जातीय जनगणना करण्‍यावर आमच्‍यामध्‍ये एकमत आहे, असेही पवारांनी सांगितले.
आगामी विधानसभा निवडणूक मविआ एकत्र लढविणार : उद्धव ठाकरे
लोकसभा निवडणूक निकालावरुन  ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, “लोकसभा निवडणूक संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी ही लढाई होती. आगामी विधानसभा निवडणूक मविआ एकत्र लढविणार आहे. जनतेच्या कोर्टात शिवसेना कोणाची आहे याचा आता फैसला  झाला आहे. तपास यंत्रणांचा गैरफायदा घेतला जात आहे. भाजपचा फोलपणा महाराष्ट्राने या लोकसभा निवडणुकीमध्ये दाखवून  दिला आहे. लोकशाही वाचवण्यासाठी सर्वधर्म, जातींनी मतदान केले आहे. महाराष्ट्राच्या जनतेेने लोकशाही वाचवली आहे. महाराष्ट्र जनतेचे आम्ही आभार मानतो. भाजपने ४०० पारचा नारा दिला होता. त्याचे काय झाले? अच्छे दिनच्या कथनाचे काय झाले, मोदींच्या हमीभावाचे काय झाले? असे सवाल उपस्थित करत ठाकरे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन होणार : पृथ्वीराज चव्हाण
या वेळी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की,” महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानण्यासाठी आणि सर्वांचे आभार व्यक्त करण्यासाठी आज आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत. महाराष्ट्रातील जनतेने एमव्हीएच्या उमेदवारांना विजयी केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रथमच, आज महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानण्यासाठी आम्ही सर्वजण लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत. लोकसभा निवडणुकीत आम्हाला, विधानसभा निवडणुकीतही तेच प्रेम मिळेल आणि आता महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन होणार आहे.