T20 WC : अमेरिकन ‘चक्रव्यूह’ भेदला; टीम इंडिया सुपर-8मध्ये!
न्यूयॉर्क, वृत्तसंस्था : सौरभ नेत्रावळकरची सनसनाटी गोलंदाजी, प्रतिकूल खेळपट्टी, शेवटची 6 षटके बाकी असताना षटकामागे 8 पेक्षा अधिकची आवश्यक धावसरासरी, असा सारा माहोल विरोधात असताना सूर्यकुमार यादव व शिवम दुबे या धुरंधरांनी मात्र अक्षरश: सर्वस्व पणाला लावले आणि जणू अमेरिकेच्या जबड्यात हात घालत विजयाचा घास खेचून आणला!
लो स्कोअरिंग सामने अंगावर शहारे आणणारे का असतात, याची उत्तम प्रचिती देणार्या या रोमांचक लढतीत सौरभ नेत्रावळकरच्या सनसनाटी गोलंदाजीमुळे रंग भरलाच होता. मात्र, सूर्यकुमारने 49 चेंडूंत नाबाद 50 तर दुबेने 35 चेंडूंत नाबाद 31 धावा जमवताना 65 चेंडूंत 67 धावांची अभेद्य भागीदारी साकारत अमेरिकेचा चक्रव्यूह भेदून दिला! भारताने या हॅट्ट्रिकविजयासह विश्वचषकाच्या सुपर-8 फेरीतील स्थान आता निश्चित केले आहे.
या लढतीत प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर अमेरिकेला निर्धारित 20 षटकांत 8 बाद 110 अशा किरकोळ धावसंख्येवर समाधान मानावे लागले. मात्र, प्रत्युत्तरात 111 धावांचा पाठलाग करताना विराट व रोहित ही सलामी जोडी 14 चेंडूंत 15 धावांवरच तंबूत परतल्याने एकच खळबळ उडाली. ऋषभ पंत तिसर्या गड्याच्या रूपाने बाद झाला, त्यावेळी क्रिकेटच्या मैदानातही अमेरिकाच महासत्ता ठरणार का, अशी धास्ती निर्माण होणे साहजिकच होते. पण, याचवेळी सूर्यकुमार यादव व शिवम दुबे ही जोडी न्यूयॉर्कच्या प्रतिकूल खेळपट्टीवर एकत्रित आली आणि कधी चौकार, कधी षटकार तर कधी एकेरी-दुहेरी धावांसह धावफलक सातत्याने हलता ठेवत या जोडीने कधी विजय जबड्यातून खेचून नेला, याची अमेरिकन संघाला भणकही लागली नाही!
त्यापूर्वी, विजयासाठी 111 धावांचे तुलनेने किरकोळ आव्हान असताना रोहित शर्मा (6 चेंडूंत 3) व विराट कोहली (0) लागोपाठ बाद झाले होते. जम बसेल असे वाटत असतानाच ऋषभ पंत अली खानच्या खाली राहिलेल्या एका चेंडूवर त्रिफळाचीत झाला आणि यामुळे भारताची 7.3 षटकांत 3 बाद 44 अशी आणखी बिकट स्थिती झाली. त्यानंतर मात्र सूर्यकुमार व दुबे यांनी अभेद्य अर्धशतकी भागीदारी साकारत भारताला हवाहवासा विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकल्यानंतर अमेरिकेला प्रथम फलंदाजीला पाचारण केले होते. अमेरिकेने निर्धारित 20 षटके खेळून काढत 8 बाद 110 धावांपर्यंत मजल मारली. पाचव्या स्थानी फलंदाजीला उतरलेल्या नितीश कुमारने 23 चेंडूंत 27 धावा केल्या. ही अमेरिकेतर्फे सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली. सलामीवीर स्टीव्हन टेलरने 30 चेंडूंत 24 धावा जमवल्या.
डावाच्या प्रारंभी अर्शदीपने अमेरिकेला दुहेरी धक्के दिले. त्याने पाकिस्तानी वंशाचा सलामीवीर शायन जहाँगीरला डावातील पहिल्याच चेंडूवर पायचित केले तर तिसर्या षटकात अंद्रियास गौसला पंड्याकरवी झेलबाद करत आणखी एक धक्का दिला. डावाच्या मध्यात ठरावीक अंतराने फलंदाज बाद होत राहिल्याने अमेरिकेला कशीबशी तिहेरी मजल गाठता आली. पण, त्यानंतर नेत्रावळकरच्या भेदक गोलंदाजीमुळे या सामन्यात रंगत निर्माण झाली होती. भारतीय संघातर्फे अर्शदीप सिंगने 4 षटकांत 9 धावांत 4 बळी, असा भेदक मारा साकारला. याशिवाय हार्दिक पंड्याने 4 षटकांत 14 धावांत 2 तर अक्षर पटेलने 3 षटकांत 25 धावांत 1 बळी असे पृथक्करण नोंदवले.
17 व्या षटकात 15 धावा वसूल अन् चित्र बदलले!
डावाच्या प्रारंभीच दोन झटके देणार्या अमेरिकन संघाने भारतावर अगदी 17 व्या षटकापर्यंत कमालीचे दडपण राखले होते. पण, शेवटच्या 4 षटकात 24 धावा, असे समीकरण असताना सूर्यकुमार यादवने एक षटकार, एक चौकार वसूल केला, या 17 व्या षटकात एकूण 15 धावा वसूल झाल्या आणि येथेच हा सामना भारताच्या बाजूने झुकला!