तिबेटमधील तीस ठिकाणांचे आता भारतही करणार नामांतर
नवी दिल्ली; वृत्तसंस्था : चीनने अरुणाचल प्रदेशातील काही गावांची नावे बदलल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए’ सरकारनेही ‘ड्रॅगन’ला जशास तसे सणसणीत उत्तर दिले आहे. ‘द डिप्लोमॅट’ने दिलेल्या एका वृत्तानुसार, भारत सरकारने तिबेटमधील 30 ठिकाणांची नावे बदलण्याची तयारी सुरू केली आहे. ‘एनडीए’ सरकारने या निर्णयाला मंजुरीही दिली आहे. त्यामुळे चीनला मिरच्या झोंबणार असल्याचे मानले जात आहे.
‘एनडीए’चे सरकार स्थापन होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. तिबेटसंदर्भात घेतलेला निर्णय हा त्याचाच परिपाक आहे. चीनने अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावे बलण्याचा खोडसाळपणा केला होता. त्याला हे प्रत्युत्तर मानले जात आहे.
लष्कराकडून लवकरच घोषणा
तिबेटमधील संबंधित ठिकाणांची नावे निवडण्यासाठी सखोल संशोधन केले गेले आहे. विशेष म्हणजे, या नावांना ऐतिहासिक महत्त्वही आहे. ही सर्व नावे तिबेटशी संबंधित आहेत. भारतीय लष्कर लवकरच ही नावे जाहीर करणार असून, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील नकाशामध्येही त्यांचा समावेश केला जाणार आहे. भारत सरकारने ज्या ठिकाणांच्या नावांना मंजुरी दिली त्यामध्ये निवासी क्षेत्र, पर्वत, नद्या, तलाव आणि पर्वतीय खिंडींचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘द डिप्लोमॅट’ने माजी गुप्तचर अधिकारी बेनू घोष यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. भारताकडून पुन्हा एकदा तिबेटसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यासारखे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.