नागपूरात स्मार्ट इलेक्ट्रिक मीटर विरोधात आंदोलन; फडणवीसांच्या घरासमोर सुरक्षेत वाढ
नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : मोदी सरकार 80 कोटी जनता दारिद्र्यरेषेखाली असल्याचे सांगते मात्र, दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांच्या घरी नागपूर वर्धा चंद्रपूरसह स्मार्ट मीटर लावण्याचा अट्टाहास का ? असा सवाल करीत या स्मार्ट मीटर विरोधात नागपुरातील व्हेरायटी चौकात बुधवारी (दि.12) जय विदर्भ संघटना आणि स्मार्ट मीटर विरोधी संघर्ष कृती समिती संयुक्त विद्यमाने जोरदार आंदोलन करण्यात आले.
पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार शहरात विविध ठिकाणी आंदोलनानंतर उपमुख्यमंत्री आणि राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर हे आंदोलन करण्यात येणार होते. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारली त्यामुळे फडणवीस यांचा पुतळा जाळण्याचा कार्यकर्त्यांनी प्रयत्न केल्याने वातावरण चांगलेच तापले. पोलिसांनी अखेर मध्यस्थी करीत या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ येथील घरासमोरील सुरक्षा व्यवस्था अधिकच कडक करण्यात आली आहे.
मंगळवारी (दि.11) सायंकाळी महाल चौक येथे सभा झाली होती. दरम्यान संघर्ष समितीचे सर्व घटक पक्ष उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक बाबा शेळके, सी.एम.मौर्य यांच्यासह संघर्ष समिती सदस्य हजर होते. एकीकडे महावितरण घराघरात प्रीपेड इलेक्ट्रिक मीटर लावण्याचे नियोजन करीत आहे. दुसरीकडे या मीटरविरोधात लढा उभारण्यासाठी नागपुरात प्रीपेड इलेक्ट्रिक मीटर विरोधी नागरिक संघर्ष समिती गठीत झाली. मीटरवरून राज्यात आता सरकार विरुद्ध समिती असा सामना बघायला मिळत आहे.
प्रीपेड इलेक्ट्रिक मीटर विरोधी नागरिक संघर्ष समितीची सभा समितीचे संयोजक मोहन शर्मा याच्या अध्यक्षतेत नुकतीच झाली. आंदोलनाच्या विविध टप्यांवर समितीच्या पदाधिकाऱ्यांचे एकमत झाले. त्यानुसार प्रीपेड मीटरविरोधात 9 जुन ते 16 जुनदरम्यान नागपुरातील विविध भागात जाहिर सभा व पत्रके वाटुन जनजागरण अभियान राबवण्याचे निश्चित झाले.
हेही वाचा :
नाशिक : स्मार्ट प्रीपेड मीटरविरोधात जनआंदोलनाचा इशारा
नागपूर : महावितरणकडून स्मार्ट मीटर बसवण्यास सुरूवात
नाशिक : साडे सात हजार स्मार्ट वॉटर मीटर बसविणार, स्मार्ट सिटीची योजना