चंद्रपुरात रक्ताचा तुटवडा; रक्तदान शिबीर घेण्याचे पोलीस अधीक्षकांचे निर्देश
चंद्रपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. हा तुटवडा भरून काढण्यासाठी चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांनी रक्तदान शिबिर घेण्याचे निर्देश दिले आहेत. पोलिस अधीक्षकांच्या निर्देशानुसार पोलीस विभागाच्या पुढाकारातून ठिकठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केल्या जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यात पोलीस ठाण्याच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्याचे निर्देश दिले. या रक्तदान शिबिराचे आयोजन सिन्देवाही पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि.११) पार पडले. सिन्देवाही तालुक्यातील सर्व संघटना व मंडळे यांचे संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर मंगळवारपासून सुरु करण्यात आले. मागील १० दिवसापासून पोलीस पाटील, विविध संघटना, युवक मंडळे, व्यापारी संघटना, विविध सामाजीक व धामीक संस्था यांच्या बैठका आयोजीत करून रक्तदानाबाबत महत्व पटवून देण्यात आले. त्याला सर्व स्तरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.