नाशिकपासून आंदोलनास सुरुवात; मंत्रालयावर बिऱ्हाड मोर्चा धडकणार

नाशिकपासून आंदोलनास सुरुवात; मंत्रालयावर बिऱ्हाड मोर्चा धडकणार

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा – आदिवासी विकास विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या ५५२ शासकीय आश्रमशाळा, वसतिगृह रोजंदारी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मंत्रालयावर बिऱ्हाड मोर्चा काढला आहे. महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग ३ आणि ४ कर्मचारी संघटनेच्या वतीने येथील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानापासून या आंदोलनाची सुरुवात झाली.
यावेळी माहिती देताना संघटनेच्या अध्यक्षा योगिता पवार यांनी सांगितले की, वेळोवेळी करण्यात आलेल्या मागण्यांची पूर्तता न झाल्याने बिऱ्हाड मोर्चा व रास्ता रोको करून मंत्रालयासमोर आतापर्यंत करण्यात आलेल्या सर्व पत्रांचा निषेध नोंदवण्यात येणार आहे. तसेच मंत्रालयावर आत्मदहन करण्यात येणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्र राज्य रोजंदारी कर्मचारी वर्ग ३ आणि वर्ग ४ कर्मचारी संघटनेने गेल्या वर्षापासून मानधनवाढीसाठी पाठपुरावा करूनदेखील कोणीही लक्ष दिले नाही. तसेच शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून कार्यरत असलेल्या वर्ग ३ आणि वर्ग ४ असलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्याबाबत वेळोवेळी पत्रव्यवहार करूनदेखील कोणीही दखल घेतली नाही. सद्यस्थितीत गेल्या १० वर्षांपासून कार्यरत असलेल्या वर्ग ३ आणि वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांचा विनाअट समायोजनाचा सकारात्मक विचार करून मागण्या मान्य कराव्यात, असेदेखील यावेळी अध्यक्षा पवार यांनी सांगितले आहे.
पहिला मुक्काम विल्होळीला
मानधनवाढीच्या मागणीसाठी मुंबई येथे निघालेल्या बिऱ्हाड मोर्चामध्ये ३५० च्या आसपास मोर्चेकरी सहभागी झाले आहेत. त्यांचा पहिला मुक्काम विल्होळी या ठिकाणी होत आहे.
प्रमुख मागण्या अशा…

वर्षापासून वर्ग ३ रोजंदारी तत्त्वावर कर्मचाऱ्यांना जितक्या दिवस काम तितके वाढीव मानधन फरकासह मिळावे
रिक्तपदावरती कार्यरत स्त्री अधीक्षिका आणि पुरुष अधीक्षक यांच्या मासिक मानधनात वाढ करावी
वर्ग ४ कर्मचाऱ्यांनादेखील आपल्या जिल्ह्यातील चालू दरानुसार वाढीव दराने मानधन देण्यात यावे
यंदाच्या शैक्षणिक वर्षात सर्व कार्यरत वर्ग ३ आणि वर्ग ४ रिक्तपदांवर रोजंदारी आणि तासिका कर्मचारी यांना सेवा सुरक्षा प्रदान करावी. तसेच सध्याच्या शैक्षणिक वर्षाचे रोजंदारी आणि तासिका कर्मचाऱ्यांचे विनाविलंब आदेश काढावे.
गेल्या शैक्षणिक वर्षातील रोजंदारी तासिका वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचारी यांचा धोरणात्मक निर्णय घेऊन थेट विनाअट समायोजन करण्यात यावे.

हेही वाचा:

Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | मंगळवार, ११ जून २०२४
अंतर्वस्त्रात लपवून आणले 19 कोटींचे सोने; 32 किलो सोन्याचे 98 तुकडे हस्तगत