मलावी देशाच्या उपराष्ट्रपतींना घेऊन जाणारे विमान बेपत्ता
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : पूर्व आफ्रिकेतील मालवी देशाचे उपराष्ट्रपती सॉलोस क्लॉस चिलिमा आणि इतर नऊ जणांना घेऊन जाणारे विमान बेपत्ता झाले आहे, असे मलावीच्या अध्यक्षांनी सोमवारी सांगितले. चिलिमा हे मलावी संरक्षण दलाच्या विमानातून राजधानी लिलोंग्वे येथून निघाले, मात्र त्यानंतर विमान प्राधिकरण अधिकाऱ्यांचा विमानाशी संपर्क झालेला नाही.
मलावीच्या राष्ट्रपती कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, चिलिमा मलावी संरक्षण दलाच्या विमानातून प्रवास करत होते. राजधानी लिलोंगवे येथून स्थानिक वेळेनुसार सकाळी ९.१७ वाजता (भारतीय वेळेनुसार १२.४५ वाजता) विमानाने उड्डाण केले होते. मात्र त्यानंतर विमानाशी संपर्क झालेला नाही. राष्ट्रपती लाझारस चकवेरा यांनी प्रादेशिक आणि राष्ट्रीय सैन्याला विमानाचा त्वरित शोध आणि बचाव कार्य सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्रपती चकवेरा बहामासला जाणार होते, मात्र या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपला दौरा रद्द केला आहे.
२०२२ मध्ये चिलिमा यांना अटक करण्यात आली तेव्हा त्यांचे अधिकार काढून घेण्यात आले होते. त्यांच्यावर एका ब्रिटीश-मलावी व्यावसायिकाचा समावेश असलेल्या लाचखोरी प्रकरणात भ्रष्टाचाराचा आरोप होता.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे विमानही बेपत्ता झाले होते. नंतर त्यांच्या विमानाचा अपघात झाला आणि त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते.
हेही वाचा :
युक्रेनकडून रशियाचे सुखोई-57 विमान उद्ध्वस्त
पुन्हा ‘टार्गेट किलिंग’..! भारतीय तरुणाची कॅनडामध्ये गोळ्या झाडून हत्या