सातेरीच्या डोंगराला भूस्खलनाचा धोका!

कोल्हापूर : सातेरीच्या डोंगरातील मौल्यवान दगड मिळविण्यासाठी तस्करांनी या डोंगराची पोखरण सुरू केली आहे, पण त्यामुळे या संपूर्ण डोंगर रांगेतच भूस्खलनाचा धोका निर्माण झालेला स्पष्टपणे दिसत आहे. काही ठिकाणी डोंगराला भल्या मोठ्या भेगाही पडल्या आहेत. त्यामुळे भविष्यात इथली दगड तस्करी लोकांच्या जीवावर बेतण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. भूस्खलन झाले सुरू! तस्करांनी सुरू केलेल्या पोखरणीमुळे …

सातेरीच्या डोंगराला भूस्खलनाचा धोका!

सुनील कदम

कोल्हापूर : सातेरीच्या डोंगरातील मौल्यवान दगड मिळविण्यासाठी तस्करांनी या डोंगराची पोखरण सुरू केली आहे, पण त्यामुळे या संपूर्ण डोंगर रांगेतच भूस्खलनाचा धोका निर्माण झालेला स्पष्टपणे दिसत आहे. काही ठिकाणी डोंगराला भल्या मोठ्या भेगाही पडल्या आहेत. त्यामुळे भविष्यात इथली दगड तस्करी लोकांच्या जीवावर बेतण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
भूस्खलन झाले सुरू!
तस्करांनी सुरू केलेल्या पोखरणीमुळे या भागात भूस्खलनाच्या घटना सुरूही झाल्या आहेत. सातेरी महादेव मंदिराच्या पायथ्यानजिक जमिनीला जवळपास तीनशे फूट लांबीची भली मोठी भेग पडलेली आहे. ‘हुंबरण्याचे पाणी’ या भागात डोंगराचा चार-पाच एकर भाग तुटून खालच्या बाजूच्या शेतात कोसळलेला आहे. करंजकड्याजवळही डोंगराचा मोठा भाग यापूर्वी घसरलेला आहे आणि भविष्यातही घसरण्याची शक्यता आहे. अशाप्रकारे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या पाऊलखुणा उमटू लागलेल्या आहेत.
नागरी वस्त्यांना धोका
गेल्या एक-दोन वर्षांत तस्करांनी मौल्यवान दगडासाठी संपूर्ण सातेरी डोंगराची जणू काही चाळणच करून टाकली आहे. त्यामुळे या भागातील धोंडेवाडी, मारुती धनगरवाडा, केकतवाडी, नरगेवाडी, बेरकळवाडी, दोनवडी, सावतवाडी, सावर्डे, मांडरे, चाफोडी, गर्जन, कारंडेवाडी या गावांना आणि वाड्या-वस्त्यांना भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. भविष्यात या भागात भूस्खलनासारखी एखादी दुर्घटना घडल्यास त्याला सर्वस्वी बेकायदा उत्खनन आणि ते करणारे तस्करच कारणीभूत असणार आहेत.
रस्त्यांची वाताहात!
दगडाच्या तस्करीसाठी वापरण्यात येत असलेल्या जेसीबीसारख्या वाहनांमुळे या भागातील रस्त्यांची वाट लागलेली आहे. या भागातील बहुतांश रस्त्यांवर भलेमोठे खड्डे पडले आहेत. साईडपट्ट्या खचल्या आहेत. आधीच हा सगळा भाग ग्रामीण असल्यामुळे आठ-दहा वर्षे रस्त्यांची कामे होत नाहीत, तशातच पावसाचे प्रमाणही जादा असल्यामुळे रस्ते जास्त काळ टिकत नाहीत आणि आता तस्करांनीही रस्त्यांची वाट लावायला सुरुवात केली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या तस्करीमध्ये कोण कोण मंडळी गुंतली आहेत, त्याचा शोध घेऊन संबंधितांकडून रस्त्यांची नुकसान भरपाई वसूल करण्याची आवश्यकता आहे.
तस्करांना मिळतेय राज्यकर्त्यांचे अभय!
या भागातून मौल्यवान दगडांची तस्करी करणारे जिल्ह्यातील वेगवेगळ्या राजकीय नेत्यांशी लागेबांधे ठेवून आहेत. त्यामुळे यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला की संबंधितांवर नेत्यांकडून दबाव आणला जातो. तक्रार करणार्‍या नागरिकांना धमकावले जाते. काही तक्रारदारांना मारहाणही झालेली आहे. त्यामुळे या भागातील नागरिक सहसा या तस्करांच्या नादाला लागत नाहीत. दगडांच्या तस्करीतून मिळणार्‍या हरामच्या पैशातून गेल्या काही दिवसांत हे तस्कर बरेच मस्तवाल झाले आहेत. राजाश्रयाच्या जोरावर आपले कुणीच काही बिघडू शकत नाही, अशा घमेंडीत ते आहेत. जिल्हा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारून या मुजोर तस्करांना ताळ्यावर आणण्याची गरज आहे.
प्रशासनही वाटेकरी!
1. येथील बेकायदा उत्खननाबाबत या भागातील काही नागरिकांनी जिल्हा खणीकर्म अधिकारी आणि वनखात्याकडे तक्रारी केल्या असल्याची माहिती या भागातील नागरिकांनी दिली, पण या तक्रारींची संबंधित अधिकार्‍यांनी दखल घेतली नाही.
2. प्रशासनातील काही अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे या भागातील दगड तस्करांशी चांगलेच लागेबांधे निर्माण झाले आहेत आणि त्यांच्या ‘अर्थपूर्ण’ संबंध प्रस्थापित झाले असल्याचेही इथल्या नागरिकांचे निरीक्षण आहे.
3. काही शासकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे या बेकायदा उत्खननाला ‘अर्थपूर्ण अभय’ मिळत असल्याची चर्चा या भागात आहे.