जिल्हा बँकेत स्वीकृत दोन संचालकांसाठी हालचाली
आशिष ल. पाटील
गुडाळ : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर रिक्त स्वीकृत संचालकांच्या दोन जागा भरण्याच्या हालचाली सुरू असून बँकेचे दिवंगत ज्येष्ठ संचालक आ. पी. एन. पाटील यांच्या रिक्त जागी त्यांचे सुपुत्र राजेश पाटील यांची नियुक्ती करतानाच त्यासोबतच गेली अडीच वर्षे रिक्त असलेल्या स्वीकृत संचालकांच्या दोन जागाही भरण्याचा निर्णय झाला असल्याचे समजते. यापैकी एक जागा पालकमंत्री हसन मुश्रीफ गटाला तर दुसरी जागा आ. विनय कोरे गटाला मिळण्याची शक्यता आहे.
5 जानेवारी 2021 रोजी जिल्हा बँकेची पंचवार्षिक निवडणूक झाली. या निवडणुकीत तत्कालीन खासदार संजय मंडलिक, माजी आमदार संपतराव पवार-पाटील, आ. प्रकाश आबिटकर, बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर हे एका बाजूला आणि ना. मुश्रीफ, स्व. पी. एन. पाटील, आ. सतेज पाटील, आ. विनय कोरे, आ. राजेश पाटील, माजी आमदार अमल महाडिक आदी सर्वपक्षीय जिल्ह्यातील उर्वरित मंडळी एका बाजूला अशी निवडणूक झाली. या निवडणुकीत सर्वपक्षीय आघाडीने 21 पैकी 18 जागा जिंकल्या तर विरोधी आघाडीने प्रक्रिया गटातून खा. संजय मंडलिक, बाबासाहेब पाटील (आसुर्लेकर) तर पतसंस्था गटातून प्रा. अर्जुन आबिटकर अशा एकूण तीन जागा जिंकल्या.
अनुभवी संचालकांची वर्णी लागणार
सत्तारूढ आघाडीकडे स्पष्ट बहुमत असूनही जिल्ह्यातील सतत बदलणार्या राजकीय घडामोडीमुळे संचालक मंडळाने नियुक्त करावयाच्या दोन स्वीकृत संचालकांच्या जागा भरण्यात आल्या नव्हत्या. आता स्व. पी. एन. पाटील यांच्या रिक्त जागी त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र राजेश पाटील यांना घेण्यात येत असून जूनअखेर होणार्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय होण्याची शक्यता आहे. याच बैठकीत स्वीकृत संचालकांच्या उर्वरित दोन जागाही भरण्याच्या हालचाली सुरू आहेत. या दोन्ही जागांवर जुन्या अनुभवी संचालकांना संधी मिळण्याची शक्यता आहे.