तडका : मग काहीच खात्री नसते!
पावसाळा आला की, ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होणारच आणि लगेच पाठोपाठ पाऊस सुरू होणार हे ठरलेले असते. आपण आपले आभाळाकडे बघून किती वेळात पाऊस येईल, याचा अंदाज बांधत असतो आणि त्याप्रमाणे नियोजन करत असतो. सामान्य माणसाचे नियोजन म्हणजे असतेच काय? तर जर घराबाहेर पडायची शक्यता असेल व बाहेर पडायचे असेल तर सोबत निघताना छत्री घेऊन निघावे. शिवाय राज्यात बरेच लोक पावसाचा व्यक्तिगत अंदाज सांगत असतात. त्यावरूनही बरेच शेतकरी शेतीचे नियोजन करत असतात. शिवाय हवामान विभाग यांचे रेडिओ आणि टीव्हीवर प्रसारित होणारे अंदाज असतात. या सर्वांच्या शिवाय एक महाशक्ती पावसाचा अंदाज लावणारी अस्तित्वात आहे आणि ती म्हणजे विद्युत वितरण करणारी कंपनी.
निसर्गात होणारे काही बदल सेन्सरच्या साहाय्याने टिपून तत्काळ वीज खंडित करण्याचे टेक्निक जे वैदिक काळातही नव्हते, ते आमच्या राज्यात आहे. अभिमान आहे मला की, आपण वैदिक शहरांपेक्षा श्रेष्ठ अशा आधुनिक शहरात वास्तव्यास आहोत. थोडेफार ढग आभाळात जमा झाले किंवा थोडासा वारा सुटल्याबरोबर सभोवताली महत्त्वाची घटना कोणती घडत असेल तर ती म्हणजे सर्वात प्रथम वीज जाते. अमेरिकेसारख्या प्रगत देशात 24 तास 12 महिने वीज असते. विशेषत: अमेरिकेत थॉमस अल्वा एडिसन या विजेचा शोध लावणार्या शास्त्रज्ञाच्या सन्मानार्थ त्याच्या जन्मदिनी दोन मिनिटांसाठी वीज घालवली जाते. ही एवढी दोन मिनिटांची वेळ वगळता जवळपास अखंडित वीजपुरवठा अमेरिका या देशाला होत असतो. त्या अर्थाने पाहिले तर आपल्या राज्यात एडिसनचा वाढदिवस रोज किमान दहा ते पंधरा वेळा साजरा केला जातो, असे म्हणता येईल. वीज परत येण्यास किती वेळ लागेल, यावर कोणाचेही नियंत्रण नाही आणि ती परत कधी येईल, याची खात्रीशीर माहिती कोणीही देऊ शकत नाही. आपण सामान्य नागरिक वीज गेल्याबरोबर एखादे खपट हातात घेऊन वारा घेत चेहर्याभोवती फिरणार्या चिलटांना आणि उष्णतेला प्रतिरोध करण्याचा प्रयत्न करत असतो.
महानगरीय शहरे वगळता राज्यातील कोणत्याही गावात, साधारण शहरात तुम्ही गेलात आणि रात्रीच्या वेळेला वीज गेली तर ती दुसर्या दिवशी दहा वाजेपर्यंत येण्याची शक्यता अजिबातच नसते. हा सारा चमत्कार वीज वितरण कंपनी करत असते. या कंपनीचे जे कार्यालय असते, तेथील फोन नंबर सर्वांना दिले जातात; परंतु तो फोन कधीही कोणी उचलत नाही. थेट तो फोन काढून टेबलावर ठेवलेला असतो.
आपण सामान्य नागरिक असंख्य वेळा फोन करून तो व्यस्त असल्याची माहिती घेत असतो आणि हातावर हात ठेवून निवांत बसलेलो असतो. एवढ्यावर तुम्ही फार चिकाटी दाखवत संबंधित कार्यालयात स्वतः पोहोचलात तर तिथे तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यास कोणीही नसते. रिकामी टेबल आणि खुर्च्या यासह एखादा माणूस जर सापडला आणि त्याला जर तुम्ही विचारले, तर तो सांगतो की, मी येथील सेवक आहे आणि सर्व लाईनमन कामावर गेलेले आहेत. कुठे-कुठे फॉल्ट आहे आणि ते सर्व कर्मचारी कामात व्यस्त असल्यामुळे तुमच्यासाठी कोणी उपलब्ध नाही. मग तुम्हाला निराश होऊन घरी परतण्याशिवाय पर्यायच नसतो.