पीपीएफवर कर्ज घेताय?
प्रसाद पाटील
पीपीएफ म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीतून कर्ज घेणे वैयक्तिक कर्जापेक्षा स्वस्त आहे. या कर्जाच्या रकमेवर 8.1 टक्के व्याज (पीपीएफमध्ये जमा केलेल्या रकमेवरील व्याज + 1 टक्के) भरावे लागेल. वैयक्तिक कर्जासाठी सध्याचे व्याज 10 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
पीपीएफवर कर्ज घेण्यासाठी काहीही तारण ठेवण्याची गरज भासत नाही. तथापि, पीपीएफकडून कर्ज घेणे गुंतवणुकीच्या द़ृष्टिकोनातून योग्य मानले जात नाही. याचे पहिले कारण म्हणजे पीपीएफमधील गुंतवणुकीवर मिळणारे व्याज करमुक्त असते. दुसरे म्हणजे हे व्याज चक्रवाढ असते आणि तिसरे म्हणजे तुम्ही पीपीएफवर जास्त रकमेचे कर्ज घेऊ शकत नाही. याखेरीज पीपीएफ कर्जाच्या बाबतीत परतफेडीची अंतिम मुदतदेखील महत्त्वाची असते.
पीपीएफमधील गुंतवणुकीवर तिहेरी कर लाभ उपलब्ध आहे. म्हणजे ठेवी, व्याज आणि काढणे, या तिन्हींवर कर सूट मिळते. या योजनेत जमा केलेल्या रकमेवर आयकर कायदा 1961 च्या कलम 80 सी अंतर्गत वजावटीचा लाभ मिळतो. परंतु हा लाभ तुम्हाला जुन्या कर प्रणालीमध्येच मिळेल.
तुम्ही जर कराच्या कक्षेत येत नसाल, तर काही फरक पडत नाही; पण जर तुम्ही येत असाल, तर कर्जावरील व्याज करमुक्त आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही 20 टक्के टॅक्स ब्रॅकेटमध्ये असाल, तर तुम्हाला पीपीएफवर 7.1 टक्क्यांऐवजी 8.52 टक्के व्याज मिळत आहे, असे समजावे. तुम्ही 30 टक्के टॅक्स ब्रॅकेटमध्ये आलात, तर तुम्हाला 7.1 टक्क्यांऐवजी 9.23 टक्के व्याज मिळत आहे, असे समजावे. चालू तिमाहीत (एप्रिल-जून 2024) पीपीएफवर 7.1 टक्के व्याजदर आहे. पीपीएफ आणि इतर लहान बचत योजनांवरील व्याजदर प्रत्येक तिमाहीत सरकार ठरवते. एप्रिल 2020 पासून पीपीएफवरील व्याजदरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
पीपीएफवर मिळणार्या व्याजाची चक्रवाढदेखील दीर्घ कालावधीत होते. कारण 15 वर्षे (ज्या आर्थिक वर्षात खाते उघडले आहे त्या आर्थिक वर्षानंतर 15 वर्षे) हा या योजनेचा परिक्वता कालावधी आहे. यानंतरही, तुमच्याकडे ही योजना 5 वर्षांच्या ब्लॉकमध्ये वाढवण्याचा पर्याय आहे. तुम्ही कर्जाच्या तिसर्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या वर्षी कर्ज घेतल्यास, तुम्ही परतफेड करेपर्यंत तुम्हाला कर्जाच्या रकमेवर चक्रवाढ करण्याची सुविधा मिळणार नाही. याचा परिणाम तुम्हाला दीर्घकाळात मिळणार्या परताव्यावर होईल.
या योजनेच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये तुम्ही कमाल मर्यादा म्हणजेच रु. 1.5 लाख प्रतिवर्ष गुंतवल्यास, नंतरच्या वर्षांत तुम्हाला चक्रवाढीचा अधिक लाभ मिळेल. त्याच वेळी, ज्या आर्थिक वर्षात तुम्ही पीपीएफ खाते उघडले असेल, त्या आर्थिक वर्षाच्या समाप्तीनंतर पाचव्या आर्थिक वर्षाच्या समाप्तीपर्यंत तुम्हाला एकदाच पीपीएफकडून कर्ज घेता येते. त्यामुळे चक्रवाढीचा जास्तीत जास्त फायदा मिळवायचा असेल, तर पीपीएफमधून कर्ज घेणे टाळावे. म्हणजेच सुरुवातीच्या वर्षांत गुंतवणुकीत छेडछाड करू नका.
एका आर्थिक वर्षात या योजनेतील गुंतवणुकीची कमाल मर्यादा रु. 1.5 लाख आहे. तुम्ही पीपीएफ खात्यात वर्षाला जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवले असले तरीही, सध्याच्या 7.1 टक्के व्याजदरानुसार तुम्हाला तिसर्या, चौथ्या दरम्यान अनुक्रमे 40,136 रुपये; 83,177 रुपये; 1,29,245 रुपये मिळतील. पाचव्या आणि सहाव्या आर्थिक वर्षात 1,78,583 रुपये अधिक कर्ज म्हणून मिळू शकतात. तुम्ही वर्षाला जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवले असतील तरच ही रक्कम मिळेल. परंतु जर तुम्ही यापेक्षा कमी रक्कम गुंतवली, तर तुम्हाला कर्ज म्हणून कमी रक्कम मिळेल.
पीपीएफमधून घेतलेले कर्ज 36 महिन्यांच्या आत (मूळ रक्कम) एकरकमी किंवा हप्त्यांमध्ये परत करणे आवश्यक असते. मूळ रक्कम भरल्यानंतर तुम्ही जास्तीत जास्त दोन मासिक हप्त्यांमध्ये व्याज देऊ शकता. याउलट वैयक्तिक कर्जासाठी सहा वर्षांचा काळ मिळतो. आपण बँकेच्या मुदत ठेवीवर कर्ज घेतल्यास, कर्जाची परतफेड करण्याची कालमर्यादा म्हणजे एफडीचा परिपक्वता कालावधीनुसार असते.
हे सर्व लक्षात घेता, पीपीएफवर कर्ज घेण्याचा पर्याय हा व्यावहारिकद़ृष्ट्या फायदेशीर ठरत नाही.