जेवणातील मीठ कमी करणारा इलेक्ट्रिक चमचा

जेवणातील मीठ कमी करणारा इलेक्ट्रिक चमचा

टोकियो : मिठाशिवाय जेवण अळणी होते; पण आहारातून मिठाचे अत्याधिक सेवन हे आरोग्यासाठी धोकादायकही ठरते. अनेक वेळा आपल्याला जेवणात अतिरिक्त मीठ आहे, हे समजत नाही. अर्थात त्यासाठी अन्न खारटच असावे लागते, असे काही नाही. गरजेपेक्षा अधिक मीठ असेल, तर ते कमी करण्यासाठी आता जपानी संशोधकांनी एक विशेष चमचा तयार केला आहे. हा इलेक्ट्रिक चमचा जेवणातील हे अतिरिक्त मीठ कमी करतो आणि तेही चव न बिघडवता! सध्या तंत्रज्ञान इतकं पुढे गेलं आहे की, जवळ जवळ सगळ्याच गोष्टी आता इलेक्ट्रिकच्या रूपात मिळू लागल्या आहेत.
आपण दात घासण्यासाठी जो टूथब्रश वापरतो, तो सुद्धा आता इलेक्ट्रिकच्या रूपात आला आहे. अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये हा इलेक्ट्रिक चमचा असून, तो जेवणात असणार्‍या मिठातील सोडियमचे अतिरिक्त प्रमाण कमी करण्यास मदत करणार आहे. जपानच्या किरिन होल्डिंग्स नावाच्या कंपनीने हा इलेक्ट्रिक चमचा तयार केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार हा चमचा आरोग्यासाठी लाभदायक असून, जेवणात वापरल्या जाणार्‍या मिठातील सोडियमचे प्रमाण कमी करतो. ज्यामुळे जेवण आरोग्यदायी राहते. त्याच बरोबर जेवणाची चव कुठेही कमी होणार नसल्याचे देखील कंपनीकडून सांगण्यात आले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार हा इलेक्ट्रिक चमचा लवकरच बाजारात येणार असून, तो 19800 येन इतक्या किमतीत मिळणार आहे.
भारतीय चलनानुसार जर बोलायच झालं तर 10,500 रु. मध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार येत्या 5 वर्षांत एकूण 1 दशलक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा उद्देश आहे. सुरुवातीला हा इलेक्ट्रिक चमचा फक्त जपानमध्ये विकला जाणार असून, पुढच्या वर्षापासून इतर देशांमध्ये त्याची विक्री सुरू होईल. हा चमचा प्लास्टिक व धातूचा वापर करून तयार करण्यात आला आहे. तसेच हा चमचा बनवण्यासाठी जपानच्या मेजी विद्यापीठात अध्यापन करणार्‍या प्रोफेसर होमी मियाशिता यांची देखील मदत घेण्यात आली आहे.