टोकियो : आरोग्यासाठी आंबवलेले पदार्थ उपयुक्त ठरत असतात. असे पदार्थ प्रोबायोटिक्स म्हणजेच आतड्यातील लाभदायक जीवाणूंचे प्रमाण वाढवतात. जपानमधील लोक त्यांचे दीर्घकाळ टिकून राहिलेले तारुण्य आणि दीर्घायुष्य यासाठीही ओळखले जातात. त्यांच्या नाश्त्यामध्ये असलेला एक पदार्थ त्यासाठी त्यांना मदत करीत असतो. हा पदार्थ घाणेरड्या वासाचा आणि गिळगिळीत, चिकट असला, तरी तो त्यांचे ‘सुपरफूड’ ठरलेला आहे. त्याचे नाव ‘नट्टो’. आंबवलेल्या सोयाबीनपासून नट्टो हा पदार्थ तयार केला जातो. अमोनियासारखा त्याचा वास आणि त्याचं चिकटसं दिसणं, हा पदार्थ खाऊन मोठं झालेल्या अनेक जपानी लोकांनाही आवडत नाही!
2017 साली जपानमधील निफ्टी या इंटरनेट पुरवणार्या कंपनीने सर्वेक्षण केलं होतं. त्यात 62 टक्के लोक हा पदार्थ आवडीने खात असल्याचं दिसलं, तर 13 टक्के याचे फायदे माहिती असूनही नट्टोला हात लावत नव्हते. लंडन कुकिंग स्कूल चालवणार्या जपानी शेफ युकी गोमी म्हणतात, नट्टोचा वास फारच घाण असतो. त्याचा वास टाळता येत नाही; पण तरीही माझ्या फ्रिजमध्ये नट्टो नेहमी असतं. घराघरांत चीज आणि दही असावं, तसं गोमीच्या घरात नट्टो आढळतं. नट्टो हे एक सुपरफूड आहे, असं जपानी लोक मानतात. त्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि हृदयरोगाचं प्रमाण कमी होतं, असं त्यांना वाटतं. नट्टोमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिनं, लोह आणि तंतुमय पदार्थ म्हणजे फायबर्स असतात. त्यामुळे रक्तदाब आणि वजनावर सकारात्मक परिणाम होतो. तारुण्य टिकायलाही यामुळे मदत होते. जपान सरकारने निश्चित केलेली व्हिटॅमिन-के ची पातळी (प्रत्येक माणसाला दिवसभरात आवश्यक असलेलली पातळी) 40-50 ग्रॅम नट्टो खाल्ल्यावर पूर्ण होते. त्यामुळे ऑस्टिओपोरोसिसला दूर ठेवण्यासाठी मदत होते.
नट्टोमध्ये व्हिटॅमिन ब-6, व्हिटॅमिन- ई मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या पडत नाहीत. हे आंबवलेले सोयाबीन जपानी खाद्यसंस्कृतीत गेली अनेक शतके आहे. तेव्हा याच्या पोषणविषयक फायद्यांबद्दल फारशी माहितीही नव्हती. कॅलिफोर्नियामधील क्लेरमॉन्टच्या पोमोना कॉलेजमध्ये जपानी इतिहास शिकवणारे डॉ. सॅम्युएल यामाशिता यांच्या मते हा पदार्थ इ.स. 710 ते 784 मध्ये असलेल्या नारा काळात चीनमधून जपानमध्ये आलं. कामाकुरा काळात (इस. 1192-1333) अभिजात वर्ग, लढवय्यांमध्ये हा पदार्थ लोकप्रिय झाला, असं इतिहास सांगतो. मुरोमोची काळात शाकाहारी पदार्थांमध्ये टोफूबरोबर हा पदार्थ खाल्ला जाऊ लागला; तर इडोकाळात त्याला महत्त्वाचा पदार्थ म्हणून स्थान मिळालं आणि तो घराघरांत बनवला जाऊ लागला. सुपरफूड म्हटलं जात असलं, तरी नट्टो जपानच्याबाहेर लोकप्रिय नाही.
जपानचा ‘हा’ ‘सुपरफूड’ पदार्थ दीर्घायुष्यासाठी लाभदायक