चटपटीत पॉपकॉर्नचा ‘हा’ आहे इतिहास

चटपटीत पॉपकॉर्नचा ‘हा’ आहे इतिहास

वॉशिंग्टन : पॉपकॉर्न म्हणजे मक्याच्या भाजलेल्या लाह्या. सध्याच्या काळात पॉपकॉर्नला जगातला सर्वांत लोकप्रिय स्नॅक्स म्हटलं, तरीही चालेल. चित्रपट पाहताना असो वा संध्याकाळी चहाच्या वेळी, बागेत असो वा गप्पा मारताना पॉपकॉर्न प्रत्येक वेळेसाठी आणि वातावरणासाठी एकदम झकास स्नॅक्स आहे, याबाबत कुणाचं दुमत नसेल. बरं पॉपकॉर्न हे पचायला पण हलके आणि आरोग्यदायी असतात. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्यात मीठ आणि लोणी टाकू शकता; पण त्यानं हा आरोग्यदायी गुण अबाधित राहणार नाही. पॉपकॉर्न फक्त आपल्याच देशातच नाही, तर जगात सगळीकडं खाल्लं जातं. याचा सर्वात जुना संदर्भ अमेरिका खंडात सापडतो. उत्तर आणि दक्षिणी अमेरिकेमध्ये रेड इंडियन ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी पॉपकॉर्नचे दाणे सापडले, असं सांगितलं जातं. एक किस्सा तर असा पण सांगितला जातो की, जेव्हा हे दाणे पुरातत्त्व वैज्ञानिकांना सापडले, तेव्हा त्यांनी ते भाजण्याचा प्रयत्न केला होता.
गंमत म्हणजे हजार वर्ष जुने असलेले दाणे गरम झाल्यानंतर लगेच फुटले. याचं कारण म्हणजे दाण्यांचं वरचं आवरण हे जाड असतं. साधारणतः 200 डिग्री तापमानावर हे दाणे फुटतात आणि त्याचा पॉपकॉर्न तयार होतो. आज पूर्ण जगाला पॉपकॉर्ननं वेड लावलं आहे. एक अमेरिकन नागरिक वर्षाला सरासरी पन्नास लिटर पॉपकॉर्न खातो, असं म्हटलं जातं. तर ब्रिटनमध्ये गेल्या पाच वर्षांत पॉपकॉर्नच्या विक्रीमध्ये 169 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसं पाहायला गेलं तर याचा इतिहास अगदी पुरातन आहे. पण, सर्वात आधी पॉपकॉर्न खाण्याची सुरुवात अमेरिकेत झाली, असं म्हणतात. अमेरिकेचे मूळ निवासी पॉपकॉर्न खात असत. त्याठिकाणी गेलेल्या युरोपीय लोकांनी देखील पॉपकॉर्न खाण्यास सुरुवात केली.
जर तुम्हाला याबाबत काही गैरसमज असतील, तर चला ते दूर करून घेऊ. पहिली गोष्ट पॉपकॉर्न त्या मक्याच्या कणसापासून बनत नाही जे आपण नेहमी खातो. पॉपकॉर्न एका मक्याच्या विशिष्ट जातीपासून बनवतात. वायव्य अमेरिकेतल्या काही गुहांमध्ये वैज्ञानिकांना मक्याचे दाणे सापडले होते. तसंच दक्षिण अमेरिकेतही असा मका खात असावेत, असं म्हटलं जातं. प्रसिद्ध वैज्ञानिक थॉमस हार्पर गुडस्पीड यांनी याबाबत काही गंमतीशीर तथ्य सांगितली आहेत. 1941 मध्ये त्यांनी एक पुस्तक लिहिलं. संशोधन करत असताना चिलीच्या वैज्ञानिकांनी त्यांना 1000 वर्ष जुने पॉपकॉर्नचे दाणे मिळाल्याचं ‘प्लांट हंटर्स इन द अँडीज’ या पुस्तकात लिहिलं आहे. एकदा त्यांना वाटलं की, हे खरंच पॉपकॉर्नचे दाणे आहेत की नाही. त्यामुळे त्यांनी ते भाजण्याचा विचार केला. त्यांना वाटलं, हे दाणे भाजले जाणार नाहीत; पण उष्ण तापमानावर भाजल्यावर हे दाणे फुटले. जणू काही मागच्याच वर्षी शेतातून हे दाणे काढले असावेत.