खासदार बळवंत वानखडे यांचे पोस्टर फाडले; अमरावतीत तणाव

खासदार बळवंत वानखडे यांचे पोस्टर फाडले; अमरावतीत तणाव

अमरावती, Bharat Live News Media वृत्तसेवा: खासदार बळवंत वानखडे यांच्या विजयाप्रित्यर्थ महाविकास आघाडीच्या वतीने राजकमल चौकात लावलेले बॅनर रविवारी (दि.9) रात्री फाडल्यामुळे अमरावतीत तणाव निर्माण झाला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे यांनी भाजप उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव केला. निवडणूक निकाल लागून पाच दिवस झाले असताना रविवारी रात्री खासदार बळवंत वानखडे यांचे बॅनर-फाडण्यात आले आहे.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यामुळे अमरावतीत भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाकडून राजकमल चौकात जल्लोष सुरू करण्यात आला. या जल्लोषादरम्यानच काही अज्ञात व्यक्तींनी बळवंत वानखडे यांचे पोस्टर फाडले. येथे लावलेले बॅनर-पोस्टर महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या वतीने लावण्यात आले होते. त्यामुळे ही माहिती मिळताच शिवसेना ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख सुधीर सूर्यवंशी यांच्यासह इतर पदाधिकारी व शिवसैनिक घटनास्थळी पोहोचले.
महायुती आणि महाविकास आघाडी असे दोन्ही कडील पदाधिकारी व कार्यकर्ते एकाच ठिकाणी असल्याने त्यांनी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. दरम्यान काही वेळातच घोषणाबाजीचे रूपांतर बाचाबाचीत झाले. त्यामुळे राजकमल चौकात चांगलाच तणाव निर्माण झाला होता. परिस्थितीचे गांभीर्य पाहून अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या राजकमल चौकात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
हेही वाचा :

मोदींच्या मंत्रिमंडळात अजित पवारांच्‍या राष्‍ट्रवादीला प्रतिनिधित्व नाही! फडणवीसांनी सांगितले कारण
‘हे’ पदार्थही उकाड्यात शरीर ठेवतात थंड
Lok Sabha election 2024 : विदर्भात महायुतीला जबर धक्का