Lok Sabha Election 2024 : मोदी फॅक्टरच ठरला प्रभावी…

पक्षाची सक्रियता-निष्क्रियता यांवर निवडणुकीचा निकाल कितपत अवलंबून असतो?… निकालावर त्याची छाया पडू शकते, पण इतर सर्व मुद्द्यांना भिरकावून देण्याची ताकद एकाच मुद्द्यात असते आणि तो म्हणजे लोकमानस. पुण्याच्या निवडणुकीतही नेमके हेच घडले. प्रचारातील विस्कळितपणा, पक्ष-उमेदवाराचे पाय ओढण्याचे दोन्ही बाजूंकडून करण्यात आलेले प्रयत्न, दिखाऊ आणि वरवरचा प्रचार, झपाट्याने कमी कमी होत जाणारी प्रामाणिक कार्यकर्त्यांची जात यांचा …

Lok Sabha Election 2024 : मोदी फॅक्टरच ठरला प्रभावी…

सुनील माळी

पक्षाची सक्रियता-निष्क्रियता यांवर निवडणुकीचा निकाल कितपत अवलंबून असतो?… निकालावर त्याची छाया पडू शकते, पण इतर सर्व मुद्द्यांना भिरकावून देण्याची ताकद एकाच मुद्द्यात असते आणि तो म्हणजे लोकमानस. पुण्याच्या निवडणुकीतही नेमके हेच घडले. प्रचारातील विस्कळितपणा, पक्ष-उमेदवाराचे पाय ओढण्याचे दोन्ही बाजूंकडून करण्यात आलेले प्रयत्न, दिखाऊ आणि वरवरचा प्रचार, झपाट्याने कमी कमी होत जाणारी प्रामाणिक कार्यकर्त्यांची जात यांचा अनुभव दोन्ही प्रमुख पक्षांना येऊनही त्या सर्वांना एकच बाब पुरून उरली…पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना म्हणजेच भाजपला संधी देण्याचा निर्णय केलेले पुण्याचे लोकमानस…
निवडणूक हा ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटप्रमाणेच खेळ असल्याची उपमा हल्ली काही जण देतात. कधी खेळ जसजसा पुढेपुढे सरकत जातो, तसतसा विजयाचा लंबक मागे-पुढे हेलकावे घेतो आणि शेवटच्या टप्प्यावर जो जोर धरतो तो विजयी होतो. कधी पहिल्या षटकापासूनच धावा निघायला लागतात किंवा गडी बाद होऊ लागतात आणि सामन्याचा निकाल तेथेच निश्चित होतो. पुण्याच्या निवडणुकीत उमेदवारांची निश्चिती होऊन प्रचाराला सुरूवात झाली तेव्हाच या लढतीच्या परिणामाचा अंदाज जाणत्यांना आला होता. अगदी ‘Bharat Live News Media’ने प्रसिद्ध केलेल्या पहिल्या टप्प्यातील पुण्याच्या वार्तापत्रातही त्याचे संकेत देण्यात आले होते, मात्र सामन्यातला दर्जेदार खेळाडू किंवा राजकीय रणातला झुंजार योद्धा शस्त्र न टाकता शेवटपर्यंत झुंजत राहतो आणि बाजू पलटवण्याची उमेद निर्माण करतो, तशीच दर्जेदार खेळी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याकडून झाली. त्यांनी मतदानाच्या दिवसापर्यंत प्रचारवादळ उठवले, त्यामुळे अखेरच्या टप्प्यात ”घासून होईल…” ”कोण निघून जाईल काही सांगता येत नाही…”, अशी चर्चा दोन्ही बाजूंची मंडळी करू लागली. प्रत्यक्षात लोकमानस पहिल्यापासूनच ठरलेले होते आणि त्याप्रमाणेच निकाल लागला.
या निवडणुकीची तुलना २०१४ तसेच २०१९ च्या निवडणुकीशी करण्यात येते. त्या निवडणुकांत भाजपचे मताधिक्य अनुक्रमे तीन लाख १५ हजार आणि जवळपास सव्वातीन लाख गाठणारे होते. आताच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचे मताधिक्य एक लाख २२ हजारांपर्यंत उतरल्याने भाजपची पिछेहाट झाल्याचे मत व्यक्त करण्यात येते. याबाबत दोन मुद्दे लक्षात घ्यायला हवेत. एक म्हणजे शिवसेनेची एकसंध ताकद यावेळी भाजपच्या मागे नाही.
पुण्यात उद्धव ठाकरे यांना मानणाऱ्या कार्यकर्ते-मतदारांची एक विशिष्ट संख्या असून ती यंदा भाजपच्या विरोधात होती. तसेच गेल्या दोन्ही निवडणुकांत तीव्रतेने जाणवलेली मोदी लाट यंदा तितकीशी प्रभावी उरली नव्हती. अर्थात लाट जरी नसली तरी अन्य पर्याय अजून परिपक्व झाला नसल्याने मोदी यांनाच स्वीकारण्याचे लोकमानस पुण्यात दिसत होते.
निवडणुकीतील विजयासाठी जे जे सर्वोच्च प्रयत्न करता येतील, ते ते भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाकडून करण्यात आले होते. दोन्ही पक्षांनी त्यांच्या सर्वोच्च नेत्यांना पुण्यात प्रचारासाठी आणले. भाजपने नरेंद्र मोदी आणि काँग्रेसने राहुल गांधी यांच्या सभा आयोजित केल्या आणि गर्दी जमवून वातावरण निर्मितीही केली. तसेच देश आणि राज्य पातळीवरील अनेक नेते पुण्याच्या प्रचारात दोन्ही पक्षांनी उतरवले.
केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, जयशंकर, शशि थरूर, शरद पवार, चंद्रशेखर बावनकुळे, पृथ्वीराज चव्हाण, राज ठाकरे आदी नावे वानगीदाखल घेता येतील. परंतु पक्षपातळीवर चिंतन करण्याचा भाग असा की दोन्ही पक्षांच्या यंत्रणेची एकसंध, जोमदार, प्रामाणिक साथ उमेदवारांना मिळाली नाही. पक्षातील ज्येष्ठांनीच पक्षविरोधी प्रचार करणे, ‘हे निवडून आले तर पुढच्या पंधरा वर्षांचे आमचे अस्तित्त्व संपुष्टात येईल’, अशी स्पर्धकांना भीती वाटल्याने त्यांनी दिखाऊ उपस्थिती लावून निष्क्रिय राहणे असे प्रकार दोन्ही पक्षांच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना खटकत होते. दोन्ही उमेदवारांच्या पाठिशी तीन-तीन पक्षांची फौज होती. शेवटच्या टप्प्यात तर भाजपला मनसेचे इंजिनही लागल्याने त्या तीनांचे चार झाले, पण हे पाठिशी राहणारे कार्यकर्ते पाठिशीच राहिले, ते पोटाशी अन प्रचाराच्या अग्रभागी अभावानेच आले.
धंगेकर यांच्या प्रचारात तर सत्तर टक्के भाग त्यांच्या वैयक्तिक कार्यकर्त्यांच्या संचाचा होता. ज्या पक्षाचा झेंडा घेऊन ते लढतीत उतरले होते, त्या पक्षाचे मोजकेच स्थानिक नेते त्यांना साथ देत होते. काँग्रेसच्या लढतीत काँग्रेसच दृश्यरूपाने दिसत नव्हती. धंगेकर यांच्या उमेदवारीनेच आतापर्यंतच्या सतरा निवडणुकांमधील काँग्रेसला मिळालेल्या मतांमधील सर्वाधिक चार लाख ६१ हजार ६९० एवढी मते काँग्रेसला मिळाली. आतापर्यंतचा काँग्रेसचा पुण्यातील उच्चांक हा १९९८ मध्ये विठ्ठल तुपे यांनी केलेला ४ लाख ३४ हजार ९१५ मतांचा होता. धंगेकर यांची वैयक्तिक प्रचाराची वैशिष्ट्यपूर्ण पद्धत नसती तर काँग्रेसला मताधिक्याचा वैयक्तिक विक्रम करता आला असता का, हा प्रश्न आहे.
मोहोळ यांच्याकडे वैयक्तिक जमेच्या अनेक बाजू होत्या आणि त्या त्यांनी संयमीपणे उपयोगात आणल्या. एकतर महापौरपदाच्या कारकिर्दीमुळे मोहोळ यांचे व्यक्तिमत्त्व वीस लाख मतदारांना नवीन नव्हते. सर्वांशी जुळवून घेण्याच्या वृत्तीने असलेला व्यापक जनसंपर्क तसेच मराठा समाजाला संधी मिळत असल्याने समाजाने दिलेला पाठिंबा या त्यांच्या भक्कम बाजू होत्या.
कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत ब्राह्मण समाजाला नाकारल्याने त्या मतदारांनी मतयंत्राद्वारे आपला रोष दाखवून दिला होता, मात्र कोथरूडच्या मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेद्वारे खासदारकी दिल्याने संतुष्ट झालेल्या ब्राह्मण समाजाने कोथरूडप्रमाणेच सदाशिव-नारायण-शनिवार पेठांमधील मतयंत्रांद्वारेही आपला भरभक्कम पाठिंबा दिला. त्यामुळे धंगेकर कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार असूनही त्या मतदारसंघातही मोहोळ यांना मताधिक्य मिळू शकले. अनेक कारणांमुळे धंगेकर यांना कसब्यातील मतदारांनी पसंती दिली होती. त्यांना विधानसभेत पाठवून वर्षही उलटत नाही तोपर्यंत त्यांना पुन्हा लोकसभेसाठी पाठिंबा कसा द्यायचा हा सवाल आणि विधानसभेसाठी एक निर्णय केला असला तरी लोकसभेसाठी मोदी आणि भाजपलाच पसंती देणाऱ्या मतदारांचे प्राबल्य या मुद्द्यांमुळेच कसब्यातूनही मोहोळ मताधिक्य खेचू शकले.
मुस्लिम-मागासवर्गीयांचे प्राबल्य असलेल्या कँन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून धंगेकर मताधिक्य खेचू शकले, पण ते सतरा हजारांच्या आसपासच मर्यादित राहिले. तुलनेने कोथरूडमधून ७१ हजार, पर्वतीतून ३१ हजार, वडगाव शेरी आणि कसब्यातून १४ हजार असे मताधिक्य मोहोळ यांनी मिळवले तर शिवाजीनगरमध्ये काँग्रेसला मताधिक्य मिळणे अपेक्षित असताना मोहोळ यांनी अडोतीसशेचे का होईना निसटते मताधिक्य मिळवले. याचे दोन अर्थ होतात. एक म्हणजे काँग्रेसला हुकमी मताधिक्य देणाऱ्या मतदार संघांतून भरभक्कम मताधिक्य खेचण्यात विस्कळित प्रचाराने काँग्रेस कमी पडली आणि दुसरा अर्थ पुण्याच्या सर्वच भागांतून कमी अधिक पाठिंबा मिळवण्यात मोहोळ यशस्वी झाल्यानेच सव्वा लाखाच्या आसपासची अधिक मते मिळवत विजयश्री खेचू शकले.

Go to Source