सरकार स्थापनेचे मोदी यांना निमंत्रण
नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : एनडीएच्या संसदीय नेतेपदी नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी सलग तिसर्यांदा फेरनिवड झाली. एनडीएच्या सर्वच नवनिर्वाचित खासदारांनी एकमुखाने त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले. नेतेपदी निवड होताच नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्यांच्याकडे सरकार स्थापनेचा दावा केला. सायंकाळी राष्ट्रपतींनी त्यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिले.
9 जूनला संध्याकाळी 7.15 वाजता नरेंद्र मोदी तिसर्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी मोदींसोबत काही कॅबिनेट मंत्रीही
शपथ घेण्याची शक्यता आहे.
तत्पूर्वी, बैठकीनंतर नरेंद्र मोदी यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी आणि माजी राष्ट्रपती, रामनाथ कोविंद यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. दरम्यान, येत्या 5 वर्षांत देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावरून तिसर्या क्रमांकावर नेण्याचा निर्धार मोदी यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला.
बैठकीत राजनाथ सिंह यांनी पंतप्रधानपदासाठी मोदींच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. अमित शहा, नितीन गडकरी यांनी त्याला अनुमोदन दिले. तेलगू देसम प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू, जेडीयू प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, जेडीएस अध्यक्ष कुमारस्वामी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आदींनी यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला.
या नेत्यांचाही पाठिंबा
अपना दलच्या अनुप्रिया पटेल, हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे जीतनराम मांझी, लोक जनशक्ती पक्षाचे चिराग पासवान या घटक पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी नरेंद्र मोदींच्या नावाला पाठिंबा दिला.
नेतेपदी निवड झाल्यानंतर एनडीए हा भारताचा आत्मा असल्याचे प्रतिपादन मोदींनी केले. देशातील जनतेचा रालोआवर विश्वास असल्यानेच आम्हाला हा जनादेश मिळाला, असेही मोदींनी सांगितले. मोदी म्हणाले की, सध्याचा काळ हा वेगवान विकासाचा असल्याने देशाची अर्थव्यवस्था लवकरच तिसर्या क्रमांकावर पोहोचेल. आपल्याला वेळ वाया न घालवता काम करायचे आहे.
जी-20 परिषदेच्या निमित्ताने देशभरात 200 ठिकाणी बैठका झाल्या. त्यातून जगभरातील लोकांना भारताच्या महान संस्कृतीचा परिचय झाला. एनडीए सरकारने आतापर्यंत 25 कोटी लोकांना गरिबी रेषेतून बाहेर काढले आहे. आता तीन कोटी गरिबांना घरे देणार आहोत. चार कोटी जनतेचे घराचे स्वप्न आम्ही आधीच पूर्ण केलेले आहे. नारी शक्ती वंदन मोहिमेच्या माध्यमातून महिलांना बळ द्यायचे आहे, असे मोदी म्हणाले.
विरोधकांवर हल्लाबोल करताना ते म्हणाले, गेल्या दहा वर्षांत काँग्रेसला 100 चा आकडाही गाठता आला नाही. 2014, 2019 आणि 2024 या निवडणुकांमध्ये काँग्रेसला जेवढ्या एकत्र जागा मिळाल्या, त्यापेक्षा जास्त जागा आम्ही एकट्या या निवडणुकीत जिंकल्या आहेत.
ईव्हीएमवरील राग शांत
एरवी ईव्हीएमच्या नावाने गळे काढणारे यावेळी शांत आहेत, असे सांगून त्यांनी विरोधकांचा चिमटा काढला. आपल्याच पंतप्रधानांचा काही लोक अपमान करत होते. त्यांचे निर्णय फाडून टाकायचे, अशा शब्दांत त्यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता टीका केली. यूपीएने घोटाळे लपवण्यासाठी नाव बदलले. मात्र लोक त्यांचे घोटाळे विसरले नसल्याचे त्यांनी सांगितले.
वाजपेयी, बाळासाहेबांचे स्मरण
अटलबिहारी वाजपेयी, प्रकाशसिंह बादल, जॉर्ज फर्नांडिस, बाळासाहेब ठाकरे यांसारख्या मोठ्या नेत्यांनी पेरलेली मूल्ये जपतच आपल्याला पुढे जायचे आहे, असे सांगून मोदी यांनी दिवंगत नेत्यांच्या आठवणींना उजाळा दिला. अमित शहा, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भाषणेही यावेळी झाली.