आनंदघन आले! आजपासून मुसळधार

आनंदघन आले! आजपासून मुसळधार

पुणे, Bharat Live News Media वृत्तसेवा : चार दिवसांपासून गोव्यात अडकलेला मान्सून गुरुवारी (दि. 6 जून) दुपारी तीन वाजता तळकोकण ओलांडून पुढे आला. त्याने दुपारी चारपर्यंत रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर शहरे काबीज केली होती. आगामी काही तासांत तो पुणे, मुंबई शहरात दाखल होईल, असा अंदाज आहे. यंदा तो राज्यात नियोजित वेळेपेक्षा एक दिवस उशिरा दाखल झाला आहे.
दरम्यान, संपूर्ण राज्याला यलो अलर्ट हवामान विभागाने दिला असून, 7 ते 9 जूनपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज दिला आहे. हवेचे दाब अनुकूल होताच मान्सून गुरुवारी राज्यात रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांंगली शहरांत दाखल झाला. तशी अधिकृत घोषणा हवामान विभागाने गुरुवारी दुपारी 4 वाजता केली. आगामी 12 ते 16 तासांत तो पुणे, मुंबई शहरात दाखल होईल, असा अंदाज आहे. हवामान विभागाने यंदा मान्सून राज्यात 5 जून रोजी येईल, असा अंदाज वर्तवला होता. मात्र, हवेचा दाब अनुकूल नसल्याने तो यंदा नियोजित तारखेपेक्षा एक दिवस उशिरा 6 जून रोजी आला.
मागच्या वर्षीच्या तुलनेत दहा दिवस आधी आला आहे. गेल्या चार दिवसांत तो गोवा भागातून इंचभरही पुढे सरकला नव्हता. कारण हवेचा दाब राज्यात 1006 हेक्टा पास्कल होते. ते गुरुवारी दुपारी 1004 हेक्टा पास्कल इतके झाले. त्यामुळे मान्सूनला अनुकूल वातावरण तयार होताच त्याने राज्यात प्रवेश केला. आता तो वेगाने पुणे, मुंबई शहरांत काही तासांत दाखल होण्याची शक्यता असून संपूर्ण राज्यात 10 ते 14 दरम्यान दाखल होईल, असा अंदाज आहे.
ईशान्य शाखा मात्र अडखळली
ईशान्य भारतात केरळच्या दोन दिवस आधीच मान्सून पोहोचला होता. त्याची गती रेमल चक्रीवादळामुळे वाढली. पण पुढे वादळ शांत होताच मान्सूनला पुढे जाण्यासाठी स्थिती अनुकूल राहिली नाही. त्यामुळे तो गेल्या आठ दिवसांपासून अडखळलेला आहे.
असे आहेत अलर्ट…
अतिवृष्टी : कोकण : 9 ते 12 जून, मध्य महाराष्ट्र : 10 जून. मुसळधार : कोकण : 7 व 8 जून, मध्य महाराष्ट्र : 7 ते 11 जून, मराठवाडा : 7 ते 9 जून, विदर्भ : 7 ते 9 जून.