घटक पक्षांना 5 खासदारांमागे 1 मंत्रिपद : ‘रालोआ’चा फॉर्म्युला
नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : केंद्रात सत्तेवर येणार्या ‘रालोआ’तील घटक पक्षांना दिली जाणारी मंत्रिपदे आणि खात्यावरून मतभेद निर्माण झाले असून तेलगू देसमचे नेते चंद्राबाबू नायडू लोकसभा सभापतिपदासाठी अडून बसले आहेत. त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू असून शुक्रवारी हा तिढा सुटण्याची शक्यता आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी शनिवार ऐवजी रविवारी, 9 जून रोजी होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
मंत्रालय वाटपाबाबत जोवर निर्णय होत नाही, तोपर्यंत शपथविधीची तारीख जाहीर करू नये, असे तेलगू देसम पक्षाचे म्हणणे होते. तेलगू देसमने लोकसभा अध्यक्षपदासह 5 ते 6 मंत्रालयांची मागणी केली आहे. याशिवाय केंद्रीय गृहमंत्रिपद अमित शहा यांच्याकडे असण्यास हा पक्ष सहमत नाही. चंद्राबाबू नायडू यांना गेल्यावर्षी अटक करण्यात आली होती. त्यामुळे अमित शहा यांच्याबद्दल या पक्षाची नाराजी असल्याचे सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाकडून 4 मंत्रालयांची मागणी केली जात आहे. रेल्वे, अर्थ आणि कृषी मंत्रालयाचा यात समावेश आहे. तीन खासदारांमागे एक मंत्रालय हे सूत्र निश्चित करण्याची संयुक्त जनता दलाची मागणी आहे. मित्र पक्षांचा दबाव पाहता भाजपमध्ये विचारमंथन सुरूच आहे.
5 खासदारांमागे 1 मंत्रिपदाचे सूत्र
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप स्वतःकडे महत्त्वाची चार खाती ठेवणार आहे. प्रत्येक पाच खासदारांमागे एक कॅबिनेट मंत्रिपद असे घटक पक्षांना मंत्रिपदाचे सूत्र असणार आहे. चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाला तीन कॅबिनेट मंत्रिपदे मिळणार आहेत. त्यापाठोपाठ बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाला दोन मंत्रिपदे मिळणार आहेत.
चिराग पासवान यांचा राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्ष, अनुप्रिया पटेल यांचा अपना दल पक्ष, पवन कल्याण यांचा जनसेना पक्ष, जयंत चौधरी यांचा राष्ट्रीय लोक दल आणि जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्थान आवामी मोर्चाला प्रत्येकी एक कॅबिनेट मंत्रिपद मिळणार आहे.
विनोद तावडे महत्त्वाच्या भूमिकेत
सर्व घटक पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी समन्वयक म्हणून भाजप नेते विनोद तावडे यांची निवड करण्यात आली आहे. सोबतच त्यांच्याकडे पक्षाचे सरचिटणीसपद आहे. त्यामुळे विनोद तावडे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. मला सरकारमधील जबाबदारीतून मोकळे करा, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष नेतृत्वाकडे केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीलाही विनोद तावडे हजर होते. त्यामुळे देशात आणि राज्यात बदलत्या समीकरणांमध्ये विनोद तावडे पुन्हा नव्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.
संघ सक्रिय; शहांचे गृहमंत्रिपद जाणार?
एनडीएच्या सहकार्यांचा दबाव लक्षात घेता मंत्रिमंडळवाटपात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सक्रिय झाल्याचे सांगण्यात येते. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी संघातील नेत्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. नड्डा, राजनाथ सिंह, सरचिटणीस बी. एल. संतोष आणि संघाचे अनेक पदाधिकारी उपस्थित आहेत. या बैठकीत सहकार्यांचे मन जपण्याचे सूत्र तयार करण्यात आले आहे. सूत्रांनुसार अमित शहा यांना गृहमंत्रिपदावरून हटवले जाऊ शकते. उद्या एनडीएच्या सर्व प्रमुख नेत्यांसह खासदारांचीही बैठक होणार आहे.
शिंदे गटाला दोन, पवार गटाला एक मंत्रिपद
महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रिपद आणि एक राज्यमंत्रिपद तर अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला एक कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असल्याचे समजते.