पवारांच्या बालेकिल्लात पहिल्यांदाच ‘कमळ’
हरिष पाटणे
1952 पासून ज्या क्रांतिकारी सातारा लोकसभा मतदार संघाने आधी यशवंतराव चव्हाण यांच्या रुपाने काँग्रेसला, त्यानंतर शरद पवार यांच्या रुपाने राष्ट्रवादी काँग्रेसला साथ दिली, त्याच सातारा लोकसभा मतदार संघात भाजपने इतिहास रचला आहे. शरद पवारांचा बालेकिल्ला असलेल्या सातार्यात भाजपने पहिल्यांदाच कमळ फुलवून दाखवले. तिकीट वाटपाच्या आधीपासून मतमोजणीच्या तेराव्या फेरीपर्यंत हारत चाललेली बाजी पलटवत छत्रपती उदयनराजे भोसले ‘बाजीगर’ ठरले !
तिकीट वाटपाच्या आधीपासूनच सातारा लोकसभा मतदार संघ उदयनराजेंसाठी धोक्याची घंटा असल्याचे चित्र रंगवले गेले होते. तिकीट मिळवण्यापासून उदयनराजेंचा संघर्ष सुरू होता. भाजपच्या अनेक याद्या जाहीर होऊनही उदयनराजेंना तिकिटासाठी तिष्ठत रहावे लागले. भाजपअंतर्गत सर्व्हेतही उदयनराजे मायनस असल्याचे पक्षश्रेष्ठींकडे सांगितले गेले. त्यामुळे पक्षांतर्गत व मतदार संघांतर्गतही उदयनराजेंविरोधात वातावरण तयार केले गेले. सातारा लोकसभा मतदार संघात कागदावर महायुतीचे पारडे आधीच जड होते. या मतदार संघात सातारा, कोरेगाव, पाटण, वाई हे चार आमदार महायुतीचे.
कराड दक्षिण व कराड उत्तरेत तुल्यबळ प्रभाव अशी नैसर्गिक परिस्थिती असतानाही महायुतीच्या नेत्यांनी उदयनराजेंविरोधात संपर्क नसल्याचे तुणतुणे वाजवत वेगवेगळे इश्यू तयार करून त्यांच्याविरोधात नाराजीची लाट असल्याचे चित्र मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांपुढे ठेवले होते. त्यामुळे उदयनराजेंना तिकीट मिळण्यात विलंब होत होता. मात्र, देवेंद्र फडणवीस यांची मैत्री उदयनराजेंसाठी धावून आली. तर छत्रपतींच्या गादीसाठी अजित पवार यांनी स्वत:चा हक्काचा मतदार संघ उदयनराजेंसाठी सोडला. भाजपचे तिकीट मिळवण्याची पहिली लढाई उदयनराजेंनी तिथेच जिंकली. शरद पवारांनीही मग उदयनराजेंविरोधात आपला हुकमी एक्का अखेरच्या क्षणी बाहेर काढला. शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देऊन पवारांनी उदयनराजेंपुढे व भाजपपुढे तगडे आव्हान निर्माण केले. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुंबई बाजार समितीतील कथित घोटाळ्यावरून आरोप-प्रत्यारोप झाले. यशवंत विचारांचाही जागर झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या जंगी सभा झाल्या.
उदयनराजे व शशिकांत शिंदे दोघेही मास व मसल लीडर असल्याने दोघांचीही जनमानसात खोलवर प्रतिमा असल्याने लढाई अटीतटीची होणार, हे निश्चित होते. घडलेही तसेच. तिकीट मिळवण्यापासून अडथळे सहन करावे लागणार्या उदयनराजेंना प्रत्यक्ष मतमोजणीवेळीही तेराव्या फेरीपर्यंत पिछाडीवरच रहावे लागले. दुसर्या फेरीपासून ते तेराव्या फेरीपर्यंत राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांनी उदयनराजेंवर सुमारे 19 हजारावर मताधिक्य नेले होते. तेराव्या फेरीनंतर हारत चाललेली बाजी पलटवत अडथळ्यांच्या शर्यतीवर मात करत मजल दरमजल करत उदयनराजेंनी शशिकांत शिंदेंचे मताधिक्य तोडले. पुढच्या प्रत्येक फेरीत मोठे मताधिक्य टाकत उदयनराजे 32 हजार 771 मतांनी विजयी झाले.
या लोकसभा मतदार संघात सातारा, कोरेगाव व कराड दक्षिण या विधानसभा मतदार संघात उदयनराजेंना मताधिक्य मिळाले. तर वाई, पाटण व कराड उत्तर या विधानसभा मतदार संघात शशिकांत शिंदे यांना मताधिक्य मिळाले. सातारा विधानसभा मतदार संघात आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या सहकार्याने उदयनराजेंना 1 लाख 16 हजार 938 एवढी मते मिळाली, तर शशिकांत शिंदे यांना 80 हजार 705 एवढी मते मिळाली. सुमारे 36 हजार 233 मतांचे निर्णायक मताधिक्य उदयनराजेंना त्यांच्या हक्काच्या सातारा या बालेकिल्ल्याने दिले. त्यात शिवेंद्रराजेंचा मोठा सहभाग राहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेला शब्द शिवेंद्रराजेंनी खरा करून दाखवला.
कोरेगाव विधानसभा मतदार संघात उदयनराजेंना 1 लाख 3 हजार 922, तर शशिकांत शिंदे यांना 97 हजार 87 एवढी मते मिळाली. आ. महेश शिंदे यांनी उदयनराजेंना 6 हजार 835 मतांचे मताधिक्य दिले. स्वत:च्या हक्काच्या कोरेगाव विधानसभा मतदार संघात शशिकांत शिंदे पिछाडीवर राहिले. कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात 2019 साली झालेल्या सार्वत्रिक व त्यानंतरच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे कमालीचे पिछाडीवर होते. त्या दोन्ही निवडणुकांमध्ये 40 हजारच्या फरकाने उदयनराजे मागे राहिले होते. मात्र, डॉ. अतुल भोसले यांच्या मायक्रो प्लॅनिंगने कराड दक्षिणने चमत्कार करून दाखवला. उदयनराजेंना निवडून आणण्यात डॉ. अतुल भोसले यांनी सिंहाचा वाटा उचलला. या मतदार संघात उदयनराजेंना 92 हजार 814, तर शशिकांत शिंदे यांना 92 हजार 198 एवढी मते मिळाली. मताधिक्य मोठे नसले तरी प्रथमच उदयनराजेंना दक्षिणेत एवढी मते मिळाली. याउलट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उदयसिंह पाटील-उंडाळकर एकत्र असूनही त्यांचा कोणताच करिष्मा दिसला नाही. कराड उत्तरेत मनोज घोरपडे व धैर्यशील कदम या दोघांनी उदयनराजेंच्या विजयासाठी घेतलेले कष्ट कामी आले. उत्तरेत उदयनराजेंना 88 हजार 930, तर शशिकांत शिंदेंना 90 हजार 654 मते मिळाली आहेत. शिंदे 1 हजार 724 एवढ्या अत्यल्प फरकाने पुढे असले, तरी या मतदार संघात भाजप वाढले आहे ही बाळासाहेब पाटील यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे. शशिकांत शिंदे यांना सर्वाधिक अपेक्षा ज्या उत्तरेतून होती, तिथेच त्यांची प्रश्नपत्रिका कोरी निघाली. त्यामुळे उदयनराजेंचा विजय सुकर झाला. आ. शशिकांत शिंदे ज्यांच्यावर भिस्त ठेवून होते तिथेच शिकस्त बसली. पराभवाचा पायाही तिथेच रचला गेला.
उदयनराजेंना सर्वात मोठा धक्का वाई विधानसभा मतदार संघाने दिला. आ. मकरंद पाटील यांच्यासारखा हेवीवेट लीडर असतानाही या मतदार संघात उदयनराजे 6 हजार 743 मतांनी मागे आहेत. उदयनराजेंना 90 हजार 685, तर शशिकांत शिंदेंना 97 हजार 428 एवढी मते मिळाली आहेत. महायुतीत आ. मकरंद पाटील, मदनदादा भोसले, पुरुषोत्तम जाधव असे तीन लीडर असताना उदयनराजे मायनस जातात आणि पवारांच्या राष्ट्रवादीकडे एकही स्ट्राँग नेता नसताना तिसर्या फळीच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर या मतदार संघात शशिकांत शिंदे मोठे मताधिक्य घेतात, ही मकरंद पाटील यांच्यासाठीही धोक्याची घंटा आहे.
सातारा जिल्ह्यात महायुतीचे प्रमुख असलेले राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री व सातार्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी उदयनराजेंना एक लाखाचे मताधिक्य देणार, असे जाहीर केले होते. प्रत्यक्षात स्वत:च्या पाटण विधानसभा मतदार संघात ते 2 हजार 943 मतांनी पिछाडीवर आहेत. पाटणमध्ये शंभूराज देसाई यांचा करिष्मा असतानाही उदयनराजेंना 75 हजार 460, तर शशिकांत शिंदे यांना 78 हजार 403 एवढी मते मिळतात, हे कुतूहलाचे व आश्चर्यजनक आहे. सत्यजितसिंह पाटणकरांनी शशिकांत शिंदे यांचे टिच्चून काम केल्याचे आकडेवारी सांगत आहे.
उदयनराजेंना सातारा विधानसभा मतदार संघात 60 हजारांहून अधिक मताधिक्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात गेल्या दोन्ही तिन्ही निवडणुकांच्या तुलनेत उदयनराजेंचे मताधिक्य या मतदार संघात 36 हजारांपर्यंत घसरले आहे. कराड उत्तर, दक्षिणने हात दिला नसता, तर उदयनराजेंना पराभवाला सामोरे जावे लागले असते, हेही इथे विशेषत्वाने नमूद करावे लागेल.
अनेक अडथळ्यांच्या शर्यतींवर मात करत उदयनराजे गडावर पोहोचले. क्रांतिकारी सातारा लोकसभा मतदार संघात पहिल्यांदाच ‘कमळ’ फुलले. यशवंतराव चव्हाण व शरद पवारांच्या बालेकिल्ल्यावर उदयनराजेंनी भगवी पताका फडकावली आहे. विधानसभेच्या निवडणुकीतही त्यामुळे बरेच उलटफेर पाहायला मिळणार आहेत.
काँग्रेस – राष्ट्रवादीचा बालेकिल्ला भाजपकडे
सातारा लोकसभा मतदार संघ 1996 चा अपवाद वगळता कायमच काँग्रेस विचारांचा राहिला. या मतदार संघातून स्वत: यशवंतराव चव्हाण हे 1967, 1971, 1977 व 1980 साली निवडून गेले. प्रतापराव भोसले यांनीही हा मतदार संघ 1984, 1989 व 1991 साली निवडून येत काँग्रेस विचारांसोबत ठेवला. दस्तुरखुद्द छत्रपती उदयनराजेही याच सातारा लोकसभा मतदार संघातून शरद पवारांनी दिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावरच 2009, 2014, 2019 साली खासदार झाले. 1996 साली हिंदुराव निंबाळकर हे शिवसेनेच्या तिकिटावर या लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर 2024 साली उदयनराजे भोसले हे भाजपच्या तिकिटावर खासदार झाले.
शशिकांत शिंदे यांची ऐतिहासिक झुंज
उदयनराजे 32 हजारांहून अधिक मतांनी निवडून आले असले तरी शशिकांत शिंदे यांनी त्यांना दिलेली झुंज दुर्लक्षून चालणार नाही. श्रीनिवास पाटील, पृथ्वीराज चव्हाण अशा बड्या नेत्यांनी उदयनराजेंविरोधात लढायला नकार दिल्यानंतरही तिसर्या फळीच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर प्रबळ सत्तेविरोधात 84 वर्षांच्या शरद पवार नावाच्या नेत्यासाठी निष्ठावंत होऊन शशिकांत शिंदेंनी अग्निकुंडात घेतलेली उडी इतिहास विसरणार नाही.