लोकसभेत मायावती, राव, पटनायकांच्या पक्षांचे अस्तित्व शून्य !
नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभेत एकेकाळी आपले अस्तित्व दाखविणाऱ्या मायावती यांच्या बहुजन समाज पक्षासह चंद्रशेखर राव यांचा बीआरएस, नवीन पटनायक यांचा बिजू जनता दल आणि मेहबूबा मुफ्ती यांचा पीडीपी पक्षाचा एकही खासदार यंदाच्या संसदेत दिसणार नसल्याचे आढळून आले आहे. त्यांच्या पक्षांना लोकसभा निवडणुकीमध्ये खाते सुद्धा उघडता आलेले नाही.
लोकसभा निवडणुकीच्या निकालात मोठे उलटफेर बघायला मिळाले. माजी मुख्यमंत्री असलेल्या चार नेत्यांच्या पक्षाला एकही खासदार निवडून आणता आला नाही. मायावती यांच्या बसपाला यावेळी खातेही उघडता आले नाही. स्वबळावर लढण्याचा निर्णय मायावती यांच्या अंगलट आला. 2019 च्या निवडणुकीत बसपाने 10 जागा जिंकल्या होत्या.
तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचा भारत राष्ट्र समिती पक्षही यंदा शून्यावर बाद झाला आहे. तेलंगणा विधानसभा पाठोपाठ लोकसभेतही त्यांचा पराभव झाला. महाराष्ट्रात मुळ रोवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या पक्षाला भोपळाही फोडता आला नाही. 2019 मध्ये या पक्षाला 9 जागा मिळाल्या होत्या.
ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दलाचीही पाटी कोरी राहिली. लोकसभेबरोबर ओडिशा विधानसभेतही त्यांचा दारूण पराभव झाला. राज्यातील सत्ताही गमवावी लागली. ओडिशाच्या 21 लोकसभा जागांपैकी 19 जागांवर भाजपचा उमेदवार निवडून आला आहे, तर 2019 मध्ये बिजू जनता दलाला 12 जागा मिळाल्या होत्या.
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या पीडीपी पक्षाचीही अशीच अवस्था आहे. त्या स्वतः अनंतनाग मतदारसंघातून दोन लाखांपेक्षा अधिक मतांनी पराभूत झाल्या. मायावती, नवीन पटनायक, के चंद्रशेखर राव यांचे पक्ष देशातील एनडीए किंवा इंडिया आघाडीत सामील नसल्याने त्यांना फटका बसल्याचे निवडणूक निकालातून दिसून आले आहे.
हेही वाचा :
LokSabha Elections 2024 : महायुतीला खडकवासल्याच्या बालेकिल्ल्यात खिंडार
LokSabha Elections2024 : पुणेकरांचा विश्वास सार्थ ठरविणार; खा. मुरलीधर मोहोळ
Loksabha election | मतमोजणीचे काउंटडाऊन सुरू प्रशासन पुन्हा अॅक्टिव्ह मोडवर!