नादखुळा! लासलगाव पट्ट्यात कांद्याने नेत्यांना आणले जमिनीवर

“फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश” या गाण्याची प्रचिती यंदाच्या निवडणुकीत झाल्याचे दिसून आले. दिंडोरी लोकसभा निवडणुकांच्या निकालाने भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांना जोरदार धक्का दिला असून, भाजपचा बालेकिल्ला असलेल्या दिंडोरीमध्ये त्यांचा विजयाचा वारू भास्कर भगरे यांनी रोखला. डॉ. पवार यांचा मंत्री झाल्यानंतर मतदारसंघाशी तुटलेला संपर्क, कांद्याच्या प्रश्नाबाबतची उदासीनता आणि रेल्वेगाड्यांच्या थांब्याबाबत समस्या सोडवण्यात …

नादखुळा! लासलगाव पट्ट्यात कांद्याने नेत्यांना आणले जमिनीवर

लासलगाव : राकेश बोरा

“फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश” या गाण्याची प्रचिती यंदाच्या निवडणुकीत झाल्याचे दिसून आले. दिंडोरी लोकसभा निवडणुकांच्या निकालाने भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांना जोरदार धक्का दिला असून, भाजपचा बालेकिल्ला असलेल्या दिंडोरीमध्ये त्यांचा विजयाचा वारू भास्कर भगरे यांनी रोखला. डॉ. पवार यांचा मंत्री झाल्यानंतर मतदारसंघाशी तुटलेला संपर्क, कांद्याच्या प्रश्नाबाबतची उदासीनता आणि रेल्वेगाड्यांच्या थांब्याबाबत समस्या सोडवण्यात आलेले अपयश आणि मतदारांना गृहीत धरल्याने त्यांना मोठ्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले.

निफाड तालुक्यातुन माजी आमदार अनिल कदम, कल्याणराव पाटील, लासलगाव बाजार समितीचे सदस्य जयदत्त होळकर, माजी पं. स. सभापती शिवा सुरासे, दिलीप मोरे, राजेंंद्र मोगल यांनी भगरे गुरुजींच्या विजयासाठी प्रचंड मेहनत घेतली. भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांनी भारती पवार यांच्या विजयासाठी मोठे प्रयत्न केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव बसवंत येथे सभा आयोजित करण्यापासून ते मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांवर विविध जबाबदारी निश्चित करण्यापर्यंत महाजन यांनी सूक्ष्म नियोजन केले. अखेरच्या टप्प्यात महाजन हे दिंडोरीत तळ ठोकून होते. मतदारसंघातील प्रमुख गावात त्यांचे कार्यकर्ते सक्रिय होते. तरीही ते पवार यांचा पराभव मात्र रोखू शकले नाही.
रेल्वेप्रवाशांच्या समस्या सोडविण्यात अडचण
गेल्या पाच वर्षांत डॉ. भारती पवार यांच्याकडून कांदाप्रश्न असेल किंवा रेल्वेच्या थांब्याचा प्रश्न असेल याबाबत नागरिकांनी वारंवार मागणी करूनही त्याकडे फारसे त्यांनी लक्ष दिले नाही. याची सल मतदारांच्या मनात होती. येथील एका स्थानिक नेत्याने रेल्वेगाड्या थांबासंदर्भात मंत्रिमहोदयाला फोन केला यावेळी प्रवासी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मंत्र्यांनी रेल्वेचा थांबा नसल्याने पर्यायी मार्गाचा विचार करावा, असा अजब सल्ला दिला. आता फोन स्पीकरवर असल्याने स्थानिक पदाधिकारी यांची मात्र गोचीच झाली.
हमीभाव मागणीकडे दुर्लक्ष
दिंडोरी मतदारसंघात सर्वाधिक कांदा उत्पादक शेतकरी मतदार आहेत. मात्र गेल्या अडीच वर्षांत कांद्याच्या दरात सातत्याने झालेली पडझड तसेच गेल्या वर्षी केंद्राने लागू केलेली कांदा निर्यातबंदी हा निवडणुकीत प्रमुख मुद्दा ठरला. कांदा निर्यातबंदी धोरणामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी प्रचंड नाराज आहे, कांद्याला हमीभाव मिळावा, निर्यात सदैव खुली राहावी अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांची आहे.
मतदारसंघ मागासच
मतदारसंघातील मनमाड, नांदगाव, लासलगाव या रेल्वेस्थानकातील प्रवासी गाड्यांच्या थांब्याबाबत समस्या कायम आहे. नाशिक शहराच्या तुलनेत मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल या मतदारसंघात नाही. मोठे हॉस्पिटल उभारणेदेखील गरजेचे आहे. याबरोबरच मतदारसंघातील सर्वात मोठे शहर आसलेल्या मनमाडमध्ये असलेले रेल्वेचे मोठे जाळे, लासलगावची प्रसिद्ध कांदा बाजारपेठ, ओझरचे सैनिकी विमान निर्मितीचा कारखाना अर्थात एचएएल, येवल्याची प्रसिद्ध पैठणी, निफाड व दिंडोरीचे द्राक्ष, तसेच उत्तर महाराष्ट्राची आराध्यदैवत असलेल्या आदिमायेचा सप्तशृंगगड हे याच मतदारसंघात येतो. मात्र नाशिकच्या तुलनेत हा मतदारसंघ मागास राहिला आहे. दिंडोरी, पेठ, सुरगाणा, कळवण या आदिवासीबहुल तालुक्यांना निसर्गाने भरभरून दान दिले. मात्र पर्यटन विकास हवा तसा झालेला नाही. अशी अनेक कारणे या पराभवामागे दडलेली आहेत.
हेही वाचा:

Lok Sabha 2024 : भविष्‍यात राहुल गांधी पंतप्रधान होतील? जाणून घ्‍या ज्योतिषशास्त्र काय सांगते?
H5N2 बर्ड फ्लू’चा मॅक्सिकोमध्ये जगातील पहिला बळी; WHO ची माहिती