दिंडोरी वार्तापत्र : एकीचे बळ; भगरेंना फळ!

अवघ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात यंदा मतदारांनीच निवडणूक हाती घेत सामान्य कुटुंबातील भास्कर भगरे यांना थेट संसदेत पाठविले. मतदारांनी निश्चय केल्यास निवडणुकीत कोणतीच गोष्ट अशक्यप्राय नसते हेच या निकालाने सिद्ध झाले आहे. जायंट किलर ठरलेल्या भगरे यांनी केंद्रीय राज्यमंत्री डाॅ. भारती पवार यांना अस्मान दाखविले. निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमधील एकीच्या बळावर भगरेंच्या विजयाचा …

दिंडोरी वार्तापत्र : एकीचे बळ; भगरेंना फळ!

नाशिक : गौरव जोशी

अवघ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात यंदा मतदारांनीच निवडणूक हाती घेत सामान्य कुटुंबातील भास्कर भगरे यांना थेट संसदेत पाठविले. मतदारांनी निश्चय केल्यास निवडणुकीत कोणतीच गोष्ट अशक्यप्राय नसते हेच या निकालाने सिद्ध झाले आहे. जायंट किलर ठरलेल्या भगरे यांनी केंद्रीय राज्यमंत्री डाॅ. भारती पवार यांना अस्मान दाखविले. निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमधील एकीच्या बळावर भगरेंच्या विजयाचा मार्ग प्रशस्त बनला. तर कांद्याची नाराजी, तुटलेला जनसंपर्क, मंत्रिपदानंतर सभोवताली वाढलेल्या बडव्यांची संख्या असे विविध कंगोरे डॉ. पवार यांच्या पराभवास कारणीभूत ठरले आहेत.
राज्यात भाजपसाठी सर्वाधिक सुरक्षित मतदारसंघ असलेल्या दिंडोरीत तब्बल २० वर्षांच्या गडाला भास्कर भगरे यांनी सुरुंग लावला. खा. शरद पवार यांच्या कृपाशीर्वादाने थेट लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या भगरे यांनी विद्यमान मंत्री पवार यांचा तब्बल १ लाख १३ हजार १९९ मताधिक्याने धूळ चारली. दिंडाेरी मतदारसंघाअंतर्गत सहाही विधानसभा मतदारसंघांत महायुतीचे आमदार आहेत. त्यामुळे पवारांचा विजय निश्चित मानला जात होता. परंतु, निकालानंतर हे सारेच गणित बिघडलेले दिसून येते. नांदगाव व चांदवड वगळता अन्य चारही मतदारसंघांत पवारांची पिछेहाट झाली. होम पिच असलेल्या कळवण-सुरगाणा मतदारसंघात निवडणुकीपूर्वी पवार यांनी दीर आ. नितीन पवार यांच्याशी जुळते घेतले. परंतु, निवडणुकीत त्याचा फायदा झाला नसल्याचे समोर येत आहे. भगरेंनी तेथे १ लाख १४ हजार १३४ मते घेतली असून, पवारांना केवळ ५६४६१ मते पडली. त्यामुळे मतांचे आकडे बघता भगरे यांनी ५७६७३ मतांचा तेथे लीड घेतला. त्यामुळे दीर-भावजयमधील दिलजमाई निवडणुकीतील कामाला आली नसल्याचे उघड आहे.
येवला व मंत्री छगन भुजबळ हे समीकरण घट आहे. परंतु, लोकसभा निवडणुकीतील भगरे यांनी ९३५०० मते घेतली असून, प्रतिस्पर्धी पवारांना केवळ ८०२९५ मते मिळाली. त्यामुळे मतांची गोळाबेरीज बघता मंत्री भुजबळ यांनी पवारांचा करेक्ट कार्यक्रम केल्याचे दिसून येते. नांदगावमध्ये आ. सुहास कांदे यांनी केलेल्या प्रचारामुळे पवारांना ४१६६५ मतांचा लीड मिळाला. तर चांदवडमध्ये राहुल आहेर यांनी मतदारसंघ पिंजून काढला. त्याचे फलित म्हणजे पवारांना येथून ९५३२५ मते मिळाली. मात्र, प्रतिस्पर्धी भगरे यांच्यासाठी माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी जोर लावल्याने भगरेंच्या पारड्यात ७८५७८ मतांचे दान पडले. परिणामी, पवार यांनी केवळ १६७४७ मताधिक्य मिळाले. निफाडमध्ये आ. दिलीप बनकर यांनी काम करूनही भगरे यांना १८,८१४ मतांची आघाडी आहे.
सर्वाधिक चर्चेत असलेल्या दिंडोरीत भगरे यांनी १ लाख ३८ हजार १८९ मते मिळाली. त्या तुलनेत पवारांचा केवळ ५५८८१ वर राेखला गेला. पवारांपेक्षा भगरेंचे तेथील मताधिक्य अडीच पट अधिक आहे. भगरेंच्या या यशात ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांचा सिंहाचा वाटा आहे. त्याचवेळी भगरेंचे यश बघता विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी पवारांसाठी किती काम केले यावर प्रश्नचिन्हच उभे ठाकले आहे. दिंडोरी लोकसभेतील विजय हा महाविकास आघाडी त्यातही विशेष करून राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी नवसंजीवनी देणारा ठरला आहे. तर महायुतीमधील मित्रपक्षांसाठी तो आत्मचिंतन करायला लावणार आहे.
कांद्याने केला वांधा
मागील ५ वर्षांत कांद्यासंदर्भात केंद्र सरकारची धरसोड वृत्ती शेतकऱ्यांसाठी मारक ठरली. गेल्या वर्षी लागू केलेल्या कांदा निर्यातबंदीचा फटकाही सत्ताधारी भाजपला सहन करावा लागला आहे. एकीकडे गुजरातचा पांढरा कांदा व कर्नाटकच्या गुलाबी कांद्याला निर्यातीची परवानगी दिली जात असताना नाशिकच्या कांद्यावर निर्यातबंदी लादली गेली. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा नाहक रोष भाजपने स्वत:वर ओढून घेतला. त्याचा फटका पवारांना बसला.
दिंडोरी मतआकडेवारी अशी…

भास्कर मुरलीधर भगरे (मविआ): ५७७३३९
डॉ. भारती प्रवीण पवार (भाजप): ४६४१४०
बाबू सदू भगरे(सर) (अपक्ष): १०३६३२
मालती राहुल ढोमसे (वंचित): ३७१०३

स्वीय सहायकांनी केला घात
सतराव्या लाेकसभेतील उत्तरार्धात मंत्रिपदाला गवसणी घालणाऱ्या डाॅ. पवार यांचा गेल्या अडीच वर्षांत मतदारसंघाशी जनसंपर्कच तुटला. सामान्य जनतेला त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काठीण्य होऊन बसले. पवारांना भेटण्यापूर्वी त्यांच्या स्वीय सहायकांकरवी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत हाेती. स्वीय सहायकांवर अति टाकलेला विश्वास हाच पवारांसाठी घातकी ठरला.
रेल्वेची समस्या कायम
कोरोनानंतर नांदगाव, निफाड, लासलगाव येथे अनेक रेल्वेगाड्यांचे थांबे बंद पडले. तर राज्यराणी, गोदावरी तसेच भुसावळ-पुणे या हक्काच्या गाड्या इतरत्र पळविल्या. पंचवटीदेखील पळविण्याचा घाट घातला जात असताना भारती पवार यांनी झोपेचे सोंग घेतले. त्यामुळे प्रवाशांनी निवडणुकीमध्ये त्याचा वचपा काढला. याशिवाय रखडलेले ड्रायपोर्ट, शेतमालाची समस्या, बंद पडलेली किसान रेल्वे आदी घटकही पवारांना निवडणुकीत नडले.
बालेकिल्ला गेला, गड राखला
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उदयापासून सातारा हा पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे खा. शरद पवार यांचे साताऱ्यावर विशेष प्रेम आहे. पण, उदयनराजे यांच्या रूपाने साताऱ्यात यंदा कमळ फुलल्याने राष्ट्रवादीचा किल्ला ढासळला. त्याचवेळी २००४ पासून भाजपला साथ देणाऱ्या दिंडोरीत राष्ट्रवादीच्या भगरेंनी गड सर केला आहे. त्यामुळे भाजपचा वीस वर्षांचा गड नेस्तानाबूत झाला.
झालेले मतदान असे…
मतदारसंघ              भास्कर भगरे           भारती पवार
नांदगाव                     61336                     103001
कळवण                     114134                    56461
चांदवड                      78578                     95325
येवला                        93500                     80295
निफाड                      89554                     71730
दिंडोरी                     138189                     55881
एकूण                       577339                   464140
हेही वाचा:

निवडणूक विश्लेषण : …म्हणून वाजेच ठरले ‘राजे’!
राज्याला पूर्णवेळ कृषी आयुक्त नाहीच!