परभणी: हादगाव येथे दुचाकी-कारची धडक; एक ठार, अपघातग्रस्त कार पेटवली

परभणी: हादगाव येथे दुचाकी-कारची धडक; एक ठार, अपघातग्रस्त कार पेटवली

पाथरी; Bharat Live News Media वृत्तसेवा: राज्य महामार्ग क्रमांक ६१ वर हादगाव शिवारात रविवारी रात्री कार व मोटारसायकलची समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर कारमधील महिला गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर अपघातग्रस्त कार अज्ञातांनी जाळून टाकल्याची घटना सोमवारी (दि.३) उघडकीस आली आहे.
पाथरी तालुक्यातुन जाणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक ६१ वर हादगाव शिवारामध्ये सोमवारी (दि.२) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर कडे जाणारी कार (एमएच २० ईई २६५१) व पाथरीकडे जाणाऱ्या मोटार सायकलची समोरासमोर धडक झाली. यात मोटार सायकलवरील महादेव भास्कर पवार (वय ३२, रा. पाथरी) हा जागीच ठार झाला. कारमध्ये दोन महिला व एक पुरुष होते. यामधील एक महिला गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. जखमीला छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी नेण्यात आले.
दरम्यान, पाथरी ग्रामीण रुग्णालयामध्ये मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. आज सकाळी ९ च्या सुमारास कार चालकावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी मृताच्या नातेवाईकांनी पाथरी पोलीस ठाण्यामध्ये मोठी गर्दी केली होती. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला होता. पोलीस निरीक्षक मोहिते यांनी नातेवाईकांशी चर्चा केली. उशिरापर्यंत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती.
हेही वाचा 

परभणी : पिंपळभत्या येथे दुचाकींची धडक; ३ तरुण गंभीर जखमी
परभणी: गौर येथे कर्जास कंटाळून शेतकऱ्याने जीवन संपविले
परभणी : सेलू तालुक्यातील ३ गावे ३ महिन्यांपासून अंधारात