भाजप मुख्यालयात जल्लोषाची तयारी, बुंदीचे लाडूही वळून तयार

भाजप मुख्यालयात जल्लोषाची तयारी, बुंदीचे लाडूही वळून तयार

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीत भाजप व मित्र पक्षांच्या एनडीएला मोठा विजय मिळण्याचा अंदाज ‘एक्झिट पोल’ मधून वर्तविण्यात आल्यामुळे राजधानी दिल्लीत सत्तेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. निवडणूक निकालानंतर विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी भाजप मुख्यालयात जोरदार तयारी करण्यात आली आहे. निकाल लागताच कार्यकर्त्यांचे तोंड गोड करण्यासाठी बुंदीचे लाडू वळण्यास सुरूवात झाली आहे. भाजपच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या ‘लोककल्याण मार्ग’ या निवासस्थानातून निघून ‘रोड शो’ च्या माध्यमातून जनतेला अभिवादन करणार आहेत. भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सोमवारी झालेल्या बैठकीत विजयाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. बैठकीत मतमोजणी आणि निवडणूक निकालानंतरच्या रणनीतीबाबत चर्चा झाल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी दिली.
ते म्हणाले की, या बैठकीत सात टप्प्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. मंगळवारी होणाऱ्या मतमोजणीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात आलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. निवडणूक निकालानंतर विरोधकांच्या आरोपांना उत्तरे देण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीला हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, मनसुख मांडविया, तरुण चुघ, शिव प्रकाश, बी. एल. संतोष आदी नेते उपस्थित होते.