ब्रह्मोस मिसाइल हेरगिरीप्रकरणी वैज्ञानिक निशांत अग्रवालला जन्मठेप

ब्रह्मोस मिसाइल हेरगिरीप्रकरणी वैज्ञानिक निशांत अग्रवालला जन्मठेप

नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : बहुचर्चित ब्रह्मोस मिसाइल प्रकरणात वैज्ञानिक निशांत अग्रवाल याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विद्यमान अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. व्ही. देशपांडे यांच्या कोर्टात हा खटला विशेष सरकारी वकील ज्योती वजानी यांनी चालवला. कलम 3 आणि 5 ऑफिशियल सिक्रेट अॅक्टनुसार आरोपी निशांत अग्रवाल याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
पाकिस्तान व अमेरिकेसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून ब्रह्मोस एरोस्पेसच्या नागपूर यूनिटमधील निशांत अग्रवाल या वैज्ञानिक अभियंत्याला २०१८ मध्ये अटक करण्यात आली होती. सीनियर सिस्टिम इंजिनिअर असलेला निशांत हनी ट्रॅपच्या माध्यमातून हेरगिरी करत होता. उत्तर प्रदेश व महाराष्ट्र एटीएसने ही कारवाई केली. त्याने सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेत्रणास्त्रांची संवेदनशील गोपनीय माहिती पाकची गुप्तहेर संस्था आयएसआय व अमेरिकेच्या गुप्तहेर संघटनेला पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. निशांतकडून जप्त लॅपटाॅपमध्ये क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाशी निगडित माहिती व दस्तऐवज मिळाले होते. यानंतरच्या काळात संयुक्त पथकांनी केलेल्या कारवाईत निशांतच्या रुडकी येथील घर, ब्रह्मोसचे नागपूर यूनिट आणि नागपुरातील घरी देखील झडती घेतली होती.
निशांतचा  युवा वैज्ञानिक पुरस्काराने गौरव
निशांत हा नागपुरातील उज्वलनगर भागातील मनोहर काळे यांच्या घरी किरायाने राहात होता. मार्च २०१८ मध्येच त्याचे लग्न झाले होते. तो उत्तराखंडमधील रुरकी येथील रहिवासी आहे. तो कुरुक्षेत्रच्या एनआयटीचा पासआऊट आहे. तो ब्रह्मोस मिसाइल युनिटमध्ये चार वर्षांपासून काम करीत होता. हायड्रॉलिक- न्यूमेटिक्स आणि वॉरहेड इंटिग्रेशन विभागाच्या ४० लोकांच्या चमूचे नेतृत्व करत हाेता. २०१७-१८ मध्ये युनिटने त्याचा युवा वैज्ञानिक पुरस्कारानेही गौरव केला. ब्रह्मोसच्या सीएसआर, आरअँडडी ग्रुपचाही तो सदस्य आहे. सध्या ब्रह्मोस नागपूर व पिलानी साइट्सचे प्रोजेक्ट्सचे काम तो पाहत होता.
पाक एजंटच्या चौकशीतून लागला सुगावा
उत्तर प्रदेश एटीएसने काही महिन्यांपूर्वी एका आयएसआय एजंटला ताब्यात घेतले होते. त्याच्याच चौकशीतून निशांत अग्रवालचे नाव समोर आले. नंतर मिलिटरी इंटेलिजन्सला याबाबतची माहिती देण्यात आली. यानंतर एटीएस व मिलिटरी इंटेलिजन्सच्या पथकांनी त्याची माहिती गोळा केली. निशांत हा फेसबुकवर पाकच्या महिला मित्रांसोबत डीआरडीओची माहिती शेअर करीत होता. हीच माहिती पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेला देखील पोहोचवली जात होती. या पथकांनी
एक डेल कंपनीचा व एचपी  कंपनीचा लॅपटाॅप, हार्ड डिस्क, एक अॅपल आयफोन मोबाईल, एक नोकिया तसेच एक रेड मी कंपनीचा मोबाईल, राऊटर आणि एक ब्रम्होस लॅपटाॅप जप्त करण्यात आले होते.
हेही वाचा 

कोल्हापूर : नागपूर-रत्नागिरी महामार्गावर शेतकऱ्यांचे आंदोलन
मणिपूरच्या विद्यार्थ्यांना नागपूर विद्यापीठाचा मदतीचा हात!
नागपूर : महावितरणकडून स्मार्ट मीटर बसवण्यास सुरूवात